शरीर एक दिव्य बॅंक
दैनंदिन जीवनात पैशाचे व्यवहार करताना माणसाचा बँकेशी संबंध येतो.जरूरीप्रमाणे पैसे खर्च केल्यानंतर उरलेले पैसे आपण बँकेत जमा करतो.काटकसरीने जीवन जगणाऱ्या माणसाला सर्वसाधारणपणे पैशाची बचत करता येते.किंबहुना काटकसरीचे जीवन जगून माणसाने जास्तीत जास्त बचत करून बँकेत पैसे जमा करणे आवश्यक असते.

हे बचत केलेले पैसे भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी,लग्न मुंजीसाठी किंवा प्रसंगी डॉक्टरची बिले भरण्यासाठी उपयोगी पडतात. अशी पैशाची बचत न करणाऱ्या माणसांना जेव्हां वरील प्रसंगी पैशाची गरज भासते तेव्हां त्यांना इतरांकडे हात पसरण्याची नामुश्कीची वेळ येते.थोडक्यात, काटकसरीचे जीवन जगून पैशाची बचत करण्यात खरे शहाणपण आहे.

ज्याप्रमाणे माणसाचा बँकेशी संबंध येतो त्याचप्रमाणे मानवी जीवनात माणसांचा दिव्य बँकेशी संबंध येतो.ही दिव्य बँक प्रत्येक माणसाच्या हृदयात वास करून असते व माणसे त्यांच्या जीवनात जी बरी-बुरी कर्मे करतात त्यांचे सूक्ष्म ठसे (Subtle Impressions) उमटले जातात व ते हृदयातील दिव्य बँकेत जमा होतात. या बऱ्याबुऱ्या सूक्ष्म ठशांना ‘पाप-पुण्य’ असे म्हणतात व ते सर्व पाप-पुण्य दिव्य बँकेत जमा करण्याचे कार्य अंतर्मनाकडून (Sub- conscious mind) घडत असते.

हा सर्व प्रकार अत्यंत गुप्तपणे,अचूकपणे,सहजपणे व कुशलतेने शरीराच्या अलौकिक अंतर्गत व्यवस्थेकडून आश्चर्यकारक पद्धतीने घडत असतो. माणसाचे दुर्दैव असे की,हा सर्व प्रकार गुप्तपणे व चोखपणे सतत चालत असतो याची जाणीव त्याला नसल्यामुळे त्याच्या हातून जे घडायला पाहिजे ते घडत नाही व जे घडायला नको त्या अनेक गोष्टी त्याच्याकडून घडत राहतात व त्याचे दुष्परिणाम माणसालाच भोगावे लागतात.

पाप-पुण्य हे शब्द उच्चारले गेले की अनेक लोकांच्या कपाळाला आठ्या पडतात व बहुतेकांना पाप-पुण्याच्या संकल्पना मागासलेपणाच्या वाटतात.अर्थात असे वाटण्याचे महत्त्वाचे कारण हे की, पाप-पुण्याच्या संकल्पनासंबंधी लोकांनी गल्लत केलेली असते. त्याचप्रमाणे पापाला पुण्य व पुण्याला पाप समजण्याची चुकीची पद्धत समाज जीवनात रूढ झालेली आहे. वास्तविक,वस्तुस्थिती अशी आहे की,पाप-पुण्य या दोन्ही संकल्पना काल्पनिक नसून जीवनाशी प्रत्यक्ष संबंधीत आहेत.

किंबहुना ‘पाप-पुण्याचा हिशेब चुकता करणे’ म्हणजेच मानवी जीवन असे म्हटले तर ते अधिक योग्य ठरेल. दुष्कर्मातून पाप निर्माण होते व पापाची परिणती दुःखात होते, याच्या उलट सत्कर्मातून पुण्य निर्माण होते व त्याची परिणती सुखात होते.दुष्कर्म किंवा सत्कर्म दुःख किंवा सुख रूपाने फळण्यापूर्वी ते पाप-पुण्य या स्वरूपात,अंतर्मनाच्या द्वारे हृदयाच्या दिव्य बँकेत जमा झालेले असते.हे पाप-पुण्याचे दिव्य बँकेत जमा झालेले सूक्ष्म ठसे मानवी जीवनात प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थितीची वाट पाहत असतात.

माणसे जीवनात जे अनिष्ट विचार- उच्चार-आचार करीत असतात, ते सर्व,हृदयातील दिव्य बँकेत जमा झालेल्या पापांच्या सूक्ष्म ठशांना प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतात. परिणामी या लोकांची अधोगती व अध: पतन होते.याच्या उलट माणसे इष्ट विचार- उच्चार आचार करतात तेव्हां ईश्वरी बँकेत जमा झालेल्या पुण्याच्या सूक्ष्म ठशांना प्रगट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती प्राप्त होते.

व त्याची परिणती त्यांना सुख,शांती, समाधान,यश व समृद्धी प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरते. या संदर्भात डॉ. मर्फी यांचे खालील विधान चिंतनीय आहे-*

*”When the thoughts deposited in the subconscious mind are harmonious, constructive and peaceful the magic working power of the subconscious mind will respond and bring about harmonious conditions, agreeable surroundings everything.” and the best of everything.”*

*पैशाचे सर्व व्यवहार मानवी बँकेत बहिर्मनाच्या द्वारे केले जातात. याच्या उलट हृदयातील दिव्य बँकेचे पाप-पुण्याचे सर्व व्यवहार अंतर्मनाकडून केले जातात.वर म्हटल्याप्रमाणे हृदयातील दिव्य बँकेचे सर्व व्यवहार अंतर्मनाकडून अत्यंत गुप्तपणे,अचूकपणे, सहजपणे व कौशल्याने होत असतात. जीवनात माणसांना जी सुख-दुःखे भोगावी लागतात त्यांचा संबंध परमेश्वराच्या कृपा किंवा कोपाशी नसतो,तर त्याचा संबंध त्यांनी हृदयातील दिव्य बँकेत जमा केलेल्या पाप-पुण्याशी असतो.
*
जीवनात चांगले घडले की आपण म्हणतो ही ईश्वराची कृपा होय व वाईट घडले की आपण म्हणतो हा देवाचा कोप झाला. प्रत्यक्षात मात्र परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करीत नसतो,मग तो कुठल्याही धर्माचा,वर्णाचा, वंशाचा किंवा जातीचा असो. माणसांना जीवनात सुख,शांती, समाधान,यश व समृद्धी प्राप्त होते त्याला एकमेव कारण ‘पुण्य प्रभाव’ हे होय.याच्या उलट माणसाला जीवनात दुःख,क्लेश,कलह, कटकटी व रोग प्राप्त होतात त्याचे मुख्य कारण ‘पाप प्रताप’ हे होय.

सर्वसाधारण माणसे पाप-पुण्य या संकल्पनांची टिंगल व हेटाळणी करतात व त्याकडे दुर्लक्ष करतात. डोळे मिटून चोरून दूध प्यायले तर आपल्याला कोणी बघणार नाही अशी मांजराची कल्पना असते, परंतु प्रत्यक्षात मात्र धन्याचा पाठीवर बडगा बसल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे पाप-पुण्य या संकल्पनांची टिंगल टवाळी व दुर्लक्ष केल्याने नियतीकडून निसर्गनियमाप्रमाणे अशा लोकांना योग्य ती शिक्षा झाल्याशिवाय राहत नाही.थोडक्यात,मानवी शरीर ही एक अलौकिक दिव्य बँक असून मानवी जीवनात त्याच्या सुख-दुःखाला कशी कारणीभूत ठरत असते हे वरी ल विवेचनावरून लक्षात येईल. याचाच अर्थ असा की,सुखी होणे किंवा दुःखी होणे हे सर्वस्वी माणसाच्याच हातात असते. म्हणूनच जीवनविद्या सांगते-

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.’

सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!