शिवराज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त
पिंपरी:
“शिवराज्याभिषेकामुळे स्वराज्याला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले!” असे विचार युवा इतिहास संशोधक डॉ. केदार फाळके यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले.

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने आयोजित केलेल्या ‘श्री शिवराज्याभिषेक : हिंदू अस्मितेचा आविष्कार’ या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. केदार फाळके बोलत होते. समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सदस्य अशोक पारखी, डॉ. अनू गायकवाड, नितीन बारणे, शाहीर आसराम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होते.

तसेच क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शाळांमधील शिक्षकवृंदाची सभागृहात उपस्थिती होती. याप्रसंगी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे पायदळातील सरसेनापती येसाजी कंक यांचे चौदावे वंशज सिद्धार्थ कंक आणि आकाश कंक यांना स्मृतिचिन्ह, ग्रंथ आणि शाल प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल विश्व हिंदू परिषद मातृशक्ती पुणे विभाग संयोजिका प्रिया रसाळ यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.

डॉ. केदार फाळके पुढे म्हणाले की, “संपूर्ण आयुष्यभर कोणत्याही सम्राटाचे मांडलिकत्व न पत्करणारे शिवाजीमहाराज हे तत्कालीन सार्वभौम राजे होते. औरंगजेबाने हिंदुस्थानातील अनेक राजे – महाराजे यांना मांडलिक केले. पाचशे हिंदू मंदिरांची विटंबना केली. जिझिया कर लादला. हिंदूंवर अत्याचार केले. या विरोधात शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली.

पूर्वी कधीही रक्तपात झालेला नाही अशा दृष्टीने पावन, पवित्र रायगडावर आपले तख्त उभारले. शनिवार, दिनांक ०६ जून १६७४ रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १५९६ या तिथीला शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. १९ मेपासून या सोहळ्याच्या विविध विधींचा प्रारंभ झाला होता. सर्वत्र यवनांचे राज्य असताना एक मराठा राजा सार्वभौम राजा झाला, ही जगाच्या दृष्टीने असामान्य बाब होती. शिवराज्याभिषेकामुळे हजारो वर्षांनी मुघल साम्राज्याला आव्हान देणारी गोष्ट साध्य झाली!” चित्रफितीच्या माध्यमातून डॉ. केदार फाळके यांनी शिवराज्याभिषेकाची अतिशय सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली. शाहीर योगेश आणि कवी भूषण यांच्या कवनांचे सादरीकरण करून त्यांनी आपल्या व्याख्यानाचा समारोप केला.

प्रतिमापूजन, प्रज्ञा फुलपगार यांनी गायलेले सांघिक पद्य, गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांचे शिवस्तवन आणि शाहीर आसराम कसबे यांनी सादर केलेल्या शिवगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविक केले. ॲड. सतिश गोरडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. आरती शिवणीकर, अतुल आडे, गुरुकुलम् मधील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

error: Content is protected !!