वडगाव मावळ:
फ्रेंड्स ग्रुप एका दिवसात सात किल्ले चढले आणि उतरले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ६ जुन २०२४ला राज्याभिषेक सोहळ्यास साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत याचे औचित्य साधून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले
फ्रेंड्स ग्रुप शिक्षक मित्र परिवाराने मावळ तालुक्यातील सात किल्ले चढण्याचे आणि उतरण्याचे नियोजन करण्यात आले होते.परंतू जून महिन्यात पाऊस आणि उन्हाळी सुट्टीत कडक उन्हामुळे एवढा प्रवास आणि चढाई करणे शक्य नसल्याने हिवाळ्यात ही मोहीम करणे सोयीस्कर होते.
म्हणून हे नियोजन आज करण्यात आले.एका दिवसात सात किल्ले सर करणे शक्य होईल की नाही अशी शंका सर्वाच्या मनात येत होती. निवडक ग्रुप मेंबर शनिवार दि.१३ जानेवारी सकाळ सत्रातील शाळा करून दुपारी दोन वाजता राजमाची येथे मुक्कामाला जाण्यासाठी निघाले.
येथे रात्रीच्या भोजनासाठी काही सामग्री घेत राजमाची येथे सायंकाळी साडेपाच वाजता पोहचले. राजमाचीचा परिसर, गावच्या खालील बाजूस असलेले हेमाडपंथी मंदिर, तलाव व कातळदरी यांचे निसर्ग सौंदर्य अनुभवले.रात्रीचे जेवण उरकले. उद्याच्या दिवसाचे नियोजन झाले.सर्वांच्या सहमतीने एका दिवसात सात किल्ले करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय काय करावेत यावर चर्चा झाली.पहाटे चार वाजता उठून मोहिमेला सुरुवात करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.
पहाटे पाच वाजता उठून श्रीवर्धन किल्ल्यावर चढाई करण्यासाठी निघाले. रात्रीचा अंधार आणि आम्ही बॅटरीच्या उजेडात हे सगळे सुरू होते.
अगदी पंधरा मिनिटात ही चढाई पूर्ण केली. लगेच उतरून श्रीवर्धन किल्ल्याच्या शेजारी असलेल्या मनरंजन किल्ल्याकडे मोर्चा वळवला.
ही चढाई सुध्दा अवघ्या बारा मिनिटात पूर्ण करून उतरवण्यास सुरूवात केली. बरोबर सकाळी सहा वाजता राजमाचीतून गाडीने ही मंडळी लोहगड विसापूरच्या दिशेने सुसाट निघाली.साडेसात वाजता लोहगड येथे पोहोचून वेळ न दवडता विसापूर किल्ल्याकडे कूच केली.
घळईच्या मार्गाने सव्वा आठ वाजता विसापूर किल्ल्यावर पोहोचले. किल्ला उतरून नऊ वाजता लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले.
लोहगड किल्ल्याची चढाई पूर्ण केली. चहापान करून लगेच तिकोणा किल्ल्याकडे जाण्यास ही टीम निघाली. साडे अकरा वाजता तिकोणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचून चढाईला सुरुवात केली. आता मात्र उन्हाची तीव्रता जाणवत होती. भराभर चढाई करून किल्ला गाठला.
तिकोणा उतरून पायथ्याला पोहोचलो. पुढे नियोजनानुसार एका घरगुती हाॅटेलमध्ये दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊन पवनामाईत पोहण्याचा आनंद घेतला. अगदी थोड्याच वेळात हाॅटेलवर येऊन भरपेट न जेवता अल्प जेवण घेतले. जेवणानंतर लगेच सहावा किल्ला कोरीगडच्या दिशेने मार्गस्थ झाले.
रस्त्यात अजिवली येथे शिवसम्राट प्रतिष्ठान यांनी दहाव्या वर्षपुर्तीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. तेथे धावती भेट दिली. लगेच पुढील प्रवास करून कोरीगडच्या पायथ्याशी पोहोचलो. दुपारी अडीच वाजता कोरीगड चढाईला सुरुवात केली.तीन वाजता चढाई पूर्ण करून उतरवण्यास प्रारंभ केला. साडेतीन वाजता पायथ्याशी पोहोचलो. लगेच शेवटचे लक्ष तुंग किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरू करून बरोबर पावणे पाच वाजता तुंग उर्फ कठीणगडच्या पायथ्याशी पोहोचलो. तुंग किल्ल्यावर चढाई करून साडेपाच वाजता शिखरावर पोहोचलो.
सदर ठिकाणी सहभागी सर्व मावळ्यांच्या चेहर्यावर खूपच समधान जाणवत होते. आपण या ऐतिहासिक मोहिमेचा एक भाग आहोत या आनंद गगनात मावत नव्हता. अक्षरशः उड्या मारून आनंद साजरा केला. दिवसभर एवढी चढाई केली याचा थकवा अजिबात जाणवत नव्हता.
सायंकाळी साडे सहा वाजता तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचवले .
तेथेच एका हाॅटेलवर रात्रीच्या भोजनाची सोय केली होती. रात्रीचे जेवण करून परतीचा प्रवास सुरू केला.