नाम आणि नवविधा भक्ती
नवरात्र संपल्यावर दसरा व दसऱ्यानंतर दिवाळी असा आपल्या आनंद उत्सवाचा क्रम आहे.नवरात्रीत देवी मातेने राक्षसाशी झुंज देऊन त्याला ठार मारले.दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रभु रामचंद्राने लंकेवर स्वारी करून रावणाचा वध केला.शूर मराठे वीर सुद्धा स्वराज्याची सीमा ओलांडून परप्रांतात स्वारी करून तेथून सोने व संपत्ती लुटून आणून दसऱ्याचा दिवस साजरा करावयाचे.

तात्पर्य,राक्षसांचा संहार केल्याशिवाय व परप्रांतावर स्वारी केल्याशिवाय ना नवरात्र,ना दसरा, ना दिवाळी.परमार्थात सुद्धा असेच आहे.नवविधा भक्ती केल्याशिवाय विकाररूपी राक्षसाचा नाश नाही. त्याचप्रमाणे दशेंद्रियाने युक्त असा दहा तोंडी अहंकाररूपी रावण ठार मारल्याशिवाय व परेच्या पलीकडील परब्रह्माच्या प्रांतात प्रवेश करून तेथून स्वानंदाचे सोने लुटून आणल्याशिवाय दसरा नाही व म्हणून दिवाळीचा आनंदही नाही.

नवविधा भक्तीचे नऊ प्रकार खालीलप्रमाणे आहेत-श्रवण, कीर्तन,स्मरण,अर्चन,वंदन,दास्य, सख्य,पादसेवन व आत्मनिवेदन सूक्ष्म दृष्टीने विचार केल्यास असे दिसून येईल की,दिव्य भगवन्नामात वरील नवविधा भक्तीचे सर्व प्रकार अंतर्भूत आहेत.याचा आपण अगदी थोडक्यात विचार करू.*

श्रवण :भगवंताच्या लीला किंवा त्याच्या स्वरूपाचे गुणवर्णन किंवा त्याचे दिव्य नाम श्रवण करणे याला श्रवण भक्ती असे म्हणतात. नामाच्या उच्चारात नामाचे सहज श्रवण कानात पडत असल्यामुळे भगवन्नामात श्रवण भक्ती अभिप्रेत आहे.*

कीर्तन:भगवंताचे भक्तिभावाने नामस्मरण करता करता साधकाला नामानंद प्राप्त होतो.आनंदाची जातच अशी आहे की,तो देहाला स्वस्थच बसू देत नाही.साधी क्रिकेटची मॅच पाहताना सुद्धा एखाद्याने सिक्सर मारली तर प्रेक्षकांना इतका आनंद होतो,की ते उड्या मारून व टाळ्या पिटून आपला आनंद व्यक्त करतात. त्याचप्रमाणे नामधारकाला जेव्हा नामानंद प्राप्त होतो तेव्हा तो त्या आनंदात नाचतो,टाळी वाजवितो. मोठ्याने नाम गातो.त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटतात व अंगावर रोमांच उभे राहतात. भगवन्नामातून कीर्तन भक्ती अशा रीतीने प्रगट होते.*

स्मरण: स्मरण म्हणजे प्रभुचे स्मरण म्हणजेच देहबुद्धीचा लय व देव भावाचा उदय भगवन्नामाच्या उच्चारात अशी काही दिव्य शक्ती आहे की,नामाचा उच्चार करता करता साधक नामाचे प्रक्षेपण ज्या केंद्रातून होत असते त्या केंद्राकडे म्हणजेच प्रभुच्या चरणाकडे आपोआप सरकू लागतो.चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर सोडलेल्या दोरीचे एक टोक जर एखाद्याने घट्ट धरून ठेवले व ती दोरी चौथ्या मजल्यावरच्या माणसाने ओढावयास सुरुवात केल्यास तळमजल्यावरचा माणूस आपोआप वर सरकू लागतो व शेवटी चौथ्या मजल्यावर पोहचतो. त्याप्रमाणे स्थूल देह,सूक्ष्म देह व कारण देह या तिन्ही देहांच्या पलीकडे आहे भगवंताचे वास्तव्य भगवंताने वाचा किंवा वाणीरूपी दोरी आपल्या चरणापासून तो थेट स्थूल देहापर्यंत साधकाच्या उद्धारासाठी मोठ्या कृपेने सोडून दिली आहे.या वाणीरूपी दोरीचे पलीकडील टोक आहे परा वाणी व अगदी अलीकडील दोरीचे टोक आहे वैखरी वाणी वैखरीच्या पकडीने एकदा का भगवन्नाम घट्ट धरून ठेविले की,पुढला प्रवास भगवंताच्या कृपने आपोआप होऊ लागतो.म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात-*

सर्वसुख गोडी साही शास्त्रे निवडी ।*
रिकामा अर्धघडी राहू नको।।*
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप ।*
रामकृष्णी संकल्प धरूनी राहे ।।*

वैखरी वाणीतून भगवन्नामाची दोरी साधकाने एकदा का घट्ट पकडली,की तो साधक स्थूल,सूक्ष्म व कारण देह ओलांडून सहज भगवंत् चरणी स्थिर होतो. लोहचुंबकाच्या कक्षेत एकदा का लोखंड आले की ते झटकन चुंबकाला जाऊन चिकटते, त्याप्रमाणे भगवन्नामाचे अखंड अनुसंधान करणारा नामधारक भगवंताच्या कृपाकक्षेत येतो व अत्यंत आवेगाने तो प्रभुला जाऊन बिलगतो.परिणामी त्याच्या देहभावाचा होतो लय व देव किंवा आत्मभावाचा होतो उदय.अशा रीतीने भगवन्नामात स्मरण भक्ती अभिप्रेत आहे.*

अर्चन:पत्र,पुष्प,फल,उदक वगैरे देवाला प्रेमभावाने अर्पण करून त्यांच्या उपचाराच्या माध्यमातून देवाचे यजन करणे म्हणजे अर्चन भक्ती होय. वास्तविक,हे सर्व उपचार केवळ निमित्तमात्र आहेत.त्यांच्या पाठीमागे जर प्रेम नसेल,देवाबद्दल भक्तिभाव नसेल तर त्या उपचारांना प्रत्यक्षात काहीही महत्त्व नाही.किंबहुना ते उपचार म्हणजे केवळ कवाईत होय.भगवन्नामाच्या उपासनेने साधकाला जे दिव्य अनुभव येतात त्यामुळे नामधारकाला प्रभुबद्दल अतीव आपुलकी व प्रेम वाटू लागते.अशा नामधारकाच्या नामाच्या प्रत्येक उच्चारात प्रभुप्रेमाचा कारंजाच उडत असतो.प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याला कुठल्याही उपचारांची आवश्यकताच वाटत नाही.*

नाम गाऊं नाम ध्याऊ | नाम विठोबासी वाहू ।।*

तो नामधारक देवाला केवळ नामच वाहतो.नामाचे गायन करायचे व नाम गाता गाता नामातच विरून जायचे.याचीच आवड त्याच्या ठिकाणी जडून गेलेली असते*.

*प्रेम तेथे वास करी। मुखी उच्चारितां हरि ।।*

*अशा प्रकारे भगवन्नामात अर्चन भक्ती अभिप्रेत आहे.*

वंदन : वंदन भक्ती म्हणजेच नमन भक्ती.”प्रभु विश्वरूपाने प्रसवून राहिलेला आहे,जगरूपाने प्रभुच प्रत्यक्ष प्रगट आहे” हा बोध अंतःकरणात धारण करूनच सद्गुरु पुत्र – खरा साधक भगवन्नामाची उपासना करीत असतो.*

*जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ।।*
*हा भक्तियोग निश्चित जाण माझा।।*

*नम्र झाला भूतां तेणे कोंडिले अनंता ।।*

भगवंताला सर्वांत काही प्रिय असेल तर ती नम्रता.त्याचप्रमाणे भगवंताला सर्वात काही अप्रिय असेल तर तो अहंकार.माणूस एकदा का अहंकाराने फुगला की तो आज ना उद्या फुटलाच म्हणून समजावा.याच्या उलट माणूस जितका अधिक नम्र होईल तितका तो अधिक सूक्ष्म व विशाल बनत जाईल.भगवन्नामाची अखंड उपासना करीत असताना साधकाला एका बाजूने ‘मी’ ची ओळख पटते व दुसऱ्या बाजूने हाच ‘मी’ सर्व प्राणीमात्रांत ओतप्रोत भरलेला आहे याची प्रतीती येते.*

1.*हें विश्वचि माझे घर। ऐसी मति जयाची स्थिर ।।*
*किंबहुना चराचर आपणचि जाहला ।।*

2. *तू मन हे मीची करी । माझिये भजनी प्रेम धरी ।।*
*सर्वत्र नमस्कारी। मज एकांते ।।*

*अशा रीतीने भगवन्नामात वंदन भक्ती अंतर्भूत आहे.*

दास्य : ज्याला प्रभुचा ध्यास तोच जाणावा प्रभुचा दास. धो आस ध्यास.धी म्हणजे बुद्धी व आस म्हणजे आसक्ती.ज्या विषयाची आपल्या मनाला, चित्ताला,बुद्धीला आसक्ती वाटते, त्या विषयाचा आपण दास बनतो. ज्याला पैशाची आस तो होतो पैशाचा दास.ज्याला बाईची आस तो होतो बाईचा दास.त्याचप्रमाणे प्रभुची जेव्हा आस निर्माण होते तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने प्रभुचे दास होतो.भगवन्नामाच्या अखंड उच्चाराने साधकाला प्रभुच्या प्रेमसुखाची प्राप्ती होते व त्या सुखाच्या प्रभावाने साधक प्रभुच्या ठायी अतिशय आसक्त होतो व त्याचा अगदी दास बनतो.*

*लाचांवले मन लागलीसे गोडी ।।*
*ते जीवे न सोडी ऐसे झाले।।*

*अशा रीतीने भगवन्नामात दास्य भक्ती अंतर्भूत आहे.*

सख्य:आपल्या जीवनात दोन प्रकारची माणसे स्थूल मानाने आढळून येतात.एक दुर्वास व दुसरा सुवास,ज्यांचा सहवास नको, ज्यांचा सहवास दूर असावा असे वाटते ते दुर्वास,परंतु ज्यांचा सहवास हवाहवासा वाटतो. ज्यांच्या सहवासाने आपल्या जीवनात सुखाचा सुगंध दरवळतो ते सुवास पहिल्या प्रकारची माणसे आपण टाळतो तर दुसऱ्या प्रकारच्या माणसांच सहवास म्हणजे सख्य आपण अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे प्रभुशी सख्य करणे व ते अधिकाधिक वाढवण्याचा प्रयत्न करणे हीच सख्य भक्ती होय. नाम-नामी अभेद आहे.भगवन्नाम हेच प्रभुचे सगुण साकार रूप आहे. भगवन्नामाचा सहवास जीवनात सुखाचा सुगंध दरवळू टाकतो,हा नामधारकाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणूनच या भगवन्नामान सहवास अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न करणे,हा नामधारकाचा आवड छंद आहे आणि म्हणूनच भगवन्नामात सख्य भक्ती अंतर्भूत आहे.*

पावसेवन :यालाच आपण चरणसेवा भक्ती असेही म्हणतो.से या शब्दाचे दोन प्रमुख अर्थ आहेत. पहिला अर्थ निस्वार्थ बुद्धीने केले चाकरी व दुसरा सेवन करणे हा होय.हा शब्द संतांनी अनेक ठिकाणी आं साध्याच्या दृष्टीने ‘सेवन करणे’ या अर्थाने योजिलेला आहे.*

1.*का कमल कंदा आणि दर्दुरी।नांदणूक एकेचि घरी ।।*
*परिपरागु सेविजे भ्रमरी येरां चिखलचि उरे ||*

2.*सेवा ते आवडी उच्चारावे नाम।*

3 *तुका म्हणे देवा। चिंतन हे तुझी सेवा ।।*

4. *मन मुरे तेथ जे उरे ते तू का सेवीसी ना |*

5.*सेवितो हा रस वाटितो आणिका।*
*घ्यारे होवू नका रानभरी ।।*

6. *सुखे सेवू ब्रह्मानंदा। रामनाम गावू सदां ।।*

*भगवंताच्या चरणी विलसणारा जो प्रेमानंद,त्याचे सेवन करणे ह त्यांची चरणसेवा भक्ती होय.भगवन्नामाच्या अखंड उपासनेने भगवंताची होऊन साधकाला प्रभुवा प्रेमरस सेवन करण्याचे भाग्य प्राप्त होते.*

*अद्भुत हा रस कथाकाळी नामाचा।*

*अशा रीतीने भगवन्नामात पादसेवन किंवा चरणसेवा भक्ती अंतर्भूत आहे.*

आत्मनिवेदन:- या भक्तीची दोन प्रमुख अंगे आहेत.एक बहिरंग व दुसरे अंतरंग बहिरंगात भक्त आपली सुख-दुःखे देवाला निवेदन करतो,तर अंतरंगात भक्त आत्मसमर्पण करतो.आत्मनिवेदन भक्तीची ही दोन्ही अंगे भगवन्नामात अंतर्भूत आहेत.सुख-दुःखाचे प्रसंग सर्वसाधारणतःसर्वांवरच येतात; परंतु सामान्य माणूस सुखात डुंबतो तर दुःखात बुडतो.असामान्य माणूस सुखात डुंबतो तर दुःखात ताठ उभा राहतो.परंतु अखंड नामस्मरण करणारा नामधारक सुख व दुःख या दोन्हींना भगवन्नामात बुडवून नामात रंगून राहतो.त्याचप्रमाणे अखंड नामस्मरण करता करता साधकाचा ‘मी’ पणा नामात विरघळून जातो.*

  1.*तुका म्हणे बळी । जीव दिधला पायातळीं ।।*

2.*साधूबोध झाला नुरोनियां ठेला ।* *ठायीच मुराला अनुभवें ।।*

3.*तुका नाचे गाये। गाणियांत विरोनि जाये ।।*

*तात्पर्य,संपूर्ण नवविधा भक्ती एका भगवन्नामात अंतर्भूत आहे.*

*नवविधा भक्तीच्या नऊ दलांनी युक्त अशी ही भगवन्नामाची कळी प्रभुंचिंतनाच्या सिंचनाने सर्वांगाने उमलते-फुलते-बहरते व आनंदाच्या सुगंधाने साधकाचे जीवन दरवळून टाकते.*

*नवविधा भक्तीने भरलेली व भारलेली भगवन्नामाची तलवार घेऊन नामधारक विकाररूपी राक्षसाचा संहार करतो.*

1. *तुका म्हणे देह भरला विठ्ठले ।काम कोध केले घर रिते।*

2.*काम क्रोध लोभ निमाले ठायीची। सर्व आनंदाची सृष्टी झाली ||*

*रामनामाच्या सामर्थ्याने अहंकाराचा रावणही ठार मारला जातो.’देह मी’ अशी जी देह बुद्धी तिलाच अहंकार असे म्हणतात.सर्व दुःखाचे मूळ हाच अहंकार आहे.या अहंकाराची उत्पत्ती होते अज्ञानातून व त्याचे परिपोषण होते वासनेमुळे भगवन्नाच्या प्रसादाने एका बाजूने स्वरूपाची जागृती होऊन अज्ञानाचा नाश होतो व दुसऱ्या बाजूने प्रभुच्या प्रेमरसाची प्राप्ती होऊन वासनेचा क्षय होतो. अशा रीतीने नामाने अहंकाराचा समूळ नाश होऊन साधकाच्या जीवनात दसरा उजाडतो.या दसऱ्याच्या मुहूर्तावर पूर्वी मराठे वीर सीमोल्लंघन करीत,याचा उल्लेख वर केलाच आहे.नामधारक सुद्धा असेच सीमोल्लंघन करतो.*

*इंद्रियाणि पराण्याहुःइंद्रियेभ्यःपरं मनः|*
*मनसस्तु पराबुद्धिः यो बुद्धे परतस्तु सः।।*

*देह,इंद्रिये,मन,चित्त व बुद्धी इथपर्यंत जीवाचा व्यक्त प्रांत व त्याच्या पलीकडे देवाचा अव्यक्त प्रांत ज्याला भक्तीच्या भाषेत आपण वैकुंठ म्हणतो.(वृत्ती जेथे कुंठित होते ते वैकुंठ.बुद्धीच्या पलीकडे वृत्ती कुंठित होते म्हणून बुद्धीपलीकडील देवाचा अव्यक्त प्रांत सच्चिदानंदस्वरूपाचा प्रांत हा वैकुंठ होय.)*

*अखंड नामस्मरण करणारा साधक नाम घेता घेता अकस्मात देहातीत होतो व भगवन्नामाच्याच विमानात बसून बुद्धीची स्वराज्याची सीमा ओलांडून परेच्या पलीकडील प्रांतात-वैकुंठात प्रवेश करतो.*

*नामेचि तरले नामेचि तरले | नाम म्हणता गेले वैकुंठासी ।।*

*तेथे प्रवेश केल्यावर नामधारक लुटालूट करू लागतो;परंतु भगवंत मात्र ते कौतुकाने पाहतो.*

*लुटा लुटा संत जन अमुप हे राशि धन ।।*

*देवाच्या चरणी असणारा अमाप आनंद तो लुटतो व परत स्वराज्यात येऊन-देहावर येऊन तो लुटलेले आनंदाचे सोने स्वजनांना  प्रीतिपूर्वक वाटतो.*

1. *आपण जेवूनि जेववी लोकां |संतर्पण करी तुका ।।*

2.*सेवितो हा रस वाटितो आणिका। घ्यारे होऊ नका रानभरी ।।*

3.*एका जनार्दनी घातले दुकान।देतो मोलावीण सर्व वस्तू ।।*

*अमाप आनंद लुटून त्याचे स्वजनांना वाटप करणाऱ्या नामधारकाला जीवनातील प्रत्येक दिवस दीपावलीसारखा आनंदाचा व भाग्याचा वाटू लागतो.*

1.*विठोबाचे राज्य आम्हां नित्य दीपवाळी ।।*

2.*दसरा दिवाळी तोचि आम्हा सण | सखे संतजन भेटताती ।।*
*अमूप जोडिल्या सुखाचिया राशि। पार या भाग्यासी न दिसे आतां ।।*
*धन्य दिवस आजि झाला सोनियाचा ।*
*पिकली हे वाचा रामनामे ।।*
*तुका म्हणे कैसे होऊ उतराई।*
*ठेविता हा पायी जीव थोडा ।।*
*ठेविता हा पायी जीव थोडा ||*

*सद्गुरू श्री वामनराव पै.*

error: Content is protected !!