सोमाटणे:
पुसाणे गाव विठ्ठल नामाच्या गजरात दंगून गेले. निमित्त होते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी काढलेली पायी दिंडी.  विद्यार्थ्यांनी काढलेल्या पालखी सोहळ्यात ज्ञानोबा माऊलीचा गजर होता. टाळ,विणा,मृदुंगाचा टिपेला गेलेला निनाद.. डोक्यावर तुळशी वृंदावन..भगव्या पताका आणि सावळया विठूरायाची केलेली वेषभूषा यामुळे पुसाणेत पंढरी अवतरली होती.

आषाढी वारीच्या निमित्ताने पुसाणे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा संपन्न झाला.या सोहळ्यात गावातील अबालवृध्द मोठ्या संख्येने वा उत्साहाने सहभागी झाले होते. मृदुंगाच्या तालावर व टाळाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबांच्या नामस्मरणात सर्व विद्यार्थी , शिक्षक , ग्रामस्थ  दंग झाले होते.

गावाला वारकरी सांप्रदायाची परंपरा असल्याने जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे  हा वारसा असाच संक्रमित व्हावा , नव्या पिढीला , शालेय विद्यार्थ्यांना नामस्मरणाचे , दिंडीचे महत्त्व कळावे या उद्देशाने या शालेय दिंडीचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापक अरुण साळुंखे यांनी सांगितले.

        जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून निघालेली दिंडी संपूर्ण गावातून फिरुन विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आली.गावातून दिंडी जात असताना गावातील अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले.महिलाभगिनींनी आरतीचे ताट करुन दिंडीचे स्वागत केले.
       
      विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर उभ्या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.रिंगण सोहळ्याचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .रिंगणसोहळ्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करुन सोहळ्याची सांगता करण्यात आली.सोहळ्याची सांगता होत असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने गावीत शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण तयार झाले.
     
       या पालखीसोहळ्याच्या आयोजनात शाळेचे मुख्याध्यापक अरुण साळुंखे , शिक्षक  सुभाष गोफणे , वैशाली मिसाळ , बाबुराव गायकवाड , प्रमोद भोईर यांनी सहभाग घेतला.सदर पालखी सोहळ्यास गावातील अनेक मान्यवर व पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!