✒️ भजन

भजन या विषयासंबंधी जनमानसांत बरेच गैरसमज असलेले दिसून येतात.सामान्य माणसे ज्याला भजन म्हणतात व संतांना अभिप्रेत असलेले भजन या दोहोमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते.लोकांचा असा गैरसमज आहे की देवाचे भजन करण्यासाठी गळा गोड पाहिजे,गायनाचे अंग असले पाहिजे व साथ करण्यासाठी टाळ,मृदुंग,पेटी वगैरे वाद्ये असली पाहिजेत.प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र याच्या उलट आहे.

🎯 हृदयातील भगवंताचे भक्ती-भावे नित्य भान घेणे,हे देवाचे भजन तर टाळ-मृदुंगावर अभंग गायन करणे याला बुवाचे भजन असे म्हणतात.

🎯 शुद्ध भावाने,देवाच्या प्रेमाने, देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच,याच्या उलट धन,मान,मोठेपणा मिळविण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते.

🎯 स्वस्वरूपाचे अखंड भान या नांव भगवंताचे भजन.

🎯 भजन या सदराखाली जे काही केले जाते ते सामान्यपणे देवाचे भजन नसून बुवाचे भजन असते.

🎯 भगवंताशिवाय काहीही न सुचणे व रूचणे अशी मनाची जी अवस्था,अवस्थेला भजन असे म्हणतात.

🎯 आत्मियतेने भगवंताचे भान घेणे म्हणजे भजन.

🎯 ‘भगवत् भावाचे चित्तांत धारण” म्हणजे भजन, या भावधारणेतून प्राप्त होते ते स्वानंदाचे भोजन व सिद्ध होतो तो भगवंत.

🎯 विकारांचा विटाळ टाळून विठ्ठलाला प्रसन्न करून घेण्यासाठीच हातात टाळ घ्यावयाचे असतात,हे तत्त्व विसरून केलेले भजन हे भजन नसून केवळ टाळकुटी होय.

🎯 भजन करणे म्हणजे नुसते टाळ वाजविणे नव्हे.भक्तिभावाने भगवंताचे स्मरण करून चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे भजन.

🎯 नियमाने भजन करणे ही गोष्ट मोठी.परंतु नियमासाठी भजन करणे ही गोष्ट छोटी.

🎯 भजन म्हणजे भगवत् प्रेमामृताचे भोजन.

🎯 भाव हा भजनाचा आत्मा आहे.

🎯 भावना भगवंताजवळ भावपूर्वक व्यक्त करणे,या नांव भजन.

🎯 ‘एकमेकांनी एकमेकांना सुखाने जगू देणे’ हेच आहे भगवंताचे भजन,तेच आहे देवाचे पूजन व तोच आहे खरा धर्म.

🎯 संतांना अभिप्रेत असलेले भजन व टाळ सुरावर केलेले भजन यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे.

🎯 भगवंताचे अखंड स्मरण या नांव भजन.

🎯 दोन तास टाळ कुटायचे व बाकीचा सर्व वेळ कुटाळकी करण्यात घालवायचा,याला भजन म्हणत नाहीत.

🎯 सदैव ईश्वरस्मरणांत असणे, याला भजन असे म्हणतात.

🙏 ~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

error: Content is protected !!