राजन लाखे यांना ‘स्वरोपासना साहित्य गौरव’ पुरस्कार
पिंपरी:
मराठी साहित्य इतिहासात आपल्या लेखणीतून कविता, ललितलेखन तसेच संपादन क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे कवी राजन लाखे यांना चिंचवड येथे ग्लोबल म्युझिक अकादमी तर्फे अखिल भारतीय गांधर्व मंडळ, मुंबईचे अध्यक्ष पंडित बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते ‘स्वरोपासना साहित्य गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी झालेल्या सोहळ्यात व्यासपीठावर अखिल भारतीय गांधर्व मंडळाचे सचिव पंडित सुधाकर चव्हाण, रजिस्ट्रार विश्वासराव जाधव, प्रवचनकार भालचंद्रमहाराज देव तसेच स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकादमीचे संचालक अभय कुलकर्णी आणि अर्पिता कुलकर्णी उपस्थित होते.

राजन लाखे हे महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष असून नुकतीच अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे.

याप्रसंगी पंडित बाळासाहेब सूर्यवंशी यांनी, “मराठी साहित्याची चळवळ, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून चालवलेली चळवळ, कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १०० मान्यवर, १०० आठवणी, १०० कविता यांचा समावेश असलेला ‘बकुळगंध’ हा न भूतो न भविष्यती झालेला ग्रंथ ही राजन लाखे यांच्या कर्तृत्वाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत!” असे गौरवोद्गार काढले.‌

म्युझिक अकादमीचे संचालक संगीतकार अभय कुलकर्णी यांनी, “राजन लाखे यांनी हाती घेतलेल्या साहित्याचा वसा अखंडपणे सुरू असून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेचा नावलौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे त्यांचा यथोचित गौरव करण्याचा मान आमच्या अकादमीला मिळाला, हे आमचे भाग्य आहे!” अशा शब्दांत आनंद व्यक्त केला.

पुरस्कार सोहळ्यानंतर राष्ट्रीय बालगायक पुरस्कारप्राप्त अथर्व कुलकर्णी या बालगायकाचे गायन झाले.

error: Content is protected !!