पुणे :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. पवार हे बारामती तालुका अ वर्ग मतदार संघातून जिल्हा बँकेवर गेली ३२ वर्षे प्रतिनिधीत्व करीत होते.
उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे असलेला वाढता व्याप व राज्यातील पक्ष संघटनेची वाढती जबाबदारी यामुळे मिळणारा अपुरा वेळ विचारात घेऊन पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला असल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले. त्यांचा राजीनामा स्विकारण्यात आला असून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून बारामती तालुका अ वर्ग मतदार संघातून नव्याने संचालक निवडीची प्रक्रिया राबविली जाणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा बँकेची अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखालीच १९९१ पासून नेत्रदीपक आर्थिक प्रगती केली आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील देशातील नंबर एकची बँक म्हणूनही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नावलौकिक मिळवलेला आहे. यापुढे पवार यांचे बँकेला सातत्याने मार्गदर्शन मिळणार आहे. शेड्युल्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांचा दर्जा असणार्या व ज्यांचे कार्यक्षेत्र संपुर्ण देशभर आहे. अशा ५३ शेड्युल्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये एकाच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असणार्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बहुतांश निकषांमध्ये पहिल्या ५ बँकांमध्ये स्थान मिळविले आहे.
जिल्हा बँकेचे १९९१ साली पवार हे संचालक झाले, त्यावेळी बँकेचा एकूण व्यवसाय ५५८कोटी रुपये होता. त्यांच्या नेतृत्वाखाली व तत्कालीन सर्व संचालकांच्या सहकार्याने आजचा बँकेचा व्यवसाय तब्बल २०हजार ७१४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा व्यवसाय देशातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. यापुढेही जिल्हा बँक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सर्वोत्तम बँक म्हणून कार्यरत राहील, असेही प्रा. दुर्गाडे यांनी स्पष्ट केले.