‘पाली – मराठी शब्दकोश’ लवकरच वाचकांना उपलब्ध
पिंपरी :
पाली ही भारतातील प्राचीन भाषा आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी आपले मूळ विचार पाली भाषेत मांडले, असे मानले जाते. त्यामुळे साहजिकच भाषातज्ज्ञ, व्यासंगी अभ्यासक आणि विद्यार्थी यांच्यासाठी पाली भाषा जाणून घेणे खूप गरजेचे होते.
ही बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ साहित्यिक बाबा भारती यांनी सुमारे पंचवीस हजार शब्दांचा समावेश असलेला ‘पाली – मराठी शब्दकोश’ हा ग्रंथ सिद्ध केला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभलेल्या या शब्दकोशाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने १९९७ साली करण्यात आले होते.
सदरहू ग्रंथाची वाढती मागणी लक्षात घेऊन महेंद्रनाथ भारती यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रभादेवी, मुंबई येथे दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यात यावी याविषयी पत्राद्वारे विचारणा केली होती.
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर येथे ‘पाली – मराठी शब्दकोश’ या ग्रंथाचे पुनर्मुद्रण करण्यात आले असून लवकरच तो वाचक आणि अभ्यासक यांना उपलब्ध होत आहे, असे महेंद्रनाथ भारती यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!