*”मोजणी हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय!”*
पिंपरी :
“मोजणी हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि श्री मार्तंड देवस्थान, जेजुरीचे विश्वस्त ॲड. पांडुरंग थोरवे यांनी पिंपरी, नेहरूनगर न्यायालय सभागृह येथे केले.

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन आयोजित कायदेविषयक व्याख्यानमालेत ‘मोजणी’ या विषयावरील व्याख्यानात ॲड. पांडुरंग थोरवे बोलत होते. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. बी. चांडक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मकरंद गोखले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती .

तसेच सभागृहात माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. सुनील कडूसकर, माजी उपाध्यक्ष ॲड. अतुल अडसरे, ॲड. सुजाता बीडकर, ॲड. सारिका परदेसी, ॲड. दत्ता झुळूक, ॲड. रामहरी कसबे, ॲड. ढोरे यांच्यासह असोसिएशनचे आजी-माजी पदाधिकारी, सहकारी वकील बंधू आणि भगिनी यांची उपस्थिती होती.

ॲड. एस. बी. चांडक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “कायदेविषयक व्याख्यानमाला हा पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनने सुरू केलेला अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यामध्ये वेगवेगळ्या विषयांमधील तज्ज्ञांकडून सखोल माहिती मिळत असल्याने विधी व्यावसायिक आणि अभ्यासक यांचे ज्ञान अद्ययावत होते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो!” असे मत व्यक्त केले. ॲड. मकरंद गोखले यांनी शुभेच्छा दिल्या.

ॲड. पांडुरंग थोरवे पुढे म्हणाले की, “मोजणीचा इतिहास हा सिंधू संस्कृतीपासून अस्तित्वात आहे. त्याकाळातील सुनियोजित नगरे काटेकोर भूमापन पद्धतीमुळे उभारली गेलीत. मनुस्मृती, कौटिल्याचे अर्थशास्त्र, सम्राट अशोकाचा कालखंड, छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या काळातील जमीन महसूल आकारणी आदर्शवत होती. त्यानंतर ब्रिटिशकालीन सर्वेक्षण पद्धत अस्तित्वात आली.‌ प्रिंगल या अधिकाऱ्याने जमीन मोजणीसाठी एकर हे परिमाण रूढ केले; तर गुंटर या अभियंत्याने ३३ फूट बाय ३३ फूट हे नवे एकक रूढ केले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘गुंठा’ हे एकक रूढ झाले. इ.स. १८४० मध्ये डेव्हिडसन या अधिकाऱ्याने सर्वप्रथम जमिनीचे मूल्य रुपयांमध्ये नोंदवले.

त्यामुळे भूमापन आणि जमाबंदीच्या इतिहासात तो महत्त्वाचा दस्तावेज मानला जाऊ लागला. १९०१ साली भूमिअभिलेखाची स्थापना करण्यात आली. मानवी जीवनात जमिनीवरच्या मालकी हक्काला खूप महत्त्वाचे स्थान आहे. जमीन ही प्रत्येक देशाची मूल्यवान संपत्ती मानली जाते; कारण जमिनीच्या उत्पादकतेतून निर्माण होणाऱ्या धनामुळे राष्ट्राचा आर्थिक विकास होत असतो. त्यामुळे जमिनीची मोजणी आणि भौगोलिक माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण केले जाते. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत मोजणीसंदर्भातील कायदेशीर तरतुदींचा ऊहापोह केला आहे;

तसेच १९२७ पासून ते आजतागायत १११ मार्गदर्शक परिपत्रके प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. २२ मे २००६ पासून नागरिकांच्या सनदीमध्ये अतितातडीची, तातडीची, साधी आणि अति अति तातडीची मोजणी यांचा कालावधी निश्चित केला आहे!”

याप्रसंगी ॲड. थोरवे यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिलीत; तसेच ‘मोजणी संदर्भातील महत्त्वाची परिपत्रके’ या संकलित पुस्तिकेचे वितरण केले. पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे खजिनदार ॲड. विश्वेश्वर काळजे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. नितीन पवार, ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. अक्षय केदार या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले. ॲड. मंगेश नढे यांनी सूत्रसंचालन केले. असोसिएशनचे सचिव ॲड. गणेश शिंदे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!