भगवन्नाम हा संतांनी दिलेला कोरा चेक

जगात आतापर्यंत शास्त्रज्ञांनी अनेक लहान मोठे शोध लावले. यापैकी बहुतेक शोध उत्कृष्ट असून मानव जातीचा उत्कर्ष साधण्यास कारणीभूत ठरले आहेत.असे जरी असले तरी हे शोध मानव जातीची उन्नती साधून शांती प्रदान करण्यास निष्फळ ठरले आहेत.इतकेच नव्हे तर या शोधांनी गरीबी आणि श्रीमंती यातील अंतर अधिकच रूंद केले आहे.

याच्या उलट संतांनी लावलेला नामाचा शोध हा अक्षरश: अपूर्व आहे.’नाम’ हा संतांनी लावलेला फार मोठा विलक्षण शोध आहे.या नामाने मानव जातीची उन्नती साधणे शक्य असून मानवजातीला शांतीसुखाचे वरदान देण्यास ते समर्थ असते. त्याचप्रमाणे नामाचा अधिकार सर्वांना गरीब,श्रीमंत सर्वांना उपलब्ध आहे.

 *संत घेतात ते नाम व इतर घेतात ते नाम यांत भू-वैकुंठाइतके अंतर असते.*

 *मी व नामी यांना जोडणारा पूल म्हणजे नाम.*

 *अहं आणि सोहं याच्याही पलीकडे आहे नाम आणि नामी.*

 *अंतःकरणातून सतत स्फुरणारे भगवन्नाम म्हणजे प्रत्यक्षात प्रभुच्या प्रेमसुखाचा कारंजाच होय.*

 *माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे काम,तर त्याचा सर्वात मोठा मित्र म्हणजे नाम.*

 *भूलोकापासून महावैकुंठापर्यंत नेणारी भगवन्नाम ही पायवाट आहे.*

 *नाम आणि मन यांच्या मिलनातून जे उदयाला येते ते उन्मन.*

 *नामाचा वसंत देहाच्या वनात शिरला की जीवनाची बाग सुखशांतीच्या फुलाफळांनी बहरून जाते.*

 *भगवन्नामाच्या पोटातून स्वानंद रूपाला येतो व स्वानंदाच्या उदरातून सर्व सद्गुण साकार होतात.*

 *भगवन्नाम हा संतांनी दिलेला कोरा चेक आहे.*

 *नामाच्या आसनावर बसून देव आणि भक्त एकमेकांच्या तोंडात घास घालतात;भक्त देवाच्या तोंडात प्रेमाचा घास भरवतो, तर देव भक्ताच्या मुखात सुखाचा घास घालतो.*

 *नाम म्हणजे नाव,या नावेचा नावाडी भगवान.*

 *देहाकडून देवाकडे वाहणारी उर्ध्ववाहिनी गंगा म्हणजे भगवत्राम.*

 *नाम हे साधन आहे,तसेच ते साध्यही आहे.*

  *जगात सर्व काही मिळेल पण नाम मिळणे कठीण आहे.*

  *नाम एकटे येत नाही तर ते जेथून येते त्यालाच ते बरोबर आणते.*

  *देह आणि अन्न यांचा एकमेकांशी जो संबंध,नेमका तोच संबंध जीव आणि नाम यांचा आहे.*

 *ज्ञानेश्वरीतील नऊ हजार ओव्यांतून माऊलीला फक्त एकच तत्त्व सांगायचे होते आणि ते तत्त्व म्हणजे नाम.*

 *ज्याला नाम गोड लागते तो जीवनमुक्त समजावा.*

 *’नाम’ हा संतांचा प्राण आहे.*

 *भगवन्नाम हा सर्व तीर्थांचा राजा आहे.*

 *नाम-नामी अभेद आहे हे खरे,परंतु हा अभेद नामीकडून आहे हे लक्षात घेणे बरे.*

 *नामाच्याही पलीकडे असणारा नामी प्राप्त करून घेण्याचा सोपा व जवळचा मार्ग म्हणजे “ना-मी” होऊन रहाणे हा होय.*

  *भगवन्नाम म्हणजे स्वानंदाचा कारंजा होय.*

 *नाम म्हणजे भगवंताचे स्मरण.*

 *दृश्य नामरूप हे साधकाला आत्मस्वरूपाचे स्वस्वरूप दाखविणारे आरसे होत.*

 *भगवन्नाम ही एक विलक्षण तलवार आहे,ती अंत:करणात एकदा का फिरू लागली की विचार-विकार,आशा-निराशा, संकल्प-विकल्प या सर्वांचे शिरकाण केल्याशिवाय मनात म्यान होत नाही.*

 *नामाची गोडी लागल्याशिवाय नाम घेतले जात नाही व नाम घेतल्याशिवाय नामाची गोडी लागत नाही,असे हे विचित्र चक्र आहे.*

 *भगवंताचे भक्तीपूर्वक उच्चारलेले नाम हे प्रत्यक्षात प्रभुच्या प्रेमाचे प्रक्षेपणच होय.*

 *अखंड वदे रामनाम सहज घडे प्राणायाम.*

 *कोणीही पाणी प्यावे व तृषामुक्त व्हावे त्याप्रमाणे कोणीही नाम घ्यावे व जीवनमुक्त व्हावे.*

 *नावेत असणारा पाण्यात सुखरूप असतो,त्याप्रमाणे नामात असणारा संसारात आनंदरूप असतो.*

 *हवेत वारा सुप्त आहे पण पंख्याने तो व्यक्त होतो,त्याप्रमाणे देहात देव गुप्त आहे पण नामाने तो प्रगट होतो.*

  *प्रभुप्राप्तीचा सोपा मार्ग म्हणजे नामाचा नंदादीप अंतःकरणात सतत तेवत ठेवणे हा होय.*

  *नाम माझे गुरू,नाम माझे तारू उतरील पैल पारू राम नाम।। नाम माझे तीर्थ नाम माझे क्षेत्र | नाम माझा मित्र कृष्ण नाम।। नाम माझी माता नाम माझा पिता। हरे संसार व्यथा हरि नाम || नाम माझा प्राण नाम माझा जीव | नाम माझा देव सर्व कांही ।। मोर म्हणे नाम पुरवी सर्वकाम जपा रामनाम सर्वकाळ ।।*

 *नामाने प्रपंच चांग होतो आणि परमार्थ सांग होतो.*

 *विठ्ठल नाम अमृताचे पान.*

 *प्रभुचा अंत:करणात संचार झाल्याची खूण म्हणजे आवडीने भावे केलेला भगवन्नामाचा उच्चार.*

 *नाम हा आपला खरा मित्र आहे.*

 *भगवन्नाम हा मंत्र आहे आणि “न घडो कोणाही जीवाचा मत्सर ” हे त्याचे तंत्र होय.*

 *स्त्रीच्या संगाने काम जागृत होतो व शत्रूच्या संगाने क्रोध प्रगट होतो,त्याचप्रमाणे नामाच्या संगाने देवाचे प्रेम निर्माण होते.*

 *अद्वैताचा राजमार्ग म्हणजे भगवन्नाम.*

 *भगवन्नाम हा चिंतामणीपेक्षा अनंतपटीने श्रेष्ठ असा कृष्णमणी आहे.*

 *नाम आणि राम स्वरूपात एक,तर नाम आणि प्रेम रूपात एक आहेत.*

 *आकाशात चंद्र उदयाला आला की सागराला उचंबळून भरती येते,त्याप्रमाणे नामाचा चंद्र चित्ताकाशांत शोभायमान झाला की सुखसागर परमात्मा अंतःकरणात उचंबळून भरारू लागतो.*

 *प्रभुप्रेमाची उर्मी म्हणजे भगवन्नाम.*

 *मिठाने अन्नाला चव येते, त्याप्रमाणे नामाने संसार गोड होतो.*

*सद्गुरू श्री वामनराव पै.*

error: Content is protected !!