विद्यार्थ्यांनी स्वीकारले १०० देशी रोपांचे पालकत्व
पिंपरी :
खिंवसरा – पाटील विद्यामंदिर, गणेशनगर, थेरगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी सुमारे १०० देशी वृक्षांचे पालकत्व स्वीकारले. दिनांक ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर या सेवासप्ताह कालावधीनिमित्त लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड या सेवाभावी संस्थेच्या वतीने झाडांचे वृक्षालय (ग्रंथालय) हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत लायन्स क्लब इंटरनॅशनल ३२३४ डी-२ प्रांतपाल धनराज मंगनानी, विभागप्रमुख प्रीतम दोशी, भोजापूर गोल्डचे अध्यक्ष डॉ. शंकर गायकवाड, नारायण हट इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मनीषा राक्षे यांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, समिती सदस्य शाहीर आसराम कसबे, मुख्याध्यापक नटराज जगताप यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांकडे विनाशुल्क रोपे सुपुर्द केली.
याप्रसंगी शाळेतील नारायण जगताप स्मृती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात धनराज मंगनानी यांनी, “पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची नितांत गरज आहे!” असे विचार व्यक्त केले. प्रीतम दोशी यांनी, “भावी पिढीला पुरेशा प्रमाणात प्राणवायू उपलब्ध व्हावा म्हणून वृक्षारोपण करणे ही आपली जबाबदारी आहे!” असे मत मांडले.
डॉ. शंकर गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून संतांनी आपल्याला झाडांचे महत्त्व सांगितले आहे, अशी माहिती दिली; तर मनीषा राक्षे यांनी प्रेरणादायी कवितेचे सादरीकरण केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी प्रास्ताविकातून, “आज रोपांच्या रूपाने शंभर बाळं आपल्याला मिळाली आहेत. रोपांसोबत त्यांची माहिती आणि संवर्धनाचे नियम असलेली पत्रके आहेत. एक वर्षभर आपल्याला त्यांचे संगोपन करायचे आहे. त्यांना वाढविताना विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकता येतील!” अशी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी ढोलताशा वादन करून मान्यवरांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि शारदास्तवन म्हणून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गांडूळ प्रकल्पातून निर्माण झालेल्या खताच्या पिशव्या तसेच स्वतः तयार केलेले पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले. समारोप प्रसंगी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ‘महानगरांमधील वाहतूक नियोजन’ या प्रकल्पाची मान्यवरांनी माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमानंतर इयत्ता तिसरीमधील अनुष्का वाहुळे, कार्तिकी गाडे, दीक्षा सरवदे, अश्विनी खिलारे, श्रावणी डोंबे, हर्षवर्धन कुंभार आणि प्रतीक सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या मनाने प्रश्नावली तयार करून मान्यवर पाहुण्यांची छोटीशी मुलाखत घेतली.
त्यांच्या चुणचुणीतपणाचे कौतुक करीत मान्यवरांनी त्यांना समर्पक उत्तरे देऊन शुभेच्छाही दिल्या.
वीणा तांबे, स्मिता जोशी, कृतिका कोराम, गणेश शिंदे, संदीप बरकडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. सीमा आखाडे यांनी सूत्रसंचालन केले. आसराम कसबे यांनी आभार मानले.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन