शहाणपण तेथे समाधान
जगात सर्वत्र दुःख,कलह,झगडे, दंगेधोपे व युद्ध लढाया सतत होऊन राहिलेल्या आहेत.त्याचप्रमाणे वैयक्तिक,कौटुंबिक,सामाजिक व वैश्विक समस्या निर्माण होऊन त्या सर्वांना मानव जातीला तोंड द्यावे लागत आहे.दारिद्र्याने पिडलेली माणसे तर सुखी नाहीच पण श्रीमंतीने माखलेली धनिक माणसे सुद्धां सुखी नाहीत.

निरक्षर असो किंवा विद्वान पंडित असो, समाधान कोणालाच लाभलेले दिसत नाही.मानव जातीची ही परिस्थिती लक्षात घेऊन राजकीय पुढारी,समाज सुधारक,शिक्षण अधिकारी,अर्थतज्ज्ञ व धर्ममार्तंड आपापल्या परीने मानव जातीच्या समस्या दूर करण्याचे प्रयत्न करीत असतात.वर्षानुवर्षे या सर्वांचे प्रयत्न चालूच आहेत.

परंतु या प्रयत्नांना यश येण्याऐवजी प्रत्यक्ष परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर,भीषण व भयानक होत आहे.राजकीय पुढाऱ्यांना असे वाटते की, लोकांच्या तात्कालिक समस्या उदाहरणार्थ – विजेचा पुरवठा करणे,घरे बांधणे,लोकांना नोकऱ्या देणे वगैरे सोडविण्याचे प्रयत्न केले की काम भागेल,प्रत्यक्षात मात्र लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या नांवाखाली हे कांही अप्रामाणिक राजकीय पुढारी लोकांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वतःचेच प्रश्न सोडवितात.

मात्र कांही प्रामाणिक राजकीय पुढारी तळमळीने लोकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करतात. परंतु हे प्रयत्न केवळ तात्कालिक स्वरुपाचे असल्यामुळे त्यातून लोकांचे प्रश्न कायम स्वरुपात सुटत नाहीत.समाजसुधारकांना असे वाटते की,वर्णव्यवस्था व जातीयता नष्ट केली म्हणजे समाजाचे प्रश्न सुटतील व त्या दृष्टीने हे समाजसुधारक सतत प्रयत्नशील असतात.या देशात वर्णव्यवस्था व जातीयता अखिल समाजाच्या सामूहिक अंतर्मनात (collective subconscious mind) इतकी खोल रुतून बसलेली आहे की ही विषवल्ली सुखासुखी निपटून काढणे जवळ जवळ अशक्य झालेले आहे.

म्हणूनच “जी जात नाही ती ‘जात’ ” अशी म्हण पडलेली आहे.जातीयता मोडणारी माणसे स्वतःच मोडीत निघतात पण जातीयता मात्र मोडली जात नाही.समाजसुधारणा करणारे कार्यकर्ते जरी प्रामाणिक व तळमळीचे असले तरी त्यांच्या प्रयत्नांना भरीव यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.शिक्षणाच्या क्षेत्रात शिक्षण अधिकारी शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी निरनिराळे प्रयोग करीत असतात. परंतु प्रत्यक्षात मात्र शिक्षणाचा दर्जा वाढलेला दिसत नाही.

शाळा-कॉलेजांत विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते ते प्रामुख्याने नोकरीधंदा करण्यासाठी म्हणजेच पोट भरण्यासाठी फार तर उपयुक्त ठरते.वास्तविक,मानसिक उन्नती हा शिक्षणाचा मुख्य भाग असला पाहिजे.परंतु प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांच्या मानसिक उन्नतीसाठी कुठल्याही प्रकारचे शिक्षण दिले जात नाही.इतकेच नव्हे तर पोट भरण्यासाठी सुद्धां या शिक्षणाचा उपयोग होत नाही असे आढळून येते.आता तर शिक्षण क्षेत्रात सावळा गोंधळ चाललेला आहे.समाजातील लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून राज्यकर्ते अर्थतज्ज्ञांच्या मदतीने विविध प्रकारच्या आर्थिक सुधारणा करीत असतात.परंतु या प्रयत्नांना विशेष यश प्राप्त झालेले दिसत नाही.

उलट श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब माणसे अधिक दरिद्री होत आहेत,असे दिसून येते.कोट्यावधी माणसे अजूनही दारिद्र्य रेषेखाली भयाण जीवन जगत आहेत ही लांच्छनास्पद गोष्ट आहे. थोडक्यात,श्रीमंत आणि गरीब या दोहोंमधील दरी अरुंद होण्याऐवजी दिवसेंदिवस ती अधिकच रुंद होत चाललेली आहे,ही मोठी खेदाची गोष्ट होय.धर्माच्या क्षेत्रात तर सगळाच आनंदीआनंद आहे.’धर्म कशाशी खातात’ हेच जगातील सर्व धर्मांतील बहुतेक सर्व धर्ममार्तंडाना कळलेले दिसत नाही.धर्माच्या नांवाखाली अधर्म माजलेला आहे.

स्वतःच्या धर्माच्या लोकांची संख्या वाढविण्यासाठी अन्य धर्मातील धर्ममार्तंड वाटेल ती दुष्कृत्ये करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. धर्मांतर घडवून आणण्यासाठी जबरदस्ती करणे,प्रलोभने दाखविणे,अन्याय व अत्याचार करणे,या सर्व गोष्टी इतिहास कालापासून सर्रास चालत आलेल्या आहेत.धर्माच्या नांवाखाली या सर्व गोष्टी चालाव्यात ही मानव जातीला कलंक फासणारी गोष्ट आहे.

खरा धर्म नेमका कशात आहे,याचेच या धर्ममार्तंडाना ज्ञान नसल्यामुळे धर्माच्या नांवाखाली सर्व धर्मच करीत आहेत.अत्यंत खेदाची गोष्ट अशी की,धर्माच्या नांवाखाली वरील सर्व प्रकारच्या घृणास्पद गोष्टी करण्याने प्रत्यक्षात ते परमेश्वराच्या दरबारात गुन्हेगार ठरत असतात,याची त्यांना जाणीव सुद्धां नसते.उलट या सर्व निंद्य गोष्टी करून आपण देवाची व धर्माची फार मोठी सेवा करून राहिलेलो आहोत या भ्रमातच हे धर्ममार्तंड असलेले दिसून येतात.

वरील विवेचनावरून असे दिसून येईल की,मानवी कल्याणासाठी मानव जात ज्या अनेक चळवळी करून राहिलेली आहे,किंवा जे उपाय करून राहिलेली आहे,ते प्रत्यक्षात उपाय न ठरता अपायच ठरत आहेत,अशी मानवजातीची प्रत्यक्ष अनुभूती आहे.मग प्रश्न निर्माण होतो तो असा की,मानव जातीचे भले करण्यासाठी नेमका कोणता उपाय योजला पाहिजे? म्हणून या संदर्भात आपण थोडक्यात विचार करण्याचा प्रयत्न करू.मानव जातीच्या सर्व समस्या निर्माण होतात त्याला एकमेव कारण म्हणजे ‘शहाणपणाचा अभाव’ होय. जेथे जेथे दु:ख आहे,कलह आहे, तंटे-बखेडे आहेत.

तेथे तेथे शहाणपणाचा अभाव असलेला आढळून येईल.शहाणपणाच्या अभावामुळे माणूस अनेक अनिष्ट गोष्टींना आमंत्रण देत असतो. लोकांचा असा समज आहे की, भरपूर पैसा मिळाला की,आपण सुखी होऊ व आपल्या जीवनातील सर्व समस्या सुटतील.ही जर वस्तुस्थिती असती तर जगातील सर्व श्रीमंत लोक सुखी, समाधानी आहेत असे दिसून आले असते. उलट श्रीमंत माणसांना पैशाचा लोभ अधिक असतो व त्या लोभापोटी हे लोक वाटेल त्या अनिष्ट गोष्टी करण्यास प्रवृत्त होतात. ‘क्रिया तशी प्रतिक्रिया’ या निसर्गनियमाप्रमाणे त्यांनी केलेल्या अनिष्ट कर्माना अनिष्ट स्वरुपाच्या प्रतिक्रिया प्राप्त होऊन ही माणसे अधिकच अशांत होतात.

शारीरिक व मानसिक रोगाने पछाडतात आणि अधिकच दुःखी होतात.सत्ता संपत्तीच्या मागे लागलेली माणसे वाटेल ती अनिष्ट कृत्ये करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. ‘पेरावे तसे उगवावे’ या न्यायाने या लोकांना शेवटी अपयश प्राप्त होऊन वैफल्यग्रस्त जीवनाला सामोरे जावे लागते.थोडक्यात सुख,शांती, समाधान प्राप्त करून घेण्यासाठी माणसे जेवढे अधिक प्रयत्न करतात तेवढे ते सुख,शांती, समाधानापासून दूर-दूर जाऊ लागतात.जीवनविद्येच्या तत्वज्ञानाप्रमाणे मानव जातीच्या सर्व समस्यांवर ‘शहाणपण’ हा एकमेव उपाय आहे.या संदर्भात जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत लक्षात घेणे आवश्यक आहे .

‘कर्माचे फळ देण्याचे सामर्थ्य कर्मातच आहे’ असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे.लोकांचा मात्र असा गैरसमज आहे की,कर्म आपण करायचे व त्याचे फळ देवाने द्यायचे या गैरसमजुतीमुळे लोक कर्म करताना बेसावध असतात किंवा बेधडक करतात.मुळात देव न मानणारे लोक बरेच आहेत आणि जे लोक देव मानतात ते स्वतःची अशी समजूत करून घेतात की देव फळ देईल तेव्हां देईल,सध्या त्याचा विचार करण्याची गरज नाही,परंतु वर म्हटल्याप्रमाणे कर्माचे फळ देण्याचे सामर्थ्य कर्मातच आहे. म्हणून माणूस जी इष्ट किंवा अनिष्ट कर्मे करतो त्याप्रमाणे त्याला ‘क्रिया तशी प्रतिक्रिया’ या निसर्ग नियमांप्रमाणे इष्ट किंवा अनिष्ट फळे प्राप्त होत असतात.

विचार-उच्चार आचार हे सर्व ‘कर्म’ या सदराखाली येतात.विचारातून उच्चार आणि आचार निर्माण होत असल्यामुळे, विचार ही मानवी जीवनाची गंगोत्री आहे. म्हणून जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत असा आहे की,*

*’तुमचे विचार बदला म्हणजे तुमचे नशीब बदलेल.’*

*अनिष्ट विचारांतून अनिष्ट नशीब फळाला येते;याच्या उलट इष्ट विचारांतून इष्ट नशीब साकार होते.*

*’सुंदर,सुरेख व सुबक विचारांची प्रयत्नपूर्वक जोपासना करणे,हीच देवाची खरी उपासना होय.’*

*माणसे अनेक प्रकारचे उपासनेचे प्रकार करीत असतात व निरनिराळ्या कर्मकांडांत ते स्वतःला अडकवून घेतात.या कर्मकांडातून विशेष कांही फलनिष्पत्ती होत नाही.परंतु प्रयत्नपूर्वक व अट्टाहासाने माणसाने सुंदर व सुरेख विचारांची जोपासना केली तर ‘विचार तसा जीवनाला आकार’ या जीवनविद्येच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे जीवन सुख, शांती, समाधान, आनंद यांनी बहरून जाईल.’शुभ  नियती’ निर्माण करण्यात खरे शहाणपण आहे असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. परंतु नियती कशाला म्हणतात हे आपण प्रथम पाहिले पाहिजे.
*

लोकांचा असा समज आहे की, नियती नांवाची एक अचिंत्य अन्य शक्ती असून ती माणसाचे जीवन तिच्या लहरीप्रमाणे नियंत्रित करीत असते.त्यामुळे माणसे दैवाधीन व प्रारब्धाधीन झालेली दिसून येतात. परंतु लोकांची ही समजूत संपूर्ण चुकीची आहे. विचार-उच्चार-आचार यांच्या द्वारे माणूस जी कर्मे करीत असतो,ती कर्मे निसर्ग नियमांना कार्यान्वित करतात व त्यातून जी निर्मिती होते, त्या निर्मितीला नियती असे म्हणतात.याचाच अर्थ असा की, माणूस जी कर्मे करतो त्या कर्मातूनच त्याची नियती निर्माण होत असते व तीच नियती त्याच्या जीवनावर प्रभाव टाकून त्याचे जीवन घडवीत किंवा बिघडवीत असते.

नियती दोन प्रकारची असते. माणसाच्या शुभ कर्मातून जी नियती निर्माण होते, ती शुभ नियती होय. याच्या उलट अशुभ कर्मातून जी नियती निर्माण होते ती अशुभ नियती होय.शुभ नियती माणसाचे भले करते तर अशुभ नियती माणसाचे वाटोळे करते.माणसा-माणसांचा मिळून समाज बनत असल्यामुळे माणसे जी शुभ किंवा अशुभ नियती निर्माण करतात त्यातून समाजाचे भले किंवा वाटोळे होत असते.वरील विवेचनावरून जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत लक्षात येईल तो हा की, ‘शहाणपण’ हे मानवी जीवनातील सर्व समस्यांवर एकमेव रामबाण उपाय आहे.

त्याचप्रमाणे शुभ नियती निर्माण करण्यात खरे शहाणपण आहे.नित्य शुभ चिंतन व ईश्वर चिंतन केल्याने व चिंतन ही मानवी जीवनाची गंगोत्री असल्यामुळे मानवी जीवनाला इष्ट वळण प्राप्त होऊन मानवी जीवनाच्या सर्व समस्या सुटतील असा जीवनविद्येचा अमोल सिद्धांत आहे.थोडक्यात,राज्यकर्त्यांचे सर्व प्रयत्न,समाजसुधारकांच्या सर्व चळवळी,शिक्षण क्षेत्रातील सर्व सुधारणा व धर्ममार्तंडांच्या सर्व हालचाली शहाणपण निर्माण करण्याच्या दिशेने असल्या पाहिजेत असा जीवनविद्येचा ठाम सिद्धांत आहे.*

सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!