तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्याने देशाचा विकास होईल: पद्मश्री पोपटराव पवार
पिंपरी:
“तंत्रज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्याने देशाचा विकास होईल!” असे मत  महाराष्ट्र राज्य आदर्शगाव संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद आयोजित भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात पोपटराव पवार बोलत होते. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी तळेगाव-दाभाडे येथील आर. एम. के. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.चे संस्थापक रामदास काकडे यांना भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर रावी डिव्हायसेस इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र डोमाळे यांना (उद्योगभूषण पुरस्कार), शिरूर तालुक्यातील आदर्शग्राम करंजीच्या सरपंच सोनाली किरण ढोकले यांना (ग्रामभूषण पुरस्कार), रावेत येथील दीपक भोंडवे यांना (युवा कृषी उद्योगभूषण पुरस्कार), शिक्रापूर येथील हॉटेल गुडलक ॲण्ड ढाबाचे नीलेश रामाणे यांना (उद्योग विकास पुरस्कार) आणि पिंपरी – चिंचवडमधील श्री सिद्धिविनायक वडापाव समूहाचे अमर लाड यांना (युवा उद्योजक पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, ग्रंथ आणि शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
 
वृक्षपूजन आणि तिरंग्याला वंदन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
स्वागताध्यक्ष सुदाम भोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “युवा पिढीला ऊर्जा मिळावी हाच पुरस्कारांचा उद्देश आहे!” अशी भूमिका मांडली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पुरस्कारार्थींशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

सत्काराला उत्तर देताना रामदास काकडे यांनी, “जे. आर. डी. टाटा यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन तळेगाव येथे सर्वांच्या सहकार्याने ६००० एकराची औद्योगिक वसाहत उभारली. टाटा हे उद्योग जगतातील खूप मोठे नाव आहे!” अशी भावना व्यक्त केली. मनोहर पारळकर यांनी, “पेशा म्हणून उद्योगाचा स्वीकार करणे हे अतिशय धाडसाचे काम आहे. खेडी स्वयंपूर्ण झाली तर माणसे शहराकडे धाव घेणार नाहीत!” असे मत व्यक्त केले.

पोपटराव पवार यांनी आदर्शगाव हिवरेबाजार येथे राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना पुढे सांगितले की, “पाणी, शेती, भूविकास हेदेखील सेवाक्षेत्र आहेत. एकेकाळी समृद्ध असलेल्या पंजाबला आता पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे गावांकडे दुर्लक्ष केल्यास शहरातील नागरिक स्वास्थ्यपूर्ण जगू शकणार नाहीत. आपल्या उत्पन्नातील खूप मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी खर्च करणारा उद्योगसमूह अशी टाटा उद्योगसमूहाची ख्याती आहे!” सचिन ईटकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “भारत आत्मनिर्भर झाला पाहिजे असे स्वप्न जे. आर. डी. टाटा यांनी शंभर वर्षांपूर्वी पाहिले होते. त्यामुळे जे. आर. डी. टाटा हे खऱ्या अर्थाने महानायक होते!” असे गौरवोद्गार काढले.

अरुण गराडे, सुरेश कंक, जयवंत भोसले, धनंजय सोलंकर, वर्षा बालगोपाल, प्रदीप गांधलीकर, प्रभाकर वाघोले, शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी यांनी संयोजनात सहकार्य केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!