ध्यानामुळे मन स्थिर होते
पिंपरी: “सुयोग्य ध्यानामुळे मन स्थिर होते अन् त्यातून भगवंताची प्राप्ती होते!” असे प्रतिपादन कीर्तनकार मकरंदबुवा करंबेळकर यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे केले.
श्री समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड आयोजित समर्थ रामदासस्वामी पादुकांच्या आगमनानिमित्त मकरंद करंबेळकर यांनी कीर्तनसेवा रूजू करताना गोसावीनंदनमहाराज यांच्या “देव गजानन ध्यायी…” या भक्तिरचनेवर निरूपण केले. पूर्वरंगात त्यांनी चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात समर्थ रामदासस्वामी, जगद्गुरू तुकोबाराय आणि मोरयानंदनमहाराज यांनी भोजनसमयी आपल्या उपास्य दैवतांना सहभोजनासाठी आवाहन केले होते तो प्रसंग कथन केला. हिंदूधर्मात तेहेतीस कोटी देव मानले जातात; परंतु येथे ‘कोटी’ या शब्दाचा अर्थ प्रकारचे असा असून ‘यत्न तो देव जाणावा!’ या उक्तीवर समर्थांचा विश्वास आहे, असे सांगितले. करंबेळकर यांना बाळासाहेब चव्हाण (हार्मोनियम), विश्वनाथ पुरोहित (तबला) आणि अभिषेक दामले (स्वरसाथ) यांनी साथसंगत केली. दुपारी वैदेही भजनी मंडळाने भजनसेवा रुजू केली.
त्यापूर्वी, शुक्रवार, दिनांक ०९ डिसेंबर रोजी सज्जनगड येथून रामदासस्वामींच्या पादुकांचे आगमन झाले. भव्य स्वागतकमानी उभारून, पारंपरिक वेशभूषेतील महिला लेझीमपथक आणि मंगलदायी शंखनाद करीत मिरवणूक काढून, पुष्पवृष्टी करीत आणि पंचायतीने ओवाळून पादुकांचे भाविकांनी उत्साहात स्वागत केले.
याप्रसंगी सज्जनगड येथे होणारे सर्व दैनंदिन धार्मिक विधी शनिवार, दिनांक १६ डिसेंबर २०२३ पर्यंत मनोहर वाढोकर सभागृहात केले जातील, अशी माहिती श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या संस्थेचे कार्यवाह योगेशबुवा रामदासी यांनी दिली. सकाळी ६:०० वाजता होणाऱ्या काकड आरतीपासून ते रात्री ९:३० वाजता संपन्न होणाऱ्या शेजारतीदरम्यानच्या पादुकापूजा, सांप्रदायिक भिक्षा फेरी, भजनसेवा, कीर्तन आणि प्रवचन या धार्मिक विधींचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन