विश्व हिंदू परिषदेच्या वतीने शौर्य जागरण यात्रेचे आयोजन
पिंपरी:
विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने शनिवार, दिनांक ३० सप्टेंबर ते शनिवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत श्री छत्रपती शिवाजीमहाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे ३५०वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषद स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष अशा दोन अमृतयोगी घटनांचे औचित्य साधून संपूर्ण भारतात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आयोजित केलेल्या शौर्य जागरण यात्रेचे पुणे जिल्हा, पिंपरी – चिंचवड आणि पुणे शहर परिसरात आगमन होणार आहे.
शौर्य जागरण यात्रेचे उद्घाटन शिवनेरी जुन्नर येथे दि ३० सप्टेबर होणार असून पिंपरी – चिंचवड परिसरातील देहूरोड येथे मंगळवार, दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता शौर्य यात्रेचे आगमन होईल. देहू – रूपीनगर, घरकुल – चिखली – मोशी या मार्गाने यात्रा क्रमण करणार आहे. यामध्ये दुपारी रूपीनगर आणि सायंकाळी मोशी येथे सभा संपन्न होतील.
बुधवार, दिनांक ०४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:३० वाजता इंद्रायणीनगर – संत तुकारामनगर, आकुर्डी या मार्गाने यात्रा क्रमण करणार असून यादरम्यान दुपारी चिंचवड आणि सायंकाळी काळेवाडी येथे जाहीर सभा संपन्न होतील.
गुरुवार, दिनांक ०५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९:०० वाजता पिंपरी – कासारवाडी – भोसरी – दिघी – आळंदी या मार्गावरून यात्रा क्रमण करणार असून दुपारी कासारवाडी आणि सायंकाळी आळंदी येथे जाहीर सभा संपन्न होतील.
समस्त हिंदू तरुण, देशभक्त अन् राष्ट्रप्रेमी हिंदू बांधव आणि राष्ट्रपुरुष शिवबांना घडविणाऱ्या जिजाऊ माँसाहेब यांच्याशी नाते सांगणाऱ्या माता-भगिनींनी लाखोंच्या संख्येने या शौर्य जागरण यात्रेत सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन प्रांत मंत्री प्रा. संजय मुदराळे, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रांत संयोजक लहूकुमार धोत्रे, प्रांत सहसंयोजक नितीन महाजन, विभाग संयोजक नाना सावंत यांनी केले आहे. अशाच यात्रा कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि नगर विभाग येथूनही याच काळात काढण्यात येणार आहेत. या पाचही यात्रांमध्ये आकर्षक सजवलेला भव्य रथ  असणार आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी नितीन महाजन (भ्रमणध्वनी – ८००७७०६००४) यांच्याशी संपर्क साधावा, असे संयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!