वाचकांची तहान भागवण्यासाठी बांधलेले धरण म्हणजे ग्रंथालय: श्याम भुर्के
पिंपरी:
“वाचकांची तहान भागवण्यासाठी बांधलेले धरण म्हणजे ग्रंथालय होय!” असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के यांनी मोरया गोसावी मंदिर पटांगण, देऊळमळा, चिंचवडगाव येथे काढले.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य – मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय – पुणे आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्याम भुर्के बोलत होते. पिंपरी – चिंचवड महापालिका माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, मुंबई येथील ग्रंथालय संचालनालयाचे प्रमुख ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, पुणे जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मोहन शिंदे, कार्यवाह सोपान पवार, माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
तसेच विविध ग्रंथालयांचे पदाधिकारी, ग्रंथपाल आणि कर्मचारी, शरद इनामदार, श्रीकांत चौगुले यांच्यासह शहरातील साहित्यिक यांची सभामंडपात मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
श्याम भुर्के पुढे म्हणाले की, “लेखक अन् प्रकाशक यांनी घेतलेले श्रम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य ग्रंथालय करीत असतात. प्रत्येक माणूस गोष्टी ऐकण्यासाठी खूप अधीर असतो.
त्याची इच्छा ग्रंथालय पूर्ण करतात. पगार मिळवत असताना समाजसेवा करण्याचे भाग्य ग्रंथपाल यांना लाभते. त्यामुळे त्यांनी नेहमी वाचकांना सुहास्य वदनाने सेवा द्यावी. वाचक आकृष्ट व्हावेत म्हणून अभिनव क्लृप्त्या लढवाव्यात!” आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, वि. आ. बुवा, पंडित भीमसेन जोशी अशा दिग्गजांचे खुसखुशीत किस्से सांगून भुर्के यांनी श्रोत्यांना खळखळून हसवत ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित केले.
माई ढोरे यांनी, “प्रत्येक वाचकाला पुस्तके विकत घेऊन वाचायला परवडत नाही. त्यामुळे वाचनाची भूक भागवण्यासाठी ग्रंथालयांची नितांत आवश्यकता आहे!” असे मत व्यक्त केले. अशोक गाडेकर यांनी, “माणूस जिवंत असेपर्यंत वाचनसंस्कृती अबाधित राहील; फक्त वाचनाची माध्यमे बदलली आहेत. प्रकाशित पुस्तकांची अद्ययावत माहिती संगणकावर उपलब्ध आहे. तसेच कोणतेही ग्रंथालय अनुदानापासून वंचित राहू नये, अशी शासनाची भूमिका आहे!” असे विचार मांडले.
उद्घाटन सत्रापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या दरम्यान सेवानिवृत्त ग्रंथपाल अरविंद जोशी यांनी ‘ग्रंथ माझे गुरू’ ही कविता सादर केली. चंद्रकांत शहासने यांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या सुमारे दोन हजार क्रांतिकारकांच्या चित्रप्रदर्शनाची माहिती दिली. संत गाडगेबाबा यांच्या पेहरावातील एकपात्री कलाकार फुलचंद नागटिळक यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
सुधाकर हांडे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथालय निरीक्षक श्रीकांत संगेपाग यांनी आभार मानले.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन