गुराखी
श्याम नुकताच दहाव्या वर्षात पोहचला होता.त्या काळात शिक्षणा पेक्षा घरातील गुरढोर सांभाळण्यासाठी अशा वयात आलेल्या मुलांना पाचारल जात होते. आजू बाजूच्या बऱ्या पैकी श्रीमंत असलेल्या घरातील मुले गावातील शाळेत जात होती.

परंतु श्याम सारखी चार ते पाच पोर आपली गुर भली आणि ते भले असेच जीवन जगत होती.दिवस उगवला की श्यामचा दिवस चालू होत होता.सकाळची साखर झोप त्याला घेता येत नव्हती.पहाटे पासून घरात एकच कामांची गडबड चालू होत होती.

गुरांच्या धारा काढणे,त्यांना अंबवन, जात्यावर दळण ,विहिरीवरून पाणी आणणे,ही सगळी कामे त्याच्या व्यतिरिक्त केली जात होती.सकाळी झोपेतून उठल्यावर श्याम कसे बसे तोंड धुवून चहा घेत असे आणि गुरे सोडून रानात चरायला घेऊन जात असे.त्याच्या बरोबर खालच्या आळीतील महादू,शेजारचा रामू,वरच्या आळीतील जगू,आणि गावातील अशी दोन तीन पोर मिळून सगळे जन रानात आप आपली गुरे घेऊन जात होती.उन्हाळ्यातील लगीनघाई संपली होती.

उन्हाळ्यात गुरे दिवसभर रानातून घरी आपोआप येत होती. फक्त पाणी पाजन्यासाठी ओढ्यावर घेऊन जावं लागत होती.
वैशाख मध्ये तर श्यामने लग्नाच्या वराती,यात्रा,यांचा खूप आनंद घेतला होता.मृग नक्षत्र पर्जन्य राजाला घेऊनच आले होते.शेतातील ढेकळे पावसाच्या पाण्याने पूर्ण विरघळून गेली होती.रानातील शेवटच्या घटका मोजत असलेलं गवत मृत पाय अवस्थेतून पुनर्जन्म घेऊन धरणीवर अवतरले होते.सगळी वसुंधरा हिरवाईची चादर घेऊन नव्या नवरी सारखी अवतरली होती.

गेली आठ महिने हिरव्या चाऱ्या पासून गुरे दूर होती ती आता मात्र हिरवा चारा खाऊन जोगवत होती.अजून मात्र सात झाली नव्हती.सात म्हणजे ज्या वेळी ही सात होत होती तेव्हा पासून प्रत्येकाने आपली गुरे ही आपल्या रानातच चारावी असा खाक्या पंचायतीचा होत होता.दुसऱ्या दिवशी सात  होती. गावदेवी म्हणजेच मरी आईला कोंबड कापले होते. इडापिडा टळू दे असा नवस घरातले बोलले होते.

सात झाली तसे सगळे गुराखी आपली गुरे आपल्या रानात चारू लागले होते.प्रत्येकाचे रान सुध्दा हाकेच्या अंतरावर होते.एखाद्याला काही लागले तर दुसरा मदत करत होता.रानाच्या बाजूने डोंगर रांगेतून आलेला मोठा झरा वहात होता.या झऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्यातून मधुर संगीताचा आस्वाद ही गुराखी मंडळी घेत होती.त्या दिवशी एक तास अगोदर खूप जोरात पाऊस येऊन गेला होता.श्याम ,जगू,महादू या मंडळींनी एक बेत आखला होता.गुरे प्रत्येकाच्या रानात त्यांच्याच अंदाजात मनमोकळ्या पणाने चरत होती.त्यांनी झऱ्यात प्रवेश केला होता.

प्रत्येकाला मोठी मोठी चार चार खेकडे भेटली होती.रानातील वाळलेली तंटणी चा भुगा जमा केला होता.त्याला आग लावून त्या मध्ये पकडलेली खेकडे भाजली होती.प्रचंड ताकदीचा हा रानमेवा यांनी फस्त केला होता.
      श्रावण जसा चालू झाला तसा हिंदू धर्माच्या सणाना प्रारंभ झाला होता. रान भाज्या श्रावणातील प्रत्येक सोमवारच्या उपवासाला मिळू लागल्या होत्या.प्रत्येक सणा सुदीला घरात गोड धोड पदार्थ बनत होते ते सर्व पदार्थ ही सगळी मंडळी रानात एकमेकांना देत होते.
     
घरातील शिळी भाकरी जरी असली तरी रानात तिची चव न्यारीच लागत होती.एकमेकांची भाजी भाकरी एकत्र करून गोकुळा तल्या काल्याची आठवण करून देत होते.कृष्ण जन्मात कृष्णा बरोबर असणारे सगळे सवंगडी अशीच घरातील शिदोरी वृंदावनात आणत होते.आणि जीवनातील प्रमोच्च आनंद घेत होते.श्रावणात प्रत्येकाच्या घरी ग्रंथ लागले जात होते.एकमेकांना पौराणिक कथा ऐकवत होते. विशेष करून हरिविजय ग्रंथाचा या मंडळींना अभिमान वाटत होता.कारण कृष्ण हा सगळीकडे भरून उरला आहे याची जाणीव सगळ्यांना झाली होती.

श्रावणातल्या इंद्रधनुष्याचा,आणि उन पावसाचा खेळ या मंडळींनी जवळून पाहिला होता.भाद्रपद मध्ये गूरानी बाळसे धरले होते.अमावस्येला बैल पोळा साजरा करून बैलांप्रती कृतज्ञता राखली होती. दिवाळी आली तेव्हा गुरांच्या शिंगांना तेल लावून  वसुबारस अगदी आनंदात साजरी केली होती.दिवाळीतील कामांची लगबग आणि घरातील करंजी,लाडू,शंकर पाळी यांचे सुंदर समीकरण झाले होते.
गावाच्या बाजूला असणारा घनदाट डोंगर, व पडीत रानातून वाढलेली झाडे त्यामुळे वाघ जनावरांसाठी धोक्याची पातळी ठरला होता.

या वाघापासून गुरांच रक्षण व्हावे म्हणून राना मध्ये वाघ बारस साजरी करण्याची पूर्वंजा पासून प्रथा चालत आलेली होती.त्या प्रथेला अनुसरून त्या दिवशी रानात वाघ बारस करण्याचे ठरले होते.प्रत्येकाने काही तरी घरातून आणायचे होते.कोणी तांदूळ,कोणी दूध,कोणी साखर, खिर बनवण्यासाठी लागणारी भांडी सुध्दा कोणी आणायची ही सर्व कामे ठरलेली होती.प्रत्येकाच्या घरातून सगळी मंडळी जेवणासाठी आली होती. अस्सल म्हशीच्या दुधातील  खिर सुंदरच बनली होती.सगळ्यांनी तृप्तीचा ढेकर दिला होता.

सगळे जन पुढील वर्षाच्या वाघ बारसेच्या प्रतीक्षेत हरवून बसले होते.दिवाळी जावून काही दिवस झाले होते.प्रत्येक शेतकऱ्याचा भुईमूग काढण्याचा हंगाम चालू झाला होता. या मंडळींचा एक नित्य नेम ठरला होता.रोज कोणाच्या तरी शेतातून भुईमुगाचे डहाळे आणून त्याला छान पैकी भाजून त्यावर ताव मारायचा .
म्हणता म्हणता हिवाळा सुरू झाला होता.बाहेर थंडी मी म्हणत होती.शेतकरी मंडळींनी रब्बी पिकांची तयारी चालू केली होती.कोणी हरभरा,ज्वारी, गहू,बटाटा, कांदा,अशी काही विहिरीच्या पाण्यावर तर काही पहाटे पडणाऱ्या दयवरा वर अशा पिकांची लागवड केली होती.हिवाळा ऋतू म्हणजे या पिकांना वरदानच ठरत होता.

रानाच्या बाजूला असणारा हरभरा चांगलाच पोसला होता.ज्वारी सुध्दा भरपूर कणसे घेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती.त्या काळात बियाणे हे घरचेच असे त्या मुळे कोणत्याही पिकाची खात्री देता येत होती. हिवाळ्यात हिवाळा च अनुभवयास मिळत होता.निसर्ग सुध्दा व्यवस्थित साथ देत होता.हरभरा ज्यावेळी दाने घेऊ लागला त्यावेळी या गुराखी मंडळींनी एक शक्कल लढवली होती.ज्याच्या शेतात चांगला हरभरा असेल त्याच्या शेतातून गुपचुप तो आणायचा आणि मोठी शेकोटी करून त्यावर तो भाजायचा आणि मग सगळे आजू बाजूला बसून त्याचा चवीचवीने उपभोग घ्यायचा असा  कार्यक्रम हप्त्यातून एकदा ठरलेला होता.

हरभरा खावून झाला की मग मात्र यांची नजर शेतातील ज्वारी कडे जायची.ज्वारी सुध्दा हूर्ड्यावर आली होती.मग ते हुरडा पार्टी करत होते.ज्वारीचं ते भल थोरले कणीस त्यांचा अंतरात्मा शांत करत होते.असे गुण्या गोविंदाचे दिवस हे गुराखी  अनुभवत होते.
एकदाचा तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात कायम सल कोरून गेला होता.महाराष्ट्र शासनाने गाव तिथे वीज असावी असे धोरण जाहीर केले होते.तालुक्याच्या गावातून इतर ठिकाणी असलेल्या गावांना वीज जोडणी करण्याचा प्रयत्न केला जात होता.एक मुख्य वाहिनी व तिला उप वाहिन्या करून गावातून लाईट पोहचवण्यासाठी प्रयत्न होऊ लागले होते.

अशीच एक मुख्य वाहिनी या गुरांखी मंडळीच्या रानातून पश्चिम दिशेच्या गावांना गेली होती. लोखंडी पोल उभे करून त्या मधून विद्युत तारेचे जाळे सगळीकडे पहावयास मिळत होते.गुराखी म्हंटले की झाडावर चढने,विहिरीत,ओढ्यात पोहणे,हे आलेच त्या मध्ये ही मंडळी तरबेज होती.यांच्या मधला जगू मोठा चपळ,आणि नजर हटे पर्यंत तो कोणतेही काम करत होता. असाच एक दिवस दुपारचे साडे तीन वाजले  होते.गुरे रानात चरत होती.सगळी मंडळी त्या लोखंडी पोल जवळ आली होती.

जगू ने सगळ्यांना सांगितले बघा मी  एका क्षणात या लोखंडी पोल वर चढुन त्याला असलेल्या तारेला लोंबकळुन दाखवतो.याच्या पूर्वी त्याने एकांतात असे केले होते,त्यामुळे त्याला त्याचा आत्मविश्वास होता.बाकीचे सगळे त्याच्या कडे पहातच राहिले होते.श्याम जरा संशया नेच त्याच्या कडे पहात होता.जगू एका क्षणात त्या लोखंडी पोल वर चढला आणि काही वेळेतच त्या तारेला लोंबकळत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करणार होता.जसा त्याने तारेला स्पर्श केला त्या वेळी मुख्य वाहिनितून खूप मोठा विद्युत दाब जात होता त्याचा आघात एवढा भयंकर होता की त्याला  खूप दूरवर फेकले गेले होते.त्याचे सगळे  शरीर काळे निळे पडले होते.सगळे त्याच्या कडे धावत गेले होते.

घरी निरोप पाठवून त्याला लगेच घरी आणले होते.त्याला ताबोडतोफ उपचाराची गरज होती.दळण वळणाची कोणतीच सोय नव्हती.घरातील बैल गाडी जुंपली आणि त्यावर  त्याला ठेऊन बाजार पेठेच्या गावात हलवण्यात आले होते.तिथे गेल्या नंतर त्याची चौकशी डॉक्टर ने केली ,शरीराकडे पाहून डॉक्टर हैराण झाले होते.कारण तो विद्युत प्रवाह सगळ्या शरीरात  पसरला होता.

डॉक्टर ने उपचार चालू केले होते खरे, परंतु त्यांनाच खात्री देता येत नव्हती की जगू वाचेल का? दोन तासाच्या अथक प्रयत्नातून सुध्दा जगू मध्ये कोणताच बदल दिसत नव्हता.काही काळ गेला असेल तेंव्हा डॉक्टरने त्याला मृत घोषित केले होते. दुसऱ्या दिवशी जगुचे पार्थिव गावात आणले होते.त्या दिवशी  या कोणत्याही गुरांख्यानी गुरे सोडली नव्हती.

कोणीही अन्न पाण्याला शिवले नव्हते.आपल्यातला एक साथीदार गेला त्याच प्रचंड दुःख त्यांना झाले होते.मागील काही घडामोडी सगळ्या चित्रपट रूपाने त्यांना दिसत होत्या.जगू गेला परंतु एक गुरांख्यांचे जीवन सगळ्या मानव जातीला लक्षात राहील असेच जगला हे मात्र श्याम विसरायला तयार नव्हता.

( शब्दांकन – बाळासाहेब मेदगे,औदर 9004564645)

error: Content is protected !!