शब्द सुमनांच्या जोरावर माणुसकीची मोहळ उभा करणारा:पत्रकार अन निवेदक
शब्दांची वीण सुंदर गुंफली की..आपसूक शब्द सुमनांची सुरेख माळ तयार होते…मग ते शब्द लेखणीचे असो..की निवेदनाचे… आपल्या शब्द सुमनांच्या जोरावर ‘त्याने’ निर्माण केलेले माणुसकीचे मोहळ हे अगदी मधाप्रमाणे घट्ट आहे… याला माणुसकीचे मोहळ म्हणा… अथवा माणुसकीचे वलय…पण या पट्ट्याच्या शब्द फेकीला समाजात मानाचे स्थान आहे… शब्दाने त्याला घडवले….उभे केले ..इतकेच काय शरीर संपदा जितकी मानाची… तितकीच या गड्याने शब्द संपत्तीला प्रतिष्ठा मिळवून दिली…
तोही कुठलाही राजकीय अथवा सामाजिक वारसा नसताना. कष्ट, प्रामाणिक,आपुलकीची कास धरीत त्याने हे यश मिळवले. तो सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील.तालुक्याचं श्रद्धास्थान असलेल्या श्री पोटोबा महाराजांवर त्याची निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या व मावळ तालुक्याच्या राजधानीत म्हणजे वडगाव मावळ नगरीत १२ जुलै १९७९ त्याचा जन्म झाला. आम्ही एकाच वयाचे. वर्षे सहा महिन्यांचा आमच्यात फरक.एकाच मातीत आणि एकाच छतात आमच्या वर संस्काराची री ओढली.
आई वडिलांचा हा लाडका लेक. कष्टातून उभारी घेणा-या कुटुंबातला हा थोरला लेक.ज्याच्या जन्माचा आई वडिलांचा इतका आनंद होता की, त्या काळच्या बेताची परिस्थितीत असताना वडगाव शहरात ‘भारुड’ ठेऊन मोठ्या थाटामाटात याचं ‘बारसं’ केलं.ज्याचं बारसं महाराष्ट्राच्या कलेचा उत्तम नमुना असलेल्या आणि शब्दांची फेक करीत रात्रभर रसिकांना खिळून ठेवणा-या भारूडानं झालं तो त्यांच्या वर केलेला शारदा मातेचा पहिला संस्कार होता. नारदाने गण गायिला आणि श्रीगणेशाने रंगमंचावर सादर केली.
सुख दु:खाच्या अनेक हिंदोळ्यावर बसून पुढे कर्तृत्वाच्या जोरावर या तरूणाने आई वडिलांच्या डोळ्या देखत त्यांचं नाव मोठं करून दाखवलं.हीच आयुष्यातली सर्वात मोठी कमाई असल्याचे तो मानतो. त्याच्या कर्तृत्वाचा आम्हा सर्वाना स्वाभिमान आहे. अरे आपला गणेश आहे ना हा विश्वास आपसूक आम्हा सर्वाना मिळवून जातो.
शब्द हेच त्याचे जीवन बनले आहे. शब्द फेक मग ते माईकवर असो अथवा लेखणीतून असेल,शब्द हेच त्याच्या नावाची ओळख बनली असा हा तरूण आहे,आमचा गणेश मारुती विनोदे.वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाचा माजी अध्यक्ष,दैनिक पुढारी वृत्तसंस्थेचा तालुका प्रतिनिधी.
अनेक सामाजिक संस्था संघटनेचा पदाधिकारी. आज त्याचे बालपण सहज डोळया समोरून तरळून जातेय.
इंदूताई बवरे यांच्या बालवाडीमध्ये शिक्षणाचा त्याने श्रीगणेशा केला, मानके बाईंच्या वर्गात बसून चाफ्याच्या जिल्हा परिषद शाळेत पहिली पासून चौथी पर्यंतचे धडे गिरवले. कर्मवीर भाऊराव पाटील संस्थापक असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये पाचवी पासून दहावी पर्यंत शिकला. १९९४ साली मॅट्रिक झाला,अन तळेगावच्या इंद्रायणी महाविद्यालयात बारावी उत्तीर्ण झाला. पिंपरीच्या महात्मा फुले महाविद्यालयात ग्रॅज्युएट साठी गेला. पण नोकरी अन शिक्षण या खडतर प्रवासात ग्रॅज्युएट व्हायचे राहून गेलं.
शिक्षण घेता घेता व्यायामाचीही आवड जोपासली. जय बजरंग तालीम मध्ये जोर, बैठका मारून व्यायामाला सुरुवात केली, महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब मध्ये जोर मारण्याच्या संकल्पात अग्रेसर राहिलास आणि सह्याद्री जिमखान्यामुळे वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग स्पर्धा खेळला. आजही व्यायामाची गोडी टिकून आहे. म्हणून त्याची शरीरयष्टी टिकून आहे.जेवढी शरीर संपदा जपली,तशी शब्द संपत्ती टिकवली ही त्याची जमेची बाजू आहे.
दहावी पास झाला आणि पुढे शिकता शिकता जांभूळच्या डेक्कन फ्लोरा कंपनी मित्रांबरोबर चुना मारायची पहिली नोकरी त्याने केली. टायपिंग शिकल्यामुळे चिंचवडला एका दुकानात तर काही दिवसाने एका ऑफिसमध्ये टायपिस्ट म्हणून नोकरी लागली. त्यानंतर पुण्यातील पाईव्ह स्टार प्राईड हॉटेलमध्ये स्टाफमध्ये काम केले. गावातल्या कंपनीत पर्मनंट होईल या भाबड्या आशेने लिटाका कंपनीत कामाला लागला चार पाच वर्षे मनापासून काम केले पण पर्मनंटची इच्छा अपुर्णच राहिली,असे हे सगळे गणेशचे सुरू होते.
आयुष्यात कोण ना कोण तरी सहज भेटावा लागतो.असेच कोण तरी भेटले आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची संकल्पना मांडली. ती स्वीकारली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा स्थापनेत त्याने पुढाकार घेतला. पोलीस मित्र संघटना ही स्थापन केली. एकीकडे शिक्षण,दुसरीकडे संघटनात्मक काम आणि तिसरे नोकरी.
नोकरी करता करता पत्रकारितेचे वेड कधी लागले कळलेच नाही. सन २००० चा काळ असेल केशवनगरमधील राजेंद्र आचार्य यांच्याकडे पार्टटाइम टायपिस्ट म्हणून काम करत असताना अंबर साप्ताहिक सहजच हातात पडलं, ते वाचता वाचता आपणही लिहावं असं वाटलं आणि आचार्य अण्णा यांच्या माध्यमातून गुरुवर्य सुरेशजी साखवळकर यांचे अंबर कार्यालय गाठले.
साखवळकर सरांनी होकार दिला आणि पत्रकारितेचा श्रीगणेशा झाला, कालांतराने साखवळकर सरांच्या ओळखीने दै प्रभात चा पत्रकार होण्याची संधी मिळाली. जवळपास पाच वर्षे दै.प्रभात मध्ये काम केले, पण दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून खरंच काम जमेल का अशा द्विधा मनस्थितीत असताना मित्र पंढरीनाथ ढोरे आणि रामदास वाडेकर यांनी थाप टाकली आणि गणेशचा सुसाट प्रवास सुरू झाला. या दरम्यान दोनांचे चार हात झाले होते. आपल्या नातेवाईकाच्या लग्नात निवेदक म्हणून प्रशिक्षणही घेतले.
आणि मग काय एकीकडे वृत्तपत्रात रकाने भरून लिहून यायचं आणि दुसरीकडे निवेदनातून लग्न समारंभ दणदणीत हलवून सोडायचं. समाजाने कौतुकाची थाप पाठीवर टाकली की,हुरूप वाढायचा. ती प्रेरणा घेऊन,अधिक जोमात शब्दांची फेक तेजीत करायची. मग ते वर्तमानपत्र असो की माईक.
सन २००७ मध्ये मुलगा श्रीयश याच्या जन्मदिनी दै.पुढारी मध्ये पाऊल ठेवले ते आजतागायत सलग १५ वर्षे टिकून आहे.
पत्रकारितेच्या या काळात मार्गदर्शक म्हणून लाभलेले सहकारी ज्ञानेश्वर वाघमारे, विजय सुराणा, सुदेश गिरमे, बाळासाहेब भालेकर यांच्या सहकार्याने, रोखठोक, प्रामाणिक, निस्वार्थी, निःपक्ष आणि निर्भीड पत्रकारिता केली. याची पावती म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मावळ वार्ता, नारायणीदेवी चॅरिटेबल ट्रस्ट अशा विविध संस्थांचे पुरस्कार तर काही संस्थांकडून सन्मान मिळाले.
पत्रकारांसाठी हक्काचे व्यासपीठ असावे म्हणून वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करण्यात आग्रही भूमिका घेतली, तालुक्यातून येणाऱ्या पत्रकार बांधवांना बसण्यासाठी हक्काची जागा असावी म्हणून पत्रकार संघाचे मुख्य कार्यालय सुरू करण्यात पुढाकार घेतला आणि आता पत्रकारांसाठी तालुक्याच्या ठिकाणी ‘पत्रकार भवन’ व्हावे यासाठी त्याची धडपड सुरू आहे.
पत्रकारितेच्या या २२ वर्षांच्या कार्यकाळात निस्वार्थी आणि निर्भीड पत्रकारिता करत तालुक्याच्या राजकिय, सामाजिक वर्तुळात मिळवलेले नाव, प्रशासनावर मिळवलेली पकड आणि जनमानसात कमवलेली तुझी प्रतिमा खरंच अभिमानास्पद आहे. गेली अनेक वर्षे मंडपातील लग्न सोहळ्यापासून गार्डन, रिसॉर्ट मध्ये होणाऱ्या लग्न सोहळ्यापर्यंत ‘निवेदक’ म्हणून वेगळीच छाप पाडली.
मित्र परिवाराच्या बरोबरीने श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवले.
पोलीस मित्र संघटनेची स्थापना, श्री पोटोबा महाराज देवस्थान व जय बजरंग तालीम मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या चैत्र पौर्णिमा उत्सवात हिरीरीने सहभाग, श्री बालाजी ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलास त्या स्व.पै.केशवराव ढोरे यांच्या नावाने प्रतिष्ठानची स्थापना करण्यात पुढाकार घेऊन प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली दहा वर्षे सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम राबविण्यासाठी सतत सक्रिय आहे.
तालुक्यात निवेदक म्हणून काम करणाऱ्या तरुणांना एकत्र करून मावळ तालुका निवेदक संघाची स्थापना करण्यात पुढाकार घेतला व निशुल्क सेवा देणाऱ्या निवेदकांना समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
इतकं काही करता करता गावही विसरला नाही, हायवेलगत असूनही दुर्लक्षित असलेल्या ‘विनोदेवाडी’ ला ग्रामपंचायतमध्ये सदस्य, उपसरपंच म्हणून प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले, त्यामुळे ५० वर्षे दुर्लक्षित असलेल्या विनोदेवाडीला पक्का रस्ता, स्ट्रीटलाईट, पाणी, अंगणवाडी अशा सर्व सुविधा अवघ्या पाच वर्षात मिळाल्या हे गणेशच्या प्रयत्नांचे यश आहे.
आप्पा, आई, दोन्ही आज्या (वडिलांची आई अन आईची आई) यांचा आशिर्वाद भाऊ सुहास याची भक्कम साथ, पत्नी सारिका हिची खंबीर साथ, भावजय भाग्यश्री, बहीण उज्वला(पिंकी), यांचे सहकार्य मुले श्रीयश, दर्शन, श्रुतिका, देवश्री, शिव यांचे उज्वल भविष्य याच जोरावर आणि सर्व जिवाभावाच्या मित्रांच्या भक्कम पाठिंब्यावर, आप्तेष्ट, नातेवाईक, सर्व हितचिंतक यांच्या सहकार्याने अजूनही खूप काही करायचं आहे,असे गणेश अगदी विनम्रपणे सांगतो. त्याची ही तळमळ आम्ही जेव्हा पाहतो, तेव्हा तो आमचा गणेश आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.आज हे सगळे लेखन प्रपंच यासाठी केला,कारण आज गणेशचा वाढदिवस आहे.
शब्द सुमनांनी इतरांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण भरणा-या गणेश ला वाढदिवसानिमित्त शब्द सुमनांची ही सुंदर भेट. कदाचित हे भेट त्याला आवडणार नाही किवा आवडले देखील.शब्द सुमनांना पूर्णविराम देतादेता गणेश,वाढदिवसानिमित्त
तुझ्या या उत्तरोत्तर प्रगतीला आणि जिज्ञासू वृत्तीला खूप खूप शुभेच्छा !
(शब्दांकन- पंढरीनाथ ढोरे, संस्थापक पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान)
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन