साधक व शिष्य.
ध्येय साधण्यासाठी जो साधना करतो, त्याला साधक असे म्हणतात .परमार्थाच्या क्षेत्रात देवाचा किंवा स्वरूप साक्षात्कार हे ध्येय असून ते ध्येय गाठण्यासाठी जे प्रयत्नरत असतात. ते खऱ्या अर्थाने साधक होत.ही ध्येय सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी जो विशिष्ट अभ्यास सद्गुरू साधकांना शिकवितात ह्या अभ्यासाला साधना असे म्हणतात.

ही साधना जो मनापासून व प्रामाणिकपणे करतो याला शिष्य असे म्हणतात.सद्गुरू जी साधना शिकवितात त्यांचे मोल अमोल ‘ आहे.काहीही कष्ट केल्याशिवाय पित्याची संपत्ती पुत्राला प्राप्त होते त्याप्रमाणे कष्ट,अभ्यास व तपस्या करून सद्गुरूंनी निर्माण केलेली साधना शिष्याला विनासायास प्राप्त होत असते.अलक्ष्याचे ठायी लक्ष स्थिर करणारा साधक ‘पहाता पहाता’ लक्ष्मीपती होतो.

 *सद्गुरूंना पूर्ण शरण गेलेला शिष्य सद्गुरू रूप होय.*

 *सद्गुरूंचे महत्त्व व महात्म्य जो यथार्थ जाणतो तो सत् शिष्य होय.*

  *’सद्गुरू हाच खरा देव’ असा ज्याचा भाव तो आजचा आहे सत् साधक व उद्याचा आहे सद्गुरू.*

 *प्रपंचासाठी परमार्थ करायचा नसून परमार्थासाठी प्रपंच करायचा असतो,हे जाणतो तो सत् साधक होय.*

 *प्रपंच व परमार्थ हे साधकरूपी पक्षाचे दोन पंख आहेत.*

 *विशिष्ट साधनेने मन स्वरूपाकडे वळविल्याने साधक स्वानंदाचा स्वामी होतो.*

 *दिव्यबोध व दिव्यसाधना हे सद्गुरूंचे दोन चरण ज्यांना धरता येतात ते सत् शिष्य होत.*

 *सद्गुरू सत् शिष्यला जी दिव्यसाधना शिकवितात त्या साधनेनेच सत् साधकाच्या अंतःकरणात सिद्ध वस्तूचा साक्षात्कार होतो.*

  *दिव्यसाधना नीट समजावून घेऊन तिचा जे साधक नित्य अभ्यास करतात,अशा सत् साधकाच्या अहंकाराचा वध होतो व त्यांना दिव्य स्वरूपाचा वेध लागतो.*

 *बहुमोल पण बिनमोल अशी दिव्यसाधना सद्गुरूकडून प्रसाद म्हणून साधकाला प्राप्त होऊन सुद्धा ज्यांना त्याचे यथार्थ मोल उमजत नाही,त्या साधकांचे जीवन मातीमोल न झाले तरच नवल.*

 *सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जे सत् साधक परमार्थाचा प्रवास आकाशमार्गाने करतात ते भगवंताच्या चरणी सुखाने सहज पोहोचतात.*

 *विशिष्ट साधनेच्या सहाय्याने व्यतिरेक करून स्व-स्वरूपात खोल बुड़ी मारल्याशिवाय साधकाला परत देहावर येऊन अन्वयाच्या प्रांतात उंच उडी मारता येत नाही.*

 *’आता’ आपण पूर्ण झालो असून सद्गुरू मार्गदर्शनाची गरज उरली नाही.असे ज्या साधकाला वाटते,तो साधक शिष्य नसून शिसं होय.*

 *सद्गुरू काही निवडक शिष्यांचा गौरव करून त्यांचा मोठेपणा वाढवितात,त्याचे कारण ते शिष्य खरोखरीच मोठे झालेले असतात म्हणून नव्हे,तर त्यांनी अधिक प्रयत्नशील होऊन खरा मोठेपणा प्राप्त करून घेण्यासाठीच होय.*

 *प्रपंचात गुंतलेले लोक कोहं-कोहं म्हणतात तर परमार्थात शिरलेले लोक सोहं-सोहं म्हणतात. परंतु जे सद्गुरूपुत्र असतात ते मात्र प्रपंच व परमार्थ स्वरूपांत जिरवून नाहं होतात व नामस्मरणात रमून रहातात.*

 *शरीराचा तपश्चर्येच्या नावाखाली छळ करून ईश्वरप्राप्ती करण्याचा खटाटोप करणारे साधक म्हणजे साक्षात् भ्रमाचे भोपळे होत.*

 *संसाराचा संपूर्ण त्याग करून त्यागी होणे किंवा संसारात पूर्ण आसक्त होऊन भोगी बनणे,या दोन्ही गोष्टी सूज्ञांना अमान्य आहेत; त्यागी किंवा भोगी या दोन टोकांना जाण्यापेक्षा ‘योगी’ होण्याचा सुवर्णमध्य साधणे हाच खरा हिताचा मार्ग होय.*

 *अंतःकरणात भगवंताचे नाम जो धारण करतो तो नामधारक.*

 *सद्गुरूचरणाच्या दिशेने साधकाची गती या नांव शरणागती.*

 *देहासाठी करावा उपास व देवासाठी करावा तपास.*

 *श्री शंकराच्या हातात जसा त्रिशूल,त्याप्रमाणे “काम,नाम व राम” हा नामधारकाचा त्रिशूल होय.*

  *सामान्य साधकांचे संसार हे ध्येय असते व साधन असते परमार्थ,तर सत् साधकांचे ध्येय असते परमार्थ व साधन असते संसार.*

 *आहार आणि विहार नियंत्रित करून विकार जिंकल्याशिवाय, मुक्तीचा हार साधकाच्या गळ्यात पडत नाही.*

 *नामघोष करणारे दोन प्रकारचे असतात.एक देवाची प्राप्ती व्हावी म्हणून आणि दुसरे देवाची प्राप्ती झाली म्हणून.*

 *गुरूची सेवा दोन प्रकारांनी करता येते.गुरूचीदेहाच्या अंगाने सेवा करणे हा एक प्रकार व गुरुतत्त्वाच्या अंगाने सेवा करणे हा दुसरा प्रकार.*

 *’मी पणाचा’ म्हणजेच ‘मी अमुक’ या कल्पनेचा पूर्ण त्याग करणे यालाच खऱ्या अर्थाने सर्वसंग परित्याग असे म्हणतात. असे जो करतो तोच खरा साधू किंवा संन्यासी होय.*

सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!