निद्रा आणि जागृती
व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणे माणसांचे वेगवेगळे प्रकार असतात.त्याप्रमाणे ‘निद्रा आणि जागृती’ या संदर्भात सुद्धां माणसांचे निरनिराळे प्रकार दिसून येतात.माणसांचा पहिला प्रकार असा की,ते झोपेतून आपोआप जागे होतात आणि कामाला लागतात.दुसऱ्या प्रकारची माणसे अशी असतात की,त्यांना नुसती हाक जरी मारली तरी ते तात्काळ जागे होतात.
माणसांचा तिसरा प्रकार असा की,त्यांना हलवून जागे केले तरी ती पुन्हां झोपतात,तर माणसांचा चौथा प्रकार असा की, त्यांच्या कानाकडे नगारे वाजविले तरी ते जागेच होत नाहीत. परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धां माणसांचा असाच प्रकार आहे. जन्माला आलेली बहुतेक माणसे मायेच्या प्रभावामुळे म्हणजेच स्वरुपाचा विसर पडल्यामुळे स्वरूप विस्मृतीरूप निद्रेच्या आहारी गेलेले असतात.
यापैकी कांही माणसे अत्यंत पुण्यवान असतात.त्यांचे पूर्व पुण्य फळाला येते व त्यांना स्वस्वरुपाची आपोआप सहजपणे जाग येते,म्हणजेच त्यांना स्वस्वरुपाचा साक्षात्कार होतो.येथे त्यांना कोणीही जागे केलेले नसते. याचाच अर्थ असा की,त्यांना स्वस्वरुपाची जागृती आणण्यासाठी देहधारी सद्गुरूंची आवश्यकता नसते.म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,*
*तुका म्हणे मज न घडता सेवा।*
*पूर्व पुण्य ठेवा ओढवला ।।*
तुकाराम महाराजांना देहधारी सद्गुरू नव्हते व असे असून सुद्धां त्यांना स्व-स्वरूप विस्मृतीच्या गाढ झोपेतून पुण्याईच्या बळावर आपोआप जाग आली.परंतु अशा प्रकारची माणसे ही अलौकिक व असामान्य असून अपवादात्मक असतात.माणसांचा दुसरा प्रकार जरा वेगळा असतो.ही माणसे कांही प्रमाणात पुण्यवान असतात व उत्तम साधकही असतात.यांना जागे करण्यासाठी सद्गुरुंना फार कष्ट घ्यावे लागत नाहीत.
सद्गुरुंनी उपदेश केला की या लोकांना त्वरित स्व-स्वरूप जागृती होते.परंतु या प्रकारचे साधक सुद्धां दुर्मिळ असतात.माणसांचा तिसरा प्रकार असा की,सद्गुरुनी उपदेश केल्यानंतर त्यांना अल्प प्रमाणात स्वरूप जागृती होते; परंतु अहंकाराधीन होऊन किंवा कुसंगतीमुळे ही माणसे पुन्हां स्वरूप विस्मृतीरूप निद्रेच्या आधीन होतात.माणसांचा चौथा आणि शेवटचा प्रकार असा की, सद्गुरुंनी कितीही उपदेश केला किंवा मार्गदर्शन केले किंवा साधना शिकविली तरी त्याचा कांहीही उपयोग होत नाही.मायेच्या आधीन झालेली व विस्मृतीरूप निद्रेत गाढ झोपी गेलेली ही माणसे जागीच होत नाहीत.या प्रकारची माणसे प्रचंड प्रमाणावर असतात व मानव जातीची हीच खरी डोकेदुखी आहे.*
सद्गुरू श्री वामनराव पै
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन