पिपरी:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेका निमित्त राजांच्या पूजनाने दररोज वर्गाचा प्रारंभ होत आहे. चिंचवड गावातील क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती संचालित
क्रांतिवीर चापेकर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत हा उपक्रम सुरू आहे.

इयत्ता दहावीचे विद्यार्थी स्वखर्चाने दररोज आपल्या वर्गाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने करीत आहे. विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या या उपक्रमाचे सर्वस्तरावर कौतुक होत आहे.

१९ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकास ३४९ वर्षे पूर्ण होऊन ३५० वे वर्ष प्रारंभ झाल्यानिमित्त राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. या प्रसंगापासून प्रेरणा घेऊन दररोज शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच महाराजांच्या शौर्याचा अथवा राजकीय कर्तृत्वाचा एखादा प्रसंग कथन करून आपल्या वर्गाचा प्रारंभ करण्याचा मनोदय विद्यार्थी प्रतिनिधी श्रेयस शेंडगे आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी गिरिजा हिस्वणकर यांनी वर्गशिक्षक बिभीषण चांडे यांच्याकडे व्यक्त केला.

त्यास मुख्याध्यापिका वर्षा जाधव, शिक्षिका दीपाली शिंदे यांनी आनंदाने अनुमती दिली; तसेच हा उपक्रम पूर्ण वर्षभर सुरू ठेवण्याविषयी प्रोत्साहन दिले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, प्रा. दिगंबर ढोकले, अशोक पारखी यांना या उपक्रमाविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकवृंद यांचे कौतुक केले.

error: Content is protected !!