संत नामदेव महाराज पालखी सोहळा आणि आरोग्य शिबिर संपन्न
पिंपरी:
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्याला सुमारे ९०० भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री मोरया गोसावी मंदिर – गांधी पेठ – चापेकर चौक – वाल्हेकरवाडी रस्ता – संत नामदेव चौक – साठे मळा – संत नामदेव महाराज मंदिर, चिंचवड या मार्गाने नूतन अन् सुंदर पालखीमध्ये नामदेव महाराजांच्या पादुका ठेवून, टाळमृदंगाच्या नादात फुगड्या खेळत अन् नर्तन करीत अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात मिरवणूक संपन्न झाली.

या सोहळ्यात खास आळंदी येथून २८ बालवारकऱ्यांचे पथक सहभागी झाले होते; तसेच पारंपरिक वेषभूषा परिधान करून मोठ्या संख्येने भाविकांनी सहकुटुंब सहभाग घेतला होता. विशेषतः लहान मुलामुलींचा सहभाग लक्षवेधी ठरला. ठिकठिकाणी समाजबांधवांनी पालखीचे स्वागत केले. त्यापूर्वी सकाळी ९:३० वाजता संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते आणि निखळ दांपत्य यांच्या हस्ते पादुकापूजन करण्यात आले.

पालखी सोहळ्यात गजानन महाराज हरिपाठ भजनी मंडळाने भजनसेवा रुजू केली. दुपारी ठीक १२:०० वाजता पुष्पवृष्टी करून पसायदानाने पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी अध्यक्षांनी कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. देणगीदार आणि पालखी सोहळ्यात सहभागी झालेले बालवारकरी यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. मंदिर समिती सचिव प्रसाद खोले यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या सोहळ्याच्या निमित्ताने नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे आणि पिंपरी-चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्था, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक सभागृह, साठेमळा, वाल्हेकरवाडी रस्ता येथे सकाळी १०:०० ते दुपारी २:०० या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

डॉ. प्रवीण बढे आणि त्यांच्या वैद्यकीय समूहाकडून मधुमेह, संधिवात, हृदयविकार, नेत्रविकार, मूळव्याध, महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यसमस्या संबंधित मोफत तपासणी आणि सल्ला शिबिराचा सुमारे १०० रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरासाठी पिंपरी – चिंचवड नामदेव शिंपी समाज संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते, नामदेव समाजोन्नती परिषदेचे उपाध्यक्ष कैलास नेवासकर, उज्ज्वला सावंत, बापूसाहेब काळे यांचे विशेष सहकार्य लाभले. सायंकाळी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

error: Content is protected !!