खरे सद्गुरू कशासाठी असायला पाहिजेत

श्री सद्गुरू प्रथम आपल्याला जागे करतत कारण झोपेतून जाग आल्याशिवाय पुढील सर्व खटाटोप व्यर्थच ठरतात.

     काय वानू मी या संतांचे उपकार ।
             निरंतर मज जागविती ॥

सामान्य माणसे स्वस्वरूपाच्या ठिकाणी गाढ झोपलेली असतात. त्यांना जाग आणण्याचे महान कार्य खरे संत करीत असतात,

व्यवहारात झोपाळू माणसे व त्यांना उठविण्याचे विविध प्रकार असू शकतात.* उदाहरणार्थ ……

कांही लोक असे असतात की, त्यांना जरी जागे केले व ते उठून बसले तरी दोन मिनिटांत पुन्हा झोपी जातात.

अशाप्रकारे झोपाळू माणसांचे प्रकार म्हणजे प्रत्यक्षात परमार्थात पडलेल्या साधकांचेच निरनिराळे प्रकार आहेत.

कांही साधक असे असतात की, सद्गुरू माऊलीने त्यांना आत्मविस्मृतीच्या झोपेतून जाग आणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा कांहीही उपयोग होत नाही.

दुसऱ्या प्रकारच्या साधकांना सद्गुरुंच्या दिव्य बोधाने जाग येते पण परत ते आत्मविस्मृतीच्या गाढ झोपेत प्रवेश करतात.

तिसऱ्या प्रकारचे साधक सद्गुरुंच्या नित्य प्रयत्नाने उशिरा का होईना पण आत्मस्मृती प्राप्त करून घेतात.

चवथ्या प्रकारचे जे साधक असतात त्यांना आत्मसाक्षात्काराची तळमळ लागलेली असते.
सद्गुरुंच्या दिव्य बोधाने व दिव्य साधनेने त्यांना आत्मस्मृती त्यामानाने लवकर प्राप्त होते.

पांचव्या प्रकारचे जे साधक असतात त्यांना आत्मसाक्षात्काराची तळमळ तर असतेच पण …..
ते सद्गुरुंना पूर्ण शरणागत झालेले असतात. “सद्गुरू हाच देव” असा त्यांचा जाज्वल्य भाव असतो. अशा साधकांना सद्गुरू कृपेने तात्काळ आत्मसाक्षात्कार होतो.

       आपणा सारिखे करिती त्तात्काळ।
            नाही काळवेळ तया लागी।।
सद्गुरुंना आपण शरण गेल्यावर ते काय करतात हा प्रश्न उभा रहातो.
ते प्रथम आपल्याला जागा करतात व नंतर आपल्या जवळच असलेल्या देवाची जागा प्रत्यक्ष दाखवितात.येथे तर्क किंवा कल्पना या गोष्टीच नाहीत. येथे आहे ती साक्षात् प्रत्यक्षता.

श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, —
“अरे अर्जुना, तो बघ सूर्य व हा पहा जयद्रथ, आता उडव या जयद्रथाचे मस्तक तुझ्या तीक्ष्ण बाणाने व घे अभिमन्यूच्या वधाचा बदला.”
त्याचप्रमाणे ……
श्री सद्गुरू आपणाला सांगतात, —
“अरे, तो पहा देव व ही पहा माया, आता उडव या मायेचे मस्तक तुला दिलेल्या दिव्य चक्षूच्या सूक्ष्म बाणाने व घाल देवाच्या पायाला घट्ट मिठी.”

        — सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!