गुरुवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी ३१वा गदिमा कविता महोत्सव
पिंपरी:
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद – भोसरी शाखा आणि गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली आयोजित ३१वा राज्यस्तरीय गदिमा कवितामहोत्सव गुरुवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता गणेश इंटरनॅशनल स्कूल, थरमॅक्स चौक ते चिखली रस्ता, नेवाळे वस्ती, चिखली येथे संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ – मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे अध्यक्षस्थान भूषविणार असून ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल. सासवड येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र साहित्य परिषद – पुणे प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या उपस्थितीत नांदेड येथील ज्येष्ठ कवी डॉ. जगदीश कदम यांना गदिमा जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे जालना येथील ज्येष्ठ कवयित्री संजीवनी तडेगावकर (गदिमा काव्यप्रतिभा) आणि कुर्डुवाडी येथील पारंपरिक लोककलावंत वर्षा मुसळे यांना (गदिमा लोककला) पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय गदिमा साहित्य पुरस्कारासाठी शिरूर येथील दत्तात्रय जगताप (‘तू फक्त बाई नाहीस!’), नांदगाव येथील प्रतिभा खैरनार (‘पडसावल्या’), बीड येथील प्रभाकर साळेगावकर (‘प्रसन्न प्रहार’), औरंगाबाद येथील संतोष आळंजकर (‘हंबरवाटा’), धाराशिव येथील प्रा. अलका सपकाळ (‘वादळ झेलताना’), पुसद येथील आबिद शेख (‘चोचीमधील दाणे’) या कवींच्या कवितासंग्रहांची निवड करण्यात आली आहे
तसेच मृत्युंजय साहित्य पुरस्कारासाठी खुलताबाद येथील भाऊसाहेब मिस्तरी (‘रंधा’) आणि परभणी येथील बा. बा. कोटंबे (‘तिटा’) यांच्या कादंबऱ्यांची निवड करण्यात आली आहे. कवयित्री आश्लेषा महाजन यांना गदिमा शब्दप्रतिभा आणि ज्येष्ठ कवी इंजि. शिवाजी चाळक यांना कविराज उद्घव कानडे यांच्या स्मरणार्थ केशरमाती काव्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
गदिमा दिवाळी अंक पारितोषिकासाठी ‘दुर्गांच्या देशातून’ (प्रथम), ‘अधोरेखित’ (द्वितीय) आणि ‘शब्दाई’ (तृतीय) निवड करण्यात आली आहे. कवितामहोत्सवातील निमंत्रितांच्या कविसंमेलनात देवदत्त साने, भरत दौंडकर, लता ऐवळे, अरुण पवार, प्रशांत केंदळे, सुहास घुमरे आणि श्रीनिवास मस्के सहभागी होतील. विनाशुल्क असलेल्या या महोत्सवाचा रसिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष सुदाम भोरे आणि निमंत्रक मुरलीधर साठे यांनी केले आहे.
- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
- गणपतीदान व निर्माल्यदान उपक्रमाला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद : १४८६० गणेश मुर्ती व ३२ टन निर्माल्य जमा
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वामी कुवल्यानंद योग पुरस्कार प्रदान
- पर्व आरोग्य क्रांतीचे : आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळात महाआरोग्य शिबीर
- रविंद्र आप्पा भेगडे यांच्या झंझावाती गणेश मंडळ दौऱ्यांमुळे कार्यकर्त्यांचा गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित