
मानाचे पद हे जनतेच्या कल्याणासाठी वाहणारे’ माझे बाबा माझे आदर्श
फादर डे विशेष :
ना कुणा बद्दल ईर्षा..ना कुणाचा द्वेष..ना लोभ ना मत्सर..उमेद्यापणात लोकहिताची जपवणूक करीत मिळालेले मानाचे पद हे जनतेच्या कल्याणासाठी वाहणारे’ माझे बाबा माझे आदर्श ‘आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारणात ओतप्रोत माणुसकीने विरोधाला आपलसं करण्याची हातोटी त्यांनाच.
प्राथमिक शिक्षण घेतानाच वर्गाची पटसंख्या पूर्ण व्हावी म्हणून इयत्ता पाचवीतून बोर्डिंगच्या शाळेत थेट सातवीत त्यांना प्रवेश मिळाला. ते त्यांच्या उपजत बुद्धीच्या जोरावरच.
पुढे वडगाव मावळ येथील रयत शिक्षण संस्थेत माध्यमिक शिक्षण घेऊन ते शेतीत रमले, फार कमी वयात डाहूली ग्रामपंचायत पंचायतीचे सदस्य झाले दुसऱ्या टर्मला देखील बिनविरोध सदस्य होऊन, सरपंच पदाच्या अटीतटीच्या निवडणूकीत सोय-यांच्या मदतीने निवडणूक आले.
माजी राज्यमंत्री मदन बाफना यांचे कट्टर समर्थक अशी बिरुदावली आजही ते मोठ्या अभिमानाने मिरवत आहेत. मूळात नेतृत्वाला वक्तृत्वाची जोड असल्याने
माजी मंत्री मदन बाफना साहेबांच्या निवडणुकीतील ग्रामीण भागातील बैठकीत कायमच काँग्रेस उमेदवारांचे व त्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन केले. माजी आमदार रघूनाथराव सातकर यांच्याशी त्यांचे सौख्य.
राजकारणात आज सक्रीय नसले तरी, त्यांची राजकारणाची पंधरा वर्षाची तळमुळे खोलवर रूजली होती.सरपंच पदाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने चाराबंदी, वृक्षलागवड, कु-हाडबंदी, दारूबंदी हा चारसूत्री कार्यक्रम आणला होता.हा कार्यक्रम ग्रामपंचायतीत राबवून त्यांनी शासनाच्या कृषी मासिकातून त्याला शासनाने प्रसिद्धी दिली.
या कार्यक्रमांच्या अनुषंगाने गावातील पस्तीस कुटूबियांपैकी सत्तावीस कुटंबात गोबर गॅस प्रकल्प राबवला होता. शिवारातील शंभर एकर जमिनीवर दहा हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन केले आज .गावच्या भोवतील दिसणारी हिरवीगार वनराई त्याचेच फलित आहे. या वनराईमुळे अनेकांना आर्थिक उत्पन्न मिळाले. त्यातून काही गावकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा , शिक्षणाचा खर्च भागला. गावाला जोडणारा कच्चा मातीचा रस्त्ता त्यांनीच गावात आणला. गावातील
वीज, कातकरी समाजासाठी घरकुल योजना राबविण्यात त्यांचा पुढाकार होता.
स्व.दिलीपभाऊ टाटिया यांच्याशी त्यांची मैत्री होती. शिक्षणाबद्दल च्या ओढीने चौथी पर्यत असणाऱ्या गावात पहिल्यांदा सातवीचा वर्ग आणि त्या पाठोपाठ दहावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय करण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती. राजकारणातील कामाचे श्रेयाला त्यांनी कधीच महत्व दिले नाही पण त्यांची कामे मुले म्हणून आम्ही जवळून पाहिली, अनुभवली.टाटा पाॅवरच्या शेतीला आणि प्यायला पाणी या अंदोलनातील आक्रमक अंदोलन कर्ता म्हणून आम्ही आमच्या वडीलांना पाहिले आहे.
त्यांच्या सरपंच पदाच्या काळात आदरणीय शरदचंद्र पवार महाराष्ट्रचे मुख्यमंत्री होते. टाटाच्या या समस्येवर विधीमंडळात जाऊन त्यांची भेट घेणारे माझे वडील आहेत.याचा आम्हा भावंडाना आदर आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालीन पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या टाटांच्या या बैठकीचे इतिवृत्तात पोस्टाने घरी पाठवलेला आम्ही वाचला.पुढे याच लढ्यात भाई भरत मोरे यांच्या समवेत त्यांनी केलेले कामाच्या आठवणी भाई मोरे सांगतात.
आता ते राजकारणात सक्रिय नसले तरी काँग्रेसची विचारधारा त्यांची खोलवर रूजली आहेत. पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेसशी तशीच घट्ट जखडून राहिली. आरोप प्रात्यारोपाला त्यांनी कधीच भीक घातली नाही, कायम स्वाभिमानाने राहिल्याने ते आमचे आदर्श असणे स्वाभाविक आहे. आज फादर डे आज त्यांच्या कार्याला कर्तृत्वाला अभिवादन करण्याचा दिवस, त्यांच्यातील निस्वार्थपणाचा ठेवा,हाच आमचा सगळ्यात मोठा आदर्श आहे. त्यांनी माणुसकीने जपलेली आणि जोडलेली नाती हेच आमचे ऐश्वर्य आहे. त्याची जपवणूक आमच्या पुढच्या पिढ्यांनी केली तरी आमचे जीवन सार्थकी ठरेल ऐवढेच.
खेड तालुक्यातील वाडा गावाजवळील दरकवाडी येथील जाखोबा देवाला केलेल्या नवसावरून आमच्या वडीलांचे नाव ‘जाखोबा भाऊराव वाडेकर ‘असे ठेवले.कधीकाळी या मंदिराच्या परिसरात आम्हा वाडेकर मंडळींना दर्शनासाठी फिरकू देत नव्हते,त्या गावक-यांशी माणुसकीने वडीलांनी नाळ जोडली. जिथे आज आम्ही मोठया थाटामाटात आणि ढोलताशांच्या गजरात देवाच्या दर्शनाला जातो. जिथे आम्ही सोयरीक जोडली आहे.
आमचा परकेपण कायमचा दूर झाला.
अशी अनेक नावे सांगता येतील जी नाती वडीलांनी जोडली आम्ही फक्त त्याला जपण्याचा प्रयत्न करतो.आजच्या फादर डे ला वडिलांना हार्दिक शुभेच्छा. पण या शुभेच्छा देताना अजून दोन नावांचा उल्लेख करावा लागेल एक आत्या जाईबाई बाबूराव जाचक आणि चुलते यशवंत भाऊराव वाडेकर ज्यांनी वडिलांवर निस्सीम प्रेम केले.
( शब्दांकन- रामदास जाखोबा वाडेकर, संपादक मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन )
- हरकचंद रायचंद बाफना डी.एड कॉलेजची शैक्षणिक सहल
- मुरलीधर गरूड यांचे निधन
- सुदवडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गुलाब दत्तात्रय कराळे (पाटील) बिनविरोध निवड
- सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे तामिळनाडूतील कार्य अभिमानास्पद
- संविधान हा भारतीय लोकशाहीचा आत्मा! – ॲड. सतिश गोरडे



