विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परतीच्या वारीमध्ये आरोग्यसेवा
पिंपरी :
विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र प्रांताच्या वतीने  गणेश इंटरनॅशनल स्कूल, चिखली येथे  पंढरपूर येथून आलेल्या परतवारीमधील वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यात आली. आळंदी, देहू आणि त्र्यंबकेश्वर येथून वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना गेल्या सदतीस वर्षांपासून अखंडपणे मोफत आरोग्यसेवा पुरवण्याचा उपक्रम हिंदू परिषदेच्या वतीने यावेळीही राबविण्यात आला.

याप्रसंगी विश्व हिंदू परिषद क्षेत्र सेवा कार्यप्रमुख प्रा. अनंत पांडे यांनी बोलताना, “विश्व हिंदू परिषदेच्या कामाचा सेवा हा आत्मा आहे. सेवा परमोधर्म हेच आमचे ब्रीद आहे. नरसेवा हीच नारायण सेवा, हेच आमचे व्रत आहे. देव, देश आणि धर्मकार्यासाठी तळागाळातील समाज बांधवांना सोबत घेऊन काम करणे, हे विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासून स्थायी काम आहे.

संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात संस्कार शाळांचे जाळे विणून तळागाळातील बालकांना शिक्षित आणि संस्कारित करणे, देशभक्तीने प्रेरित करणे, रुग्ण उपयोगी साहित्याच्या माध्यमातून सेवा करणे, अभ्यासिका, स्थायी प्रकल्प, अस्थायी प्रकल्प यांच्या माध्यमातून सबंध समाजाला जोडण्याचा मानस आहे. षष्ठपदी वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने एक जिल्हा एक स्थायी प्रकल्प आणि काही अस्थायी प्रकल्प असाही आपण संकल्प करूया!” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या वर्षी देहू आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत वारकरी यांची सेवा केलेल्यांचा सत्कार विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर, क्षेत्र सेवाप्रमुख प्रा. अनंत पांडे, प्रांतअध्यक्ष पांडुरंग राऊत, उपाध्यक्ष माधवी संशी, क्षेत्र मातृशक्तीप्रमुख डॉ. बोथारे, प्रांतमंत्री प्रा. संजय मुदराळे, प्रांत सहमंत्री आणि सेवा विभाग पालक ॲड. सतीश गोरडे, संजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. जितेंद्र देशमुख, डॉ. सतीश तोडकर, सतीश आनंदवार, डॉ. जयसिंग पाटील, डॉ. प्रदीप उगले, परिचारिका विजया रोडे, माधवी पखाले, छाया यादव, रेखा देवकाते, यमुना खैरे, गौरव जंगले, शेखर राऊत, परगोंडा पुजारी, भास्कर गोडबोले, विजय देशपांडे, हर्षद जाधव, विठ्ठल जाधव यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि संत तुकाराम महाराज पालखी यांच्याबरोबर राहून रुग्ण तपासणी, औषधोपचार, पायाची मसाज आणि इतर सेवा तसेच दहा रुग्णवाहिकांच्या माध्यमातून आरोग्यसेवा देण्यात आली.

कार्यकमाचे संयोजन विभागमंत्री नितीन वाटकर, चिंचवड जिल्हामंत्री धनंजय गावडे, संयोजक संभाजी बालघरे, प्रखंडमंत्री प्रदीप बालघरे आणि अन्य सदस्यांनी केले.

error: Content is protected !!