दीपोत्सवातून शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
पिंपरी:
छत्रपती शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी खिंवसरा – पाटील शैक्षणिक संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा संगीत नाट्याचे उत्कृष्ट सादरीकरण करीत दीपोत्सव साजरा केला.
याप्रसंगी पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, सदस्य ॲड. मीनल दर्शले, ॲड. अय्याज शेख, ॲड. मंगेश खराबे, ॲड. मोनिका गाढवे, ॲड. शंकर घंगाळे, ॲड. विवेक राऊत, ज्ञानदीप एज्युकेशनलचे संचालक दत्तात्रय यादव, पिंपरी – चिंचवड जिल्हाध्यक्ष राहुल आहेर, आत्मजा फाउंडेशनच्या समन्वयक प्रिया गुरव, वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्या विदुला पेंडसे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, संचालक सदस्य आसराम कसबे, शालासमिती अध्यक्ष नितीन बारणे इत्यादी मान्यवर तसेच मुख्याध्यापक नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, आशा हुले, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी याचबरोबर बहुसंख्येने पालकवर्ग, विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.
“एक दिवा जिजाऊ मातेसाठी…” , “एक दिवा छत्रपती शिवरायांसाठी…” ,
“एक दिवा हिंदवी स्वराज्यासाठी…” , “एक दिवा भगवतगीतेतील विश्वरुप दर्शनासाठी…” असा जयघोष करीत सोहळ्यात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
शिवराज्याभिषेक सोहळा नाट्यात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा, अफजलखान वध, राज्याभिषेक करण्यामागील कारणे, राज्याभिषेकाची जय्यत तयारी, प्रत्यक्ष गागाभट्टांनी शिवरायांवर केलेला राज्याभिषेक सोहळा, यज्ञ, होमहवन, शिवरायांना सिंहासनावर विराजमान होताना स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांचे झालेले स्मरण अशा विविध प्रसंगांबरोबरच कथानकाला साजेसे नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी शाहीर आसराम कसबे यांच्या विश्वरूप दर्शन घडविणार्या भगवतगीतेच्या ११व्या अध्यायाच्या केलेल्या गीतलेखनाच्या ध्वनी चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन केले. यावेळी इयत्ता आठवीतील आकांक्षा रोडे आणि पंकज काळे यांनी रायगड किल्ल्याची माहिती सांगितली. प्रा. दिगंबर ढोकले यांनी प्रदूषण वाढविणारे फटाके वाजवू नका, असे आवाहन केले. किल्ला बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी कौतुक केले. पालकांनी बनवलेल्या झेंडू फुलांच्या माळांची सजावट, रेखाटलेली सुरेख रांगोळी, रायगड किल्ला प्रतिकृती, विद्यार्थ्यांनी बनवलेले कागदी आकाशकंदील, रंगवलेल्या पणत्यांनी उजळलेले आसमंत, शिवराज्याभिषेक सोहळ्याचे त्रिमितीय फलकलेखन, दिवाळी शुभेच्छा देणारे फलकलेखन, पारंपरिक वेशभूषेतील पालकांची उपस्थिती यामुळे कार्यक्रमाच्या आनंदाने एक उंची गाठलेली होती.
त्या आनंदाला शिखरावर नेले ते शिवराज्याभिषेक सोहळ्यातील विद्यार्थ्यांची हुबेहुब केलेली वेशभूषा, अभिनय, त्यांचा छत्रचामरासहित तुतारीच्या निनादात शिवरायांचे रंगमंचावरील आगमन, प्रत्यक्ष होमकुंड प्रज्वलित करून झालेला राज्याभिषेक विधी, शिवपिंड प्रतिकृतीला साक्ष मानून केलेली स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, अफजल खान वधाचा थरार,
लक्षवेधक नृत्य आणि विशेष म्हणजे हे सर्व प्रसंग किल्ले रायगडाने आत्मवृत्त निवेदनातून उलगडत नेल्याने सर्व प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले गेले. शेवटी उस्फूर्तपणे झालेल्या शिवगर्जनेने आणि जयजयकाराने सारा परिसर निनादून गेला. विश्वरूप दर्शन घडविणार्या भगवद्गीतेतील ११ व्या अध्यायातील गीतरचनेचा काही भाग आसराम कसबे यांनी साभिनय सादर केला.
सहशिक्षिका पूजा चांदेकर यांनी सूत्रसंचालन केले. यांनी केले. स्मिता जोशी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी आभार मानले.