वडगाव मावळ:
मोरया महिला प्रतिष्ठानने सिनेक्राॅन कंपनीकडे महिलांच्या शिक्षण व रोजगारासाठी मदतीची मागणी केली. मावळ तालुक्यातील महिला सबलीकरणावर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना भेट देण्यासाठी सिंगापूर येथील सिनेक्राॅन कंपनी व्यवस्थापिका मेयांग आणि अमेरिकेतील ऍनिटेनिया मेनेटा तसेग भारतातील सिनेक्राॅन कंपनीच्या मॅनेजर डायरेक्टर शिखा आहुजा यांच्या कडे ही मागणी करण्यात आली.
या सर्व पदाधिकारी वडगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आल्या असता आपली पारंपरिक संस्कृती असलेली पैठणी साडी,नथ, जिजाऊंची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी त्यांचे स्वागत केले.
आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने सिनेक्राॅन कंपनीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात शिलाई मशीन व संगणक संचांचे मोठ्या प्रमाणावर विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांना वाटप करण्यात आले आहे.
वडगाव शहरातील विविध जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही महिन्यांपूर्वी मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने सिनेक्राॅन कंपनीकडे संगणकांची मागणी केली असता सिनेक्राॅन कंपनी प्रशासनाने दहा संगणक संच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोरया प्रतिष्ठान कडे सूपूर्द केले होते. याचाच भाग म्हणून महिला वर्गासाठी प्रतिष्ठान करीत असलेल्या सामाजिक क्षेत्रातील विविध विधायक कामे तसेच प्रशिक्षणांची माहिती या कंपनी अधिकाऱ्यांना देण्यात आली.
यावेळी मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, उपाध्यक्षा चेतना ढोरे, कार्याध्यक्षा प्रतिक्षा गट, नगरसेविका पुनम जाधव, अंजुमताई पिंजारी, सुषमा जाजू, कविता नखाते, छायाताई जाधव, जयश्री जेरतागी, सुरेखा गुरुव, विजयाताई माळी, प्रमिला पोटे, प्रतिक्षा ढोरे आदी उपस्थित होत्या.
येणाऱ्या कालावधीत सिनेक्राॅन कंपनीकडून वडगाव शहरातील महिला भगिनींसाठी रोजगार उपलब्ध करावा अशी विनंती अबोली ढोरे यांनी केली असता येत्या काही महिन्यात महिला सबलीकरणासाठी सहकार्य करणार असल्याचे नमूद केले.