गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि साहित्य फराळ
पिंपरी:
दिलासा साहित्य सेवा संघाच्या व्हॉट्सअॅप समूहावरील साहित्यिकांनी चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि साहित्य फराळ वितरण तसेच गुरुकुलम् साठी ५६ खुर्च्या प्रदान केल्यात.
कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, डॉ. पी. एस. आगरवाल, शोभा जोशी, कैलास भैरट, सुभाष चव्हाण, दिलासाचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सर्व समूहाच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली. यावेळी उपक्रमात सहभागी असलेल्या नंदकुमार मुरडे, राधाबाई वाघमारे, अशोकमहाराज गोरे, नीलेश शेंबेकर, मुरलीधर दळवी, योगिता कोठेकर, सुहास घुमरे, जयश्री श्रीखंडे, मानसी चिटणीस, बाजीराव सातपुते, बाळकृष्ण अमृतकर या साहित्यिकांची सभागृहात उपस्थिती होती.
याप्रसंगी श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, “समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर असलेल्या भटक्याविमुक्त विद्यार्थ्यांसाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून मदत देताना समाजऋणातून अंशतः उतराई होण्याचे समाधान साहित्यिकांना लाभले आहे!” अशी भावना व्यक्त केली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी, “साहित्यिकांनी नुसते लिहून न थांबता व्यक्त व्हायला अन् कृती करायला शिकले पाहिजे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. पी. एस. आगरवाल यांनी, “दिवाळीत फराळाइतकेच दिवाळी अंकांचे महत्त्व आहे म्हणून विद्यार्थ्यांना फराळासोबत दिवाळी अंक आणि पुस्तकांचा साहित्य फराळ दिला आहे!” असे सांगितले.
गिरीश प्रभुणे यांनी, “साहित्यिक हे शब्दरूपाने सतत समाजाला वैचारिक धन देत असतात; परंतु आजचा कार्यक्रम आगळावेगळा आहे. डोक्यावरील आभाळ सोडून दुसरे काहीही ज्यांच्या स्वतःच्या मालकीचे नाही अशी मुलं आपण दिलेल्या खुर्च्यांवर बसून स्वप्नपूर्तीसाठी झटतील!” असा आशावाद व्यक्त केला.
मान्यवर आणि पाच प्रातिनिधिक विद्यार्थी यांच्या हस्ते पुस्तकांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कैलास भैरट यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, मोबाइलवर असंख्य व्हॉट्सअॅप ग्रुप  आहेत; पण असा विधायक उपक्रम करणारा दिलासा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे याचा आनंद वाटतो. त्यांनी उपक्रमात सहभागी साहित्यिकांच्या यादीचे वाचन केले. यावेळी गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांसोबत साहित्यिकांनी फराळाचा आस्वाद घेतला; तसेच शंकर पवार, शामराव सरकाळे, शोभा जोशी, शाहीर आसराम कसबे यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी बालगीते, कविता आणि शाहिरी कवनांचे सादरीकरण केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी आभार मानले.

error: Content is protected !!