ज्ञान म्हणजे आत्मज्ञान- भाग २
ज्ञानाला किंवा चैतन्याला विलक्षण प्रकाराने मायेचे खग्रास ग्रहण लागलेले आहे व त्यामुळे हे ज्ञान अज्ञान रूपाने म्हणजेच भ्रम रूपाने नांदत आहे,या सिद्धांताचे उत्कृष्ट आकलन श्री सद्गुरू कृपेने होते तेव्हांच परमार्थाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.वेड्याला आपण वेडे आहोत हे कळत नाही, त्याचप्रमाणे एक वेडा दुसऱ्या वेड्याला सुधारू शकत नाही.

म्हणून त्याच्यासाठी डॉक्टरचीच उपाय योजना होणे आवश्यक असते.त्याचप्रमाणे भ्रम वेष्टीत ज्ञानाला किंवा चैतन्याला म्हणजेच अज्ञानरूप जीवाला भ्रममुक्त करून त्याच्या मूळ शुद्ध दिव्य स्वरूपावर आरूढ करण्यासाठी भवरोग वैद्याची म्हणजेच खऱ्या श्री सद्गुरूंची नितांत गरज असते याच अपेक्षेत गीतेतील खालील श्लोक लक्षणीय आहेत.

१) सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः । । ( १८ : ६६ : भ.गी.)*

२) नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ।। (१८ : ७३ : भ.गी.)*

वरील श्लोकांतील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे.पण त्यात सर्वांचा कळस म्हणजे “स्मृतिर्लब्धा” हे शब्द होत.अर्जुनाची स्मृती गेली होती, ती स्मृती श्रीकृष्णाच्या कृपेने म्हणजेच सद्गुरू कृपेने त्याला परत प्राप्त झाली.स्मृती जाणे म्हणजेच डोके फिरणे किंवा भ्रमिष्ट होणे व ती परत प्राप्त होणे म्हणजेच डोके ठिकाणावर येणे किंवा भ्रम मुक्त होणे.भ्रम मुक्त होण्यासाठी स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृती व्हावी लागते व ही जागृती ज्या ज्ञानाने उदयाला येते त्या ज्ञानाला आत्मज्ञान असे म्हणतात.म्हणून,

ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ।
*पहावे आपणासी आपण या नांव ज्ञान ।।

असे संत सांगतात.आतां असा प्रश्न पडेल की,हे प्राप्त कसे करून घ्यावयाचे? ते सुद्धा संत खालील प्रमाणे सांगतात,

ते ज्ञान दृष्टीने पहावे । पाहोनी तेथेचि रहावे। निजध्यासे तद्रूप व्हावे । संग त्यागे ।।

वरील ओळीतील प्रत्येक शब्द आत्मसाक्षात्काराच्या साधनेच्या दृष्टीने अतीव महत्त्वाचा आहे.परंतु स्वस्वरूपाच्या ठिकाणी खोल बुडी मारून सूक्ष्म दृष्टी प्राप्त करून घेतल्याशिवाय वरील ओवीतील साधनेचे गूढ रहस्य कळणे शक्य नाही.म्हणून वर स्पष्ट व उत्कृष्ट शब्दांत सांगितलेला ईश्वर साक्षात्काराचा अभ्यास कसा करायचा हा पुढला प्रश्न वाचकांच्या पुढे दत्त म्हणून उभा राहील.

त्याचे उत्तर हेच की,हा आत्मसाक्षात्काराचा सद्गुरू प्रणित जवळचा (short cut) व सुंदर राजमार्ग आत्मज्ञानी अशा खऱ्या सद्गुरुंना शरण जाऊन संपूर्ण समजावून घ्यावयाचा असतो. हे आत्मज्ञान देण्याचे सामर्थ्य फक्त सद्गुरुला असते,किंबहुना हे आत्मज्ञान देतात तेच सद्गुरू होत.श्री सद्गुरू कृपेने मायेचे विलक्षण स्वरूप साधकाच्या लक्षात येऊ लागते,तेव्हांच त्याला परमार्थ हा सोपा विषय नसून कठीण विषय आहे,याची जाणीव होऊ लागते. याच संदर्भात तुकाराम महाराजांचे उद् गार लक्षात ठेवण्यासारखे आहेत.

*ब्रह्मज्ञान नोहे लेकुराच्या गोष्टी । तेथे व्हावा पोटी अनुताप ।।*

*ब्रह्मज्ञान जरी होय उठाउठी। तरि कां हिंपुटी वेदशास्त्रे ।।*

*वरील चरणांत तुकाराम महाराजांनी परमार्थाचे काठीण्य स्पष्ट शब्दांत दाखवून दिले आहे. आजकाल आपण सर्वत्र नजर टाकली तर आपल्याला असे दिसून येईल की, कांही “विद्वान” लोकांनी परमार्थ म्हणजे पोरखेळ केला आहे.याचे प्रमुख कारण हे आहे की,परमार्थात स्वरूप सिद्धी साध्य करून घेण्यासाठी ज्या साधनेची नितांत गरज आहे ती साधनाच या “विद्वान” लोकांना व त्यांच्या भक्तगणांना अवगत नसते.
*
इतकेच नव्हे तर ही “विद्वान” मंडळी साधनेची गरजच नाही असा उलटा प्रचार करतात.त्यांचे म्हणणे असे की,ब्रह्म किंवा चैतन्य हे सिद्धच आहे किंवा प्राप्तच आहे व अशा सिद्ध वस्तूला प्राप्त करून घेण्यासाठी निराळ्या साधनेची कांहीच आवश्यकता नाही. वास्तविक ही समजूत संपूर्ण चुकीची असून प्रचंड अज्ञानाची द्योतक आहे.कारण खरी वस्तूस्थिती वेगळीच आहे.

स्वस्वरूपाच्या स्मृतीची जागृती ज्या ज्ञानात उदयाला येते,ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान,याच्या उलट ज्या ज्ञानात स्वस्वरूपाची विस्मृती नांदत असते ते ज्ञान म्हणजे ब्रह्म घोटाळा होय.म्हणून ब्रह्म सिद्ध असले तरी ब्रह्मज्ञान सिद्ध नाही. हे ब्रह्मज्ञान साध्यच करून घ्यावे लागते.हेच दुसऱ्या भाषेत सांगावयाचे झाल्यास,आज म्हणजे ‘जीव’ या अवस्थेत सिद्ध आहे तो भ्रम म्हणजेच स्वस्वरूपाचा विसर व हा भ्रम नाहीसा करून स्वस्वरूपांत स्वरूपाची जागृती प्राप्त करून घेणे हे साधनेचे साध्य होय.परमार्थाची खोली व परमार्थाची उंची अनेक लोकांच्या दृष्टित येत नाही याचे प्रमुख कारण म्हणजे साधनेचा अभाव हे होय.

व्यतिरेकात आहे साधनेची सिद्धी तर सिद्धिची समृद्धी अन्वयात आहे.विशिष्ट साधनेच्या द्वारे व्यतिरेक करून स्वस्वरूपात खोल बुडी मारल्याशिवाय कुठल्याही साधकाला परत देहावर येऊन अन्वयाच्या प्रांतातअन्वयाच्या.उंच उडी मारता येत नाही.परंतु आजकाल सर्वत्र परिस्थिती अशी आहे की,साधनेचा संपूर्ण अभाव किंवा अत्यंत उथळ स्वरूपाची साधना व ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचा आधार घेऊन व त्यात खुबीने सांगितलेल्या गुप्त साधना न समजून केवळ अन्वय पद्धतीने परमार्थ सांगत सुटणे हे होय.

व्यतिरेका शिवाय नुसत्या अन्वय पद्धतीने परमार्थ करू पहाणे म्हणजे पत्नीशिवाय संसार करणे होय.नुसत्या अन्वय पद्धतीने परमार्थ सांगण्यास आत्मज्ञानाची गरज नाही तर त्यासाठी नुसते शब्दज्ञान व पाठांतर असले की काम भागते.म्हणूनच या पद्धतीचा परमार्थ सांगणारे सर्वत्र विपुल झालेले दिसतात.परंतु यामुळे सांगणारे व ऐकणारे दोघेही खऱ्या परमार्थाला मुकतात.*

*अर्थे आपलीं पुराणे । नाश केला शब्दज्ञाने । विषय लोभी मने बुडविली साधने ।।*

*हे तुकाराम महाराजांचे वचन प्रस्तुत विषयाच्या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखे आहे.संतांनी किंवा ऋषी-मुनींनी जे सिद्धांत सांगितले ते त्यांनी अभंगांतून किंवा महावाक्यांतून गुंफले.प्रत्यक्षात हे सिद्धांत म्हणजे त्यांना जो दिव्य अनुभव आला तो त्यांनी शब्दांत व्यक्त केला.*

*सोहं,अहं ब्रह्मास्मि,तत् त्वम् असि, शिवोहं वगैरे मंत्र पहा,किंवा*

*तुकाराम महाराजांचे अभंग पहा.*

*१) देव पहावया गेलो तेथे देवचि होऊनी ठेलो।।*

*२) आठव नाठव गेले भावाभाव।*
*झाला स्वयंमेव पांडुरंग ।।*
*३) चाले हे शरीर कोणाचिये सत्ते कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण। तयाचे भजन चुको नका।।*

*दिव्य बोध व दिव्य साधना यांच्या द्वारा संतांना किंवा ऋषि-मुनींना जो दिव्य अनुभव आला तो त्यांनी वरील शब्दांत उद् घोषित केला. आज आपण वरील महात्म्यांची महावाक्ये किंवा अभंग नुसते तोंडाने बोलतो किंवा गातो,पण त्यांचा दिव्य अनुभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न मात्र आपण करीत नाही.परिणामी परमार्थात घडते ती फक्त पोपटपंची.तुकाराम महाराजांच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे,*

*बोलाची कढी बोलाचा भात ।*
*जेवोनिया तृप्त कोण जाहला ।।*

*सोहं किंवा अहं ब्रह्मास्मि ही महावाक्ये आज मंत्र झाले आहेत. परंतु ज्या स्वस्वरूपाचा स्वानुभव घेऊन स्वानंदाच्या स्वादाने वरील वाक्ये म्हणजे मंत्र ज्या महात्म्यानी उच्चारिले ते स्वस्वरूप आज ‘सोहं सोहं’ किंवा ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणणाऱ्या साधकांच्या दृष्टीच्या टप्यात नसते. इतकेच नव्हे तर ‘सोहं’ किंवा ‘अहं ब्रह्मास्मि’ वगैरे सारखे महामंत्र किंवा महावाक्ये यामध्ये जो परम अर्थ, परमार्थ किंवा परम गुह्य असते त्याची कल्पना सुद्धा या मंत्रांचा जप करणाऱ्या कित्येक साधकांना नसते.म्हणूनच एकनाथ महाराज सांगतात,*

*सोहं नोहे वारा। पंच महाभूतांचा पसारा । सोहंच्या विचारा । साधू जाणे ।*

*एका जनार्दनी आप आपणासी देखणे ।*

*साक्षित्वे पहाणे तेचि सोहं । ।*

*श्वास आंत घेताना ‘सो’ व बाहेर सोडताना ‘हं’ असा जो प्रकार श्वासोच्छश्वास करीत असताना चालतो,तो प्रकार “सोहं नोहे वारा” असे नाथ महाराज सांगतात. त्याचप्रमाणे देहाच्या पंचमहाभूतांच्या पसाऱ्याशी सुद्धां ‘सोहं’ चा कांही संबंध नाही असे ते सांगतात.पुढे नाथ महाराज सांगतात ‘सोहं’ मध्ये जे गुपित आहे ते फक्त सिद्ध साधूच जाणे. मग हे गुपित काय? त्याबद्दल नाथ महाराज सांगतात, सोहं म्हणजे ‘साक्षित्वे पहाणे’ व साक्षित्वे पहाणे म्हणजेच ‘आप आपणासी देखणे’ किंवा ‘देखणेची देखण्यावरी’ म्हणजेच ‘सोहं’ होय. याच संदर्भात संत सांगतात,*

*रवि दीप हिरा दाखवी देखणे   | अदृष्य देखणे संतांचिये।।*

*’सोहं’ चा वरील’ गुह्य अर्थ खरे सदगुरू ‘भेटल्याशिवाय उमजत नाही.आजकाल ‘सोहं’ मंत्र मुक्त हस्ते देणारे गुरू आहेत विपुल पण त्यांतील गुह्य अर्थाची पूर्ण जाणीव असणारे व साधकांना त्याची स्पष्ट जाणीव करून देणारे खरे सद्गुरू मात्र दुर्मिळ झाले आहेत.त्यामुळे या मंत्रांचा नुसता उच्चार होतो पण त्याने स्वस्वरूपाचा वेध लागत नाही.
*
‘खरा मी’ व ‘खोटा मी’ या दोघांचे मिश्रण मायेच्या विलक्षण प्रभावामुळे इतके बेमालूम झाले आहे की,खऱ्या ‘मी’ ला खोट्या ‘मी’ पासून पृथक करणे महाकठीण कर्म होऊन राहिले आहे,याची जाणीव फार थोड्या लोकांना असते. त्यामुळे ‘सोहं’ मधील ‘सः’ चा किंवा ‘अहं ब्रह्मास्मि’ मधील शुद्ध ब्रह्म स्वरूपाचा साधकाला पत्ताच नसल्यामुळे व खरा ‘मी’ म्हणजे खरा ‘अहं’ (Real ego) कोण हे मुळांतच खऱ्या अर्थाने माहीत नसल्यामुळे, ‘अहं’ चे निरसन होऊन त्या दिव्य अनुभवापर्यंत पोहोचण्याऐवजी या साधकाचा खोटा अहं (False ego) मात्र दिवसें दिवस फुगण्याचीच दाट शक्यता असते.

इतकेच नव्हे तर “मी ब्रह्म आहे व माझा देहाशी किंवा देहा द्वारा होणाऱ्या कर्माशी कांही संबंध नाही” असे म्हणत म्हणत स्वैराचाराच्या आहारी जाणारे कांही ‘अहं ब्रह्मास्मि’ साधक आढळतात.तोच प्रकार तुकाराम महाराजांच्या “चाले हे शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरिविण” या अभंगाचा आहे,हा अभंग स्थितीपर आहे. अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने साक्षात्काराच्या अति उच्च अशा अवस्थेवर आरूढ होऊन स्वयें पांडुरंग स्वरूप झालेल्या तुकाराम महाराजांनी हे वचन बोलणे आणि कसलीही साधना न करणारा व अहंकाराच्या चिखलाच्या दलदलीत स्थिर झालेल्या माणसाने हेच वचन केवळ संतांच्या शब्दांच्या आधाराने बोलणे यांत कांही तरी साम्य आहे का? आत्मसाक्षात्काराच्या उंच भूमिकेवर शब्दांचे अर्थ उमजणे व शब्दज्ञानाच्या खालच्या पातळीवर त्याच शब्दांचे अर्थ समजणे यांत जमीन-अस्मानाइतके अंतर आहे.

याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते.म्हणूनच संतांची वचने किंवा ऋषि-मुनींचे मंत्र जे सिद्धांत स्वरूप असतात ते साधकांना अनुभवण्यासाठी असतात,नुसते पाठ करण्यासाठी किंवा उच्चारण्यासाठी नाही. (अर्थात कांही न करण्यापेक्षां या मंत्रांचा किंवा संतवचनांचा उच्चार करणे केव्हांही चांगलेच) हा अनुभव प्राप्त होण्यासाठी ज्ञानाच्या किंवा चैतन्याच्या म्हणजेच जीवाच्या भोवती जो भ्रमरूपी काळ सर्पाचा विळखा पडला आहे तो विळखा सुटला पाहिजे.गाढ झोपलेल्या माणसाच्या पायाला विळखा घातलेला सर्प,तो माणूस जागा झाला की विळखा सोडून निघून जातो,त्याप्रमाणे स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागृती झाली की या भ्रमाचा विळखा सुटतो. स्वस्वरूपाच्या नित्य अनुसंधानाने स्वरूप साक्षात्कार होतो. म्हणूनच संत सांगतात,*

*१) माझेनि अनुसंधाने विण स्नान संध्या तप होम दान । सर्वही अधर्म जाण । मत्भजन ते नोव्हे ।।*

*२) माझेनि अनुसंधाने देख संकल्प जाळणे निःशेख | मद्याजी चोख । याची नांव ।।*

*३) सदा स्वरूपानुसंधान । हे मुख्य साधूचे लक्षण ।।*

*वरील संतांच्या वचनावरून एक मुख्य गोष्ट लक्षात येईल की, स्वरूपानुसंधान जमत नसेल तर बाकीच्या सर्व गोष्टी म्हणजे स्नान, संध्या,तप,होम,दान,भजन वगैरे सर्व हे अधर्म होत.अधर्म म्हणण्याचे प्रमुख कारण हे की,या सर्व गोष्टी केल्याने माणसाचा अहंकार वाढता रहातो. याच्या उलट सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली स्वरूपानुसंधान म्हणजे प्रत्यक्ष देवाचेच (देवाच्या मुर्तीचे किंवा प्रतिमेचे नव्हे) अनुसंधान केल्याने साधकाच्या अहंकाराचे परिवर्तन होऊन तो स्वरूपाकार होतो.खऱ्या अर्थाने साधनेचा अभ्यास म्हणतात तो हाच होय.हा अभ्यास म्हणजे साधनेचा मुकुटमणी आहे.*

*साधनेचा मुकुटमणी | वृत्ति रहावी निर्गुणी ।।*

*असे संत सांगतात. एवढेच जर केले तर अन्य कांहीही करण्याची गरज उरत नाही. याच्या उलट बाकी अनेक गोष्टी केल्या पण एवढेच केले नाही तर सर्व व्यर्थ होय.परंतु नित्य स्वरूपानुसंधान करणे ही सामान्य गोष्ट नाही.कारण हे करण्यासाठी स्वस्वरूपाची तर्काने नव्हे तर साक्षात्,प्रत्यक्ष किंवा Direct ओळख व्हावी लागते. यासाठी एक तर देवाची निसर्गाची नियतीची कृपा व्हावी लागते किंवा खरे सद्गुरू भेटावे लागतात.म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात,*

*१) जरी हा हो कृपा करील नारायण।*
*तरीच हे ज्ञान ब्रह्म होय ।।*

*२) जयासि मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा । सद्गुरुविण मोक्ष पावावा । हे कल्पांती न घडे ।।*

सद्गुरू श्री.वामनराव पै

error: Content is protected !!