क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात स्वातंत्र्यदिन साजरा
पिंपरी:
“सांस्कृतिक एकात्मता असलेला अखंड भारत पुन्हा उभा राहील असा संकल्प करू या!” असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संपर्कप्रमुख मिलिंद देशपांडे यांनी ‘क्रांतितीर्थ’ , क्रांतिवीर चापेकर वाडा, चिंचवडगाव येथे मंगळवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी केले.

क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयात ७६व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मिलिंद देशपांडे बोलत होते. पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. मदनलाल छाजेड, ॲड. अजय यादव, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, कोषाध्यक्ष रवी नामदे, प्रा. दिगंबर ढोकले, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे उपस्थित होते.

मिलिंद देशपांडे पुढे म्हणाले की, “स्वातंत्र्यप्राप्तीसाठी असंख्य ज्ञात – अज्ञात क्रांतिकारकांनी समर्पण आणि सर्वस्वाचे योगदान दिले आहे. सध्या भारत ही जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. लवकरच ती तिसऱ्या स्थानावर आली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करताना जगात भारत प्रथम स्थानावर आला पाहिजे, असा संकल्प माननीय पंतप्रधान यांनी केला आहे. सर्व भारतीयांचे सहकार्य अन् योगदान यांतून हे आव्हान सहज यशस्वी करता येईल.

ॲड. मदनलाल छाजेड यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून चापेकर बंधूंनी राष्ट्राप्रति दिलेल्या योगदानाची तसेच निर्माणाधीन असलेल्या राष्ट्रीय संग्रहालयाची विस्तृत माहिती दिली.

उदय खामकर, आरती शिवणीकर, अतुल आडे, हर्षदा धुमाळ यांनी संयोजनात सहकार्य केले. शाहीर आसराम कसबे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!