कवींनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे
पिंपरी : “संत हेदेखील मूळचे साहित्यिक होते. आपल्या भक्तिरचनांद्वारे त्यांनी प्रबोधन केले. त्यामुळे कवींनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे!” असे आवाहन विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक व्यंकटराव वाघमोडे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमी, जुना मुंबई – पुणे हमरस्ता,  चिंचवड स्टेशन येथे व्यक्त केले.
ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी महोत्सवाचे औचित्य साधून काव्यात्मा साहित्य परिषद – पुणे आणि राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कविसंमेलनात व्यंकटराव वाघमोडे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप गायकवाड, काव्यात्मा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आत्माराम हारे, राष्ट्रमाता जिजाऊ अकॅडमीचे संचालक प्रा. सादू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी प्रदीप गायकवाड यांनी, “कवी हे खूप धाडशी असतात; कारण आपली मते ते निर्भीडपणे मांडतात!” असे मत व्यक्त केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कविसंमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. नंदकुमार मुरडे, शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, जयश्री श्रीखंडे, सुहास घुमरे, योगिता कोठेकर, अरुण कांबळे, विवेक कुलकर्णी, हेमंत जोशी, संभाजी रणसिंग, मच्छिंद्र सुरंगे, दीपक अमोलीक, उपेंद्र बिसेन, भगवान गायकवाड, सीमा गांधी, दादाभाऊ ओव्हाळ, संदीप जोगदंड, वसंत घाग, माधव पाटील, समीर किशोर, किसन म्हसे, योगेश सरदार, अशोक सोनवणे या कवींनी गीत, गझल, भजन, मुक्तच्छंद, विडंबन अशा प्रकारातील वैविध्यपूर्ण आशयांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. विशेषतः सुनीता घोडके आणि अरुण घोडके या ज्येष्ठ दांपत्याने कवितांची जुगलबंदी सादर करून कविसंमेलनाची रंगत वाढवली.
रसिकांच्या वतीने सुरेश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. आत्माराम हारे यांनी विविध संदर्भ उद्धृत करीत बहारदार सूत्रसंचालन केले. काव्यात्मा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष संजय साळुंखे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!