भुस्खलनचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी उपाय योजना करा: आमदार सुनिल शेळके
आमदार सुनिल शेळके यांची औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत मागणी
ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करा
वडगाव मावळ :
अतिवृष्टीमुळे मावळ तालुक्यातील भूस्खलनाचा धोका असलेल्या गावांमध्ये दुर्घटना होऊ नये यासाठी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करा.या गावांचा गांभीर्याने विचार करुन राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत,अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार सुनिल शेळके यांनी अधिवेशनात (गुरुवार दि.२७) मांडली.
आमदार शेळके म्हणाले ,”
यापूर्वी माळीण दुर्घटनेनंतर प्रशासनाने एक सर्वेक्षण केले होते.त्यामध्ये मावळातील अनेक गावांना भूस्खलनाचा धोका असल्याचा अहवाल देण्यात आला होता.या सर्वेक्षणानुसार मावळ तालुक्यातील भुशी, बोरज,ताजे,गभाले वाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग,मालेवाडी, लोहगड,पाले ना.मा.,नायगाव, साई, वाउंड,कल्हाट, सावळा, टाकवे खु., शिलाटणे,सांगिसे,नेसावे इ.गावांमध्ये भुस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो.तर बोरज,माऊ,भुशी, कळकराई, मालेवाडी,तुंग,लोहगड आणि ताजे ही आठ गावे अतिसंवेदनशील असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास येत आहे.
अशा धोकादायक ठिकाणी एखादी दुर्घटना झाल्यानंतर सरकारकडून नुकसानग्रस्त कुटुंबियांना भरपाई देण्यात येते.तेथील वाडी-वस्तीचे, गावाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार होतो.परंतु एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी आधीच पावले उचलण्याची गरज आहे.याकडे दुर्लक्ष न करता हा धोका गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.”
मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात विविध प्रलंबित प्रश्न मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे.अतिवृष्टीसह अनेक कारणांमुळे भूस्खलनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने मावळ तालुक्यातील अनेक गावांना धोका असल्याचा अहवाल देण्यात आला आहे.
त्यामुळे इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळातील संवेदनशील गावांमधील भूस्खलनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे त्या गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली राहत आहेत.दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावयाच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येतात.परंतु यावर योग्य निर्णय घेऊन कायमचा तोडगा काढला गेला पाहिजे.