ज्ञान म्हणजे आत्मज्ञान
ज्ञान हा शब्द अनेक अर्थानी वापरला जातो.व्यवहारात एखाद्या माणसाला एखाद्या विषयासंबंधी खूप माहिती (Information) असेल तर आपण म्हणतो तो मनुष्य खूप ज्ञानी आहे किंवा त्या माणसाला खूप ज्ञान आहे. परमार्थात ज्ञान हा शब्द जाणीव, ब्रह्म किंवा चैतन्य या अर्थी वापरला जातो.

त्याचप्रमाणे ज्ञान म्हणजे देव असाही ज्ञान या शब्दाचा एक अर्थ सांगण्यात येतो.त्याचबरोबर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असाही एक अर्थ या शब्दाचा आहे.अशा रीतीने ज्ञान हा शब्द अनेक अर्थी वापरला गेल्याने परमार्थात पडलेल्या अनेक लोकांचा गोंधळ होतो.विशेष करून परमार्थात ज्ञान या शब्दाचा अचूक वापर न केला गेल्यामुळे ‘ज्ञान’ प्राप्त होण्याऐवजी अज्ञान मात्र भलत्याच प्रमाणात वाढू लागण्याचा दाट संभव असतो.

‘देव’ हा शब्द सुद्धा अत्यंत ढसाळपणे । (Loosely) ) सर्वत्र वापरला जातो.देव हा शब्द मुखातून काढणाऱ्याला सुद्धा आपण नेमके कोणाला उद्देशून देव म्हणतो हे माहीत नसते. या संदर्भात “ज्ञान किंवा सत्ताज्ञान हाच देव” असे सांगण्यात येते,त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याचा किंवा असलेला भ्रम अधिकच दृढ होण्याचा दाट संभव असतो.”ज्ञान किंवा सत्ताज्ञान हाच देव” हा समज संपूर्ण चुकीचा आहे.

ज्ञान सत्ता रूपाने सर्वत्र वास करते. चैतन्याची जाणीव किंवा सत्ताज्ञान हे रूप आहे,आनंद त्याचे स्वरूप आहे व शक्ती हा त्याचा गाभा होय. म्हणून जेथे जेथे चैतन्य आहे तेथे तेथे वरील तीन मूळ घटक सत्-चित्-आनंद हे कमी अधिक प्रमाणात असतातच.Proportion may vary but the existance is there” असे चैतन्याच्या तीन घटकासंबंधी म्हणता येईल.जग हे चिन्मय आहे व म्हणून सत्ताज्ञान मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वत्र आहे.

ब्रह्म किंवा चैतन्याला देव असे संबोधण्याची चुकीची पद्धत पडून गेल्यामुळे “सत्ताज्ञान हा देवच” असा कांही लोकांचा गैरसमज झाला.ज्ञानच कर्मांवर येते म्हणून जे केले जाते ते ज्ञानच करते म्हणजे देवच करतो असा त्यातून दुसरा गैरसमज निर्माण झाला.ज्ञान हे सिद्धच आहे व ते ब्रह्म किंवा देवच आहे म्हणून अशी सिद्ध वस्तू प्राप्त करून घेण्यासाठी साधनेची मुळी आवश्यकता नाही,असा तिसरा गैरसमज निर्माण झाला.ज्ञान सत्तारूपाने सर्वत्र वास करून आहे हे खरेच.परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे तो असा की, हे ज्ञान सर्वत्र काय रूपात नांदत आहे हा होय.

ज्ञानाचे प्रकाशे वर्तति सकळ |
न घेसी बरळ देहबुद्धि ।।

पशू,पक्षी,प्राणी व सामान्य मनुष्य प्राणी या सर्वांच्या ठिकाणी जे ज्ञान नांदते ते ज्ञान देहबुद्धीने एका विशिष्ट कक्षेत नांदत असते. या ज्ञानाला knowledge by instinct उपजत ज्ञान असे म्हणतात. ” आहार-निद्रा-भय- मैथुन’ या चार गोष्टींच्या कक्षेत हे ज्ञान नांदत असते.या दृष्टिने मनुष्य प्राणी व इतर प्राणी यांच्यात कांहीही फरक नाही.नाही म्हणावयास एक फरक आहे, तो असा की इतर प्राण्यांना “मी अमुक” हे सुद्धा समजत नाही.कुत्र्याला “मी ‘कुत्रा आहे” किंवा डुकराला “मी डुक्कर आहे” हे ही माहीत नसते.

त्याचप्रमाणे त्याला हसता, बोलता येत नाही, विचार करता येत नाही, भावना शब्दांत व्यक्त करता येत नाहीत, गाता येत नाही वगैरे.. अनेक गोष्टींचे ज्ञान कुत्र्याला किंवा इतर प्राण्यांना नसते. त्यांचे ज्ञान फक्त “आहार-निद्रा-भय- मैथुन’ एवढ्या चार कक्षेत नांदत असते.हे ज्ञान किंवा चैतन्य म्हणजे देव नाही, त्याला जीव असे म्हणतात.चैतन्य सर्वत्र सर्व प्राणीमात्रातून याच प्रकाराने नांदते म्हणून त्याला जीव असे संबोधण्यात येते.

या चैतन्याचे ठिकाणी किंवा सत्ताज्ञानात स्वस्वरूपासंबंधी पूर्ण अज्ञान नांदत असते.या अज्ञानालाच भ्रम हे दुसरे नांव आहे.*

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन्सर्वभूतानी यंत्रारूढानि मायया । । ( १८ : ६१ : भ.गी.)*

असा गीतेमध्ये या भ्रमाचा किंवा भ्रमिष्ट भूतमात्रांचा अचूक उल्लेख केला आहे.मनुष्य प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची पातळी (Level) जरा उंच आहे.माणसाला “मी माणूस आहे” हे ज्ञान आहे.त्याचप्रमाणे इतर प्राण्यांना ज्या अनेक गोष्टी करता येत नाहीत त्या माणसाला करता येतात.माणसाला हे जे ज्ञानाचे विशेष वरदान मिळालेले आहे त्यालाच बुद्धी अशी संज्ञा प्राप्त झाली.

या ज्ञानाला knowledge by aquisition ‘मिळविलेले ज्ञान’ असे म्हणतात.या ज्ञानाचा वापर करून मानव चंद्रावर जाऊ शकतो किंवा अणू बॉम्ब सारखी जीवघेणी अस्त्रे तयार करून स्वतःचा सर्वनाश ओढवून घेऊ शकतो. या ज्ञानाच्या जोरावर तो मंदिरात जाऊन देवाची प्रार्थना करू शकतो किवा मदिरा पिऊन गटारात लोळू शकतो.याच ज्ञानाच्या बळावर तो लोकांचे खून करून जक्कल-जगताप होऊ शकतो किंवा तिचाच सुंदर वापर करून व उत्कृष्ट शोध लावून न्युटन – आईन्स्टाईन होऊ शकतो.

वरील प्रमाणे चांगले-वाईट,बरे-बुरे, उत्कृष्ट-नित्कृष्ट वगैरे सर्व गोष्टी करणारे सत्ताज्ञानच असते व हे ज्ञान देवरूप नसून जीवरूप असते. या ज्ञानाच्या वरची पायरी म्हणजे knowledge by inspiration यालाच स्फूर्ति ज्ञान असे म्हणतात.इतर प्राण्यांच्या ठिकाणी जे ज्ञान नांदते व मनुष्य प्राण्यांच्या ठिकाणी जे ज्ञान असते त्यात एक फार मोठा फरक आहे.ज्ञानेश्वर महाराजांनी हा फरक फारच उत्तम रीतीने दाखवून दिला आहे.

मनुष्य देहाचेनि ज्ञाने। सच्चिदानंद पदवी घेणे ।।

ज्ञान किंवा चैतन्य तत्वतः मूळ शुद्ध स्वरूपात सच्चिदानंद स्वरूप असते,परंतु मनुष्य देहाचे ठायी जे ज्ञान नांदते ते ज्ञान उपजतः स्वरूपाच्या विस्मृतीत नांदत असल्यामुळे देहबुद्धीने अशुद्ध होऊन प्रत्यक्षात अज्ञान किंवा भ्रम या रूपात नांदत असते.भ्रम घेऊनच जीव जन्माला येतो व भ्रमाचा भोपळा घेऊनच तो इहलोक सोडतो.याच संदर्भात तुकाराम महाराज सांगतात,

किती वेळा जन्मा यावे । किती व्हावे फजित ।।

असे जरी असले तरी मूळ शुद्ध स्वरूपाकडे वळण्याचे,त्याचा वेध घेण्याचे व स्वस्वरूप जागृती प्राप्त करून घेऊन सच्चिदानंद पदवी घेण्याचे म्हणजेच देवाचा साक्षात्कार करून घेण्याचे सामर्थ्य फक्त मनुष्याच्या ठिकाणी जे ज्ञान नांदते त्या ज्ञानातच आहे,अन्य कुठल्याही प्राण्याच्या ज्ञानात हे सामर्थ्य नाही.याचाच दुसरा अर्थ असा की,जर मनुष्याने सच्चिदानंद पद या ज्ञानाच्या बळावर प्राप्त करून घेतले नाही,तर मनुष्य प्राणी व इतर प्राणी यांत विशेष फरक रहात नाही.

साधना किंवा अभ्यास केल्याशिवाय ही सच्चिदानंद पदवी प्राप्त होत नाही.कारण साधनेच्या अभ्यासाने साधकाच्या ठिकाणी ऋतुंभरा प्रज्ञा म्हणजे प्रतिभा ज्ञान किंवा दिव्य ज्ञान उदयाला येते व याच ज्ञानाला आत्मसाक्षात्कार होतो.या ज्ञानाला knowledge by intuition असे म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात,

अभ्यासासी कांही सर्वथा दुष्कर नाही ।
म्हणुनि तू मज ठायी। अभ्यासे मिळ ।।

जे ज्ञान सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेते ते ज्ञान देव असून म्हणजे दिव्य स्वरूप असून इतर सर्वांच्या ठिकाणी नांदणारे ज्ञान हे जीवरूप म्हणजेच भ्रमरूप होय. ज्ञान,जाणीव,चैतन्य किंवा ब्रह्म जीव रूपात नांदते याचे प्रमुख कारण माया होय.माया ही एक विलक्षण शक्ती आहे. हिचे स्वरूप अत्यंत विचित्र व फार प्रभावी आहे. “अवर्णनीय माया” किवा “अनिर्वचनीय माया” असे म्हणतात ते खरेच आहे.विद्युत म्हणजे काय हे सांगणे कठीणच आहे, परंतु तिच्या परिणाम रूपाने विजेचा प्रभाव अनुभवता येतो.

मायेचे तसेच आहे.मायेचे स्वरूप इतके विलक्षण,विचित्र व प्रभावी आहे की हिचे खऱ्या सद्गुरूकडून योग्य ते प्रबोधन झाल्याशिवाय परमार्थात नुसता प्रवेश सुद्धा होऊ शकत नाही,मग ईश्वर साक्षात्कारापर्यंत वाटचाल करणे दूरच राहिले. “माया नाहीच’ ” असे म्हणणारे ‘विद्वान’ लोक जेव्हां आढळतात, तेव्हां तर मायेच्या विलक्षण स्वरूपाचा प्रकर्षाने प्रत्यय येतो. “माया किंवा अज्ञान नाहीच” असे म्हणणाऱ्यांचे अज्ञान अफाट,अचाट व अवर्णनीय आहे.

या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे “माया किंवा अज्ञान नाहीच’ अशी खरोखरच परिस्थिती असती तर मोठी मौज झाली असती.कारण ‘ज्ञानी’ माणसांनी भरलेल्या या जगात सर्वत्र आनंदी-आनंद होऊन हे जग म्हणजे नंदनवनच झाले असते.परंतु प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती याच्या उलटच आहे. वास्तविक,ज्ञानाच्या पलीकडे जाऊन स्वस्वरूपी स्थिर झालेल्या सिद्ध राजहंसाने अनुभवामृताच्या बळावर ‘अज्ञान नाहीच” असे म्हणणे व देहबुद्धीच्या पंकात पिचत पडलेल्या बद्ध बगळ्याने शब्दज्ञानाच्या जोरावर ” अज्ञान नाहीच’ असे म्हणणे यात कांहीतरी साम्य आहे काय? माया म्हणजे “आपण आपल्याला आपल्यातच हरवून बसणे” हे होय. खऱ्या अर्थाने ही माया नसून मायेचा परिणाम आहे.

आपण आपल्याला आपल्यातच हरवून बसणे म्हणजे संसार,तर आपण आपल्याला आपल्यातच शोधून काढणे म्हणजे परमार्थ.याच संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात,

आपुली आपण करा सोडवण ।
संसार बंधन तोडा वेगी ||

परंतु परमार्थात पडलेल्या अनेक लोकांना वरील वस्तुस्थितीची जाणीव नसते.सामान्य लोक तर सोडाच पण परमार्थात पडलेल्या भल्या भल्या विद्वान लोकांना सुद्धा “आपण आपल्याला आपल्यातच हरवून बसलो आहोत” याची खऱ्या अर्थाने जाणीव नसते. इतकेच नव्हे तर सांगूनही त्यांना हे खरे वाटत नाही, हाच मायेचा खरा प्रभाव आहे. हे मायेचे व्यक्त रूप असून यालाच ‘भ्रम’ असे संबोधण्यात येते.या भ्रमालाच जो प्रत्यक्ष आकार प्राप्त होतो त्याला अहंकार असे म्हणतात.

व्यवहारात ज्याला अहंकार म्हणतात तो अहंकार व परमार्थात ज्याला अहंकार असे म्हणतात तो अहंकार, यामध्ये जमीन-अस्मानाइतके अंतर आहे.परमार्थात सुद्धा बरेच लोक अहंकार हा शब्द चुकीच्या अर्थाने म्हणजेच व्यवहाराच्या अंगाने वापरतात.ज्ञान,जाणीव,चैतन्य किंवा ब्रह्म तत्त्व याला जेव्हां मायेचे खग्रास ग्रहण लागते तेव्हांच ते तत्त्व आपल्या मूळ शुद्ध आत्मस्वरूप पदावरून अशुद्ध अशा जीव पदावर घसरते.सर्वत्र व्यक्त जगतात हे ज्ञान किंवा चैतन्य व्यापून राहिले आहे,ते जीव रूपात.

हे ज्ञान किंवा चैतन्य म्हणजे देव नाही. त्याचप्रमाणे सर्व कांही देव करतो ही कल्पना चुकीची असून प्रत्यक्षात चैतन्यच जीव रूपाने व्यक्त जगतात सर्व कांही करीत असते. जक्कल-जगताप किंवा बिल्ला – रंगा यांच्या शरीराद्वारे ज्ञानच कर्मावर येऊन लोकांचे गळे घोटून खून करीत होते.काजी सारख्या पाजी इसमाने अनेक स्त्रियांशी लग्न करून त्यांच्याकडून पैसे उकळले ते त्याच्या ठिकाणी जे ज्ञान नांदत होते ते ज्ञानच कर्मावर येऊन या सर्व गोष्टी करीत होते.

हे ज्ञान देव असून या सर्व गोष्टी देवाने केल्या असे म्हणणे मूर्खपणाचे द्योतक ठरणार नाही काय? तुकाराम महाराज व मंबाजी भट या दोघांचेही ठायी ज्ञान नांदत होते, पण मंबाजीच्या ठिकाणी ते ज्ञान मायाधीन होऊन भ्रमरूप प्रकाराने तर तुकाराम महाराजांच्या ठिकाणी ते ज्ञान अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने मायामुक्त होवून दिव्य स्वरूपाने किंवा देव रूपाने नांदत होते.’माया’ ही एक विलक्षण शक्ती आहे हेच खरे.माया हा काय विचित्र प्रकार आहे हे सांगणे कठीणच आहे.

या मायेची गंमत मोठी विलक्षण आहे.मायेच्या पलीकडे जाऊन जो उभा रहातो व मागे वळून तिला पहाण्याचा प्रयत्न करतो,तेव्हां ती माया त्याला दिसतच नाही,कारण प्रत्यक्षात त्या अवस्थेत त्याला माया उरतच नाही. परंतु तो जेव्हां मायेच्या कक्षेत असतो तेव्हां आपण मायेच्या तडाख्यात सापडून राहिलेलो आहोत याचीच त्याला जाणीव नसते व तो मायेच्या चक्रात सापडून अक्षरशः चक्रावून गेलेला असतो. याला एक सुंदर उदाहरण देता येईल. ज्या माणसाचे डोके फिरलेले असते म्हणजे जो ठार वेडा असतो त्याला आपण वेडा आहोत हेच माहीत नसते.परंतु डॉक्टरच्या उपचाराने तो पूर्ण बरा झाला की पूर्वी लागलेले वेड त्याला दिसतच नाही.

“भ्रामयन्सर्व भूतानी यंत्रारूढानि मायया ‘ ‘ ( १८ : ६१ : भ.गी.)

असे भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात.याचा अर्थच हा आहे की, सर्व भूतमात्र भ्रमिष्ट होऊन या जगतात नांदत आहेत.तेच पुढे सांगतात की या मायेच्या तडाख्यातून सुटणारे लोक फारच थोडे आहेत,

मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यताति सिद्धये ।

*यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः । । ( ७ : ३ : भ.गी.)*

याचा भावार्थ असा की हजारो माणसांत देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणारे फारच थोडे व त्या थोड्या लोकांपैकी माझी प्राप्ती करून घेणारे अगदी बोटावर मोजण्याइतकेच.असा आहे हा मायेचा प्रताप.अशी ही विलक्षण माया कोणी निर्माण केली,ती कशी निर्माण झाली,देवाने ही माया का निर्माण केली आणि जर देवाने माया निर्माण केली तर देव दयाळू कसा वगैरे अनेक प्रश्न मायेच्या संदर्भात उत्पन्न होण्यासारखे आहेत.

या प्रश्नांचा विचार तुम्ही करीत बसलात तर या जन्मी तर सोडाच पण असे कैक जन्म विचार करीत बसलात तरी त्याचा कांहीही उपयोग होणार नाही व हे सर्व प्रश्न अनुत्तरीत रहातील.असे जरी असले तरी एक दृष्टांत देऊन वरील प्रश्नांची उत्तरे देता येणे थोडंफार शक्य आहे. आपण उभे असतो तेव्हां आपली सावली पडलेली आपण पहातो. ही सावली तर आपलीच असते पण त्याचबरोबर ती सावली आपण निर्माण केलेली नसते,असे असून सुद्धा त्या सावलीला आधार मात्र केवळ आपणच असतो.

त्याचप्रमाणे माया ही परमात्म्याची छाया आहे.तिला आधार हा सुद्धा परमात्म्याचाच आहे.तरी सुद्धा मायेला परमात्म्याने निर्माण केली असे म्हणता येणार नाही.असा आहे मायेचा अजब महिमा.म्हणूनच “ज्ञान कर्मावर येते,सर्व इंद्रियांतून हे ज्ञान कर्म रूपाने प्रसवते,सर्व कर्मांच्या पाठी या ज्ञानाचा ‘हात’ आहे” वगैरे तत्वज्ञान, नव्हे,शब्द ज्ञान,नुसते सांगून,ऐकून किंवा वाचून परमार्थ पूर्ण तर होत नाहीच पण परमार्थाला खऱ्या अर्थाने नुसती सुरुवातही होत नाही. उलट यामुळे खऱ्या परमार्थापासून वंचित होण्याचीच दाट शक्यता असते.ज्ञानाला किंवा चैतन्याला विलक्षण प्रकाराने मायेचे खग्रास ग्रहण लागलेले आहे व त्यामुळे हे ज्ञान अज्ञान रूपाने म्हणजेच भ्रम रूपाने नांदत आहे,या सिद्धांताचे उत्कृष्ट आकलन श्री सद्गुरू कृपेने होते तेव्हांच परमार्थाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते.

वेड्याला आपण वेडे आहोत हे कळत नाही, त्याचप्रमाणे एक वेडा दुसऱ्या वेड्याला सुधारू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी डॉक्टरचीच उपाय योजना होणे आवश्यक असते.त्याचप्रमाणे भ्रम वेष्टीत ज्ञानाला किंवा चैतन्याला म्हणजेच अज्ञानरूप जीवाला भ्रममुक्त करून त्याच्या मूळ शुद्ध दिव्य स्वरूपावर आरूढ करण्यासाठी भवरोग वैद्याची म्हणजेच खऱ्या श्री सद्गुरूंची नितांत गरज असते.
क्रमशः ..
              
सद्गुरू श्री वामनराव पै.

error: Content is protected !!