आपला उद्धार आपल्यालाच करायचा: म.भा.चव्हाण
  पिंपरी:
आपला उद्धार आपल्यालाच करायचा आहे!” असे परखड विचार ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले.

गझलपुष्प या संस्थेच्या वतीने म. भा. चव्हाण यांना स्व. सुदामदादा नामदेव कराळे स्मरणार्थ गझलपुष्प जीवनगौरव पुरस्कार २०२३ या सन्मानाने गौरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

तसेच ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, लता कराळे, गझलपुष्पचे अध्यक्ष संदीप जाधव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे विविध साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम रुपये ५०००/- असे सन्मानाचे स्वरूप होते.

“गझलेतील गोटीबंद शेर म्हणजे म. भा. चव्हाण होय! गझल आणि कवितेच्या क्षेत्रातील हे एक चिरतरुण व्यक्तिमत्त्व आहे, या गोष्टीचा गेली सत्तावीस वर्षे मी साक्षीदार आहे!” असे गौरवोद्गार प्रमोद खराडे यांनी काढले; तर राजन लाखे यांनी, “म. भा. चव्हाण यांचे गझल क्षेत्रात क्रांतिकारी योगदान आहे!” असे मत व्यक्त केले.

सत्काराला उत्तर देताना म. भा. चव्हाण पुढे म्हणाले की, “”मागणी आहे नभातल्या तारकांची… वाढवा उंची आपल्या अक्षरांची!”.आपले प्रश्न, आपल्या समस्या सोडविण्यासाठी कोणी संहारक अवतार जन्म घेईल ही अपेक्षा करू नका. आपले प्रश्न आपणच सक्षम होऊन सोडविले पाहिजेत. त्यासाठी…
“छोटा असो की मोठा आवाज वाढवा…
पण दार जिंदगीचे जोरात ठोठवा!”

एकाहून एक बहारदार गझलांचे सादरीकरण करून म. भा. चव्हाण यांनी मैफल जिंकली. रसिकांच्या आग्रहास्तव ‘चंगेजखान’ ही गझल सादर करून त्यांनी आपल्या मनोगताचा समारोप केला. प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. संदीप जाधव यांनी प्रास्ताविकातून पिंपरी – चिंचवडमध्ये मराठी गझलेचा प्रचार अन् प्रसार व्हावा या उद्देशाने सुमारे चार वर्षांपासून गझलपुष्प ही संस्था कार्यरत आहे, अशी माहिती दिली.

नंदकुमार मुरडे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “अधिकाधिक सक्षम आणि प्रतिभावान गझलकार लिहिते व्हावेत यासाठी गझलपुष्पची चळवळ कटिबद्ध आहे!” अशी भूमिका मांडली. प्रा. दिनेश भोसले यांनी पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन केले.

मराठी गझल मुशायरा या दुसऱ्या सत्रात अभिजित काळे यांनी गझलसम्राट सुरेश भट आणि म. भा. चव्हाण यांच्या उत्तमोत्तम शेरोशायरीचे संदर्भ उद्धृत करीत मैफलीचे निवेदन केले. रत्नमाला शिंदे, राधिका प्रेमसंस्कार, विजय उतेकर, संदीप जाधव, प्रा. दिनेश भोसले आणि भूषण अहिर या निमंत्रित गझलकारांनी वैविध्यपूर्ण गझलांचे अप्रतिम सादरीकरण करून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

प्रशांत पोरे, नीलेश शेंबेकर, प्रदीप तळेकर, समृद्धी सुर्वे, सुहास घुमरे, सरोज चौधरी, आदेश कोळेकर, गणेश भुते, रेखा कुलकर्णी यांनी संयोजनात सहकार्य केले.

error: Content is protected !!