सागरामध्ये लहान-मोठ्या लाटा सतत उसळत असतात त्याप्रमाणे मानवी जीवनात सुख-दुःखाच्या लहरी सतत हेलावत असतात. याचाच अर्थ असा की, माणसाला जीवनात सुख-दुःख दोन्ही मिळत असते, परंतु सामान्यपणे माणसे सुख चटकन विसरून जातात व दुःखाचा कोळसा मात्र सारखा उगाळीत बसतात. त्यामुळे जीवनात सुख जवाएवढे व दुःख पर्वताएवढे असे भासते. म्हणून सुख-दुःखाकडे पाहण्याचा जीवनविद्येचा दृष्टीकोन समजून घेणे आवश्यक आहे.*

 *सुख हे मानण्यात आहे या कल्पनेतच मानवजातीच्या सर्व दुःखाचे मूळ आहे.*

 *माणसे माणसांबरोबर माणसांसारखी वागतील तर माणसांच्या सर्व समस्या सहज सुटून ती सर्वांगाने व सर्वार्थाने सुखी होतील.*

 *”इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दु:ख दडलेले आहे, या सत्याची खऱ्या अर्थाने खरी जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती होणे शक्य नाही.*

 *संसारात सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नसतात, हे सत्य लक्षात ठेवून मनाविरूद्ध घडणाऱ्या घटना शुभ स्मरणात तात्काळ विसरून जाणे, हा संसारात सुखी होण्याचा राजमार्ग होय.*

 *सुखाची इच्छाच माणसाला सुखापासून दूर-दूर नेत शेवटी दुःखाच्या खड्ड्यात नेऊन सोडते.*

 *सर्व सुखाचा आराम असा जो ‘हृदयस्थ राम’ त्याचा विसर पडल्यामुळे “रमी,रम व रमा” या त्रयींच्या कात्रीत जीव कातरला जात आहे.*

 *प्रापंचिक सुख मिळविण्यासाठी खूप धडपड करावी लागते, तर पारमार्थिक सुख प्राप्त करून घेण्यासाठी नुसते ‘निवांत’ रहाण्याची आवश्यकता आहे.*

 *अपवादात्मक परिस्थिती वगळता आपल्या सुखाला किंवा दुःखाला आपणच जबाबदार असतो.*

 *जीवनातील उणीवा लक्षात घेऊन माणसाने दुःखच करायचे ठरविले तर त्याच्या दुःखाचा अंत करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा नाही.*

 *देहाच्या कपाटात स्मरण आणि विस्मरण हे दोन खण असतात.संसारातील कुठल्या गोष्टी कुठल्या खणात टाकायच्या यावर संसारातील सुख-दुःख अवलंबून असते.*

 *एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे,हा सर्वांनी सुखी होण्याचा राजमार्ग होय.*

 *सुखाचा शोध करण्यास आपण ज्या क्षणापासून सुरूवात केली त्याच क्षणापासून आपल्या दुःखाला प्रारंभ झाला.*

 *बहिर्मन व अंतर्मन या दोघांत जेव्हा संवाद असतो तेव्हा जीवनात सुखाचा सुकाळ होतो; परंतु जेव्हा या दोघात वितंडवाद होतो तेव्हा जीवनात सुखाचा दुष्काळ होतो.*

 *केवळ परमार्थासाठीच प्रपंच करणे, हा संसार सुखाचा करण्याचा राजमार्ग होय.*

 *अलक्ष्याकडे लक्ष्य देणे हा ‘लक्षाधीश’ होण्याचा मार्ग, तर उत्खनन करून ‘मी’ला खणून काढणे हा सुखाची खाण प्राप्त करून घेण्याचा राजमार्ग.*

 *सुख प्राप्तीचे प्रयत्न हेच दुःखाला आमंत्रण होय.*

 *ज्याने सुखाची धारणा होते, ती सुधारणा.*

 *सुखाला कारण विचार तर दुःखाला कारण अविचार.*

 *सुखाची सोय करणारे ते सोयरे व दुःखात सहभागी होणारे ते धायरे.*

 *राम म्हणजे आत्माराम, जो सर्व सुखाचा आराम.*

 *चित्ताच्या सर्व वृत्ती भगवन्नामांत स्थिर करणे,हा सर्व सुखाचा राजमार्ग होय.*

 *सुखाचा मार्ग अगदी जवळ व सरळ आहे, तर दुःखाचा मार्ग दूर व वाकडा आहे.*

 *दाम आणि नाम हे मानव पक्षाचे दोन पंख असून त्यांच्याच सहाय्याने माणसाला जीवनाच्या आकाशात सुखाने विहार करता येतो.*

 *जे लोक सुख मिळविण्यासाठी कशाच्याही मागे पळत सुटत नाहीत, त्यांच्यामागे ‘माझा स्वीकार करा हो”,असे म्हणत सुख धावत असते.*

 *”निवांत होणे” ही देवाच्या प्राप्तीची व सुखी जीवनाची गुरूकिल्ली आहे.परंतु सामान्य माणसाला हे जमत तर नाहीच पण तो नेमके याच्या उलट करीत असतो.*

सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!