नाम आणि हरिपाठ
ज्ञानेश्वर महाराजांनी,’ज्ञानेश्वरी, अमृतानुभव चांगदेव पासष्टी व ‘अभंग’ असे   वाड्•मय प्रसूत केले. सत्तावीस अभंगांनी युक्त असा हरिपाठ हा त्या वाड्•मयातील  महत्त्वाचा छोटा ग्रंथ आहे. हरिपाठाच्या या सत्तावीस अभंगांतून ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचा महिमा सर्वागांनी गायलेला आहे.

व्यासांची ब्रह्मसूत्रे, पातंजलींची योगसूत्रे व नारदमुनींची भक्तिसूत्रे सुप्रसिद्ध आहेत,त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांचा हरिपाठ म्हणजे त्यांची नामसूत्रे होत.सूत्रबद्ध पद्धतीच्या लेखनाचे मुख्य वैशिष्ट्य असे की,मोजक्या शब्दांत महान आशयाचा विषय सांगणे हा होय.या पद्धतीला अनुसरून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातून मोजक्या शब्दांत नामाचा महान विषय शब्दबद्ध केलेला आहे.

प्राचीन संतांपासून ते अर्वाचीन संतापर्यंत नामाचा महिमा सर्व संतांनी सांगितलेला आहे; परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचा महिमा सांगणे यात एक खास वैशिष्ट्य आहे.ज्ञानेश्वर महाराज हे योगियांचे शिरोमणी,ज्ञानियांचे मुकुटमणी व भक्तांचे अग्रगणी होते. थोडक्यात,ज्ञान,भक्ती आणि योग ज्ञानेश्वरांच्या घरी पाणी भरत होते.

अशा थोर सत्पुरुषांनी नामाचा महिमा सांगणे याला खास महत्त्व आहे.एखाद्या अशिक्षित व अननुभवी पोट भरणाऱ्या हरिदासाने नामाचा महिमा सांगणे व ब्रह्मानंदाने ज्यांचे पोट भरलेले आहे त्या सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचा महिमा सांगणेयात जमीन-अस्मानाइतके अंतर आहे.कलियुगात नामाचे महत्त्व विशेष आहे,कारण हटयोग करण्यासाठी शरीर पुष्ट पाहिजे तर ज्ञानयोग साधण्यासाठी मन तुष्ट लागते.

प्रस्तुतच्या काळात लोकांजवळ पुष्ट शरीरही नाही व तुष्ट मनही नाही.त्यामुळे हटयोग व ज्ञानयोग हे सामान्यजनांना आवाक्याबाहेरचे होऊन राहिलेले आहेत.’नाम’ हा भक्तियोगाचा आत्मा समजला जातो,म्हणून नामस्मरणात पूर्ण भक्तियोग सामावलेला आहे.त्याचप्रमाणे नामजप किंवा नामस्मरण करण्यासाठी काळाची,वेळेची किंवा स्थळाची बंधने नाहीत.

नामस्मरणाला वर्ण,धर्म,जात,कुळ किंवा वंश यांचीही बंधने नाहीत. त्याचप्रमाणे श्रीमंत व गरीब,अव्यंग वा अपंग किंवा साक्षर वा निरक्षर अशा कुठल्याही प्रकारच्या माणसांना नामस्मरण करण्यास आडकाठी येत नाही.थोडक्यात, नामस्मरणाचा अधिकार यच्चयावत सर्व माणसाना संतांनी बहाल केलेला आहे.’नाम’ हा संतांनी लावलेला एक फार मोठा शोध आहे; परंतु लोकांना या सत्याचा बोध झालेला दिसत नाही.तुकाराम महाराजांनी नाम हा संताचा एक मोठा शोध आहे याचे सुंदर रीतीने वर्णन केलेले आहे,ते सांगतात-*

संत अंकाती बैसले। सर्वही सिद्धांत शोधिले ।।
ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनि ।।

ते हे श्रीहरिचे नाम। सर्व पातकां करी भस्म ।।

अधिकारी उत्तम आणि अधम । चारि वर्ण नरनारी।।

वेदांचा अधिकार फक्त तीन वर्णांनाच आहे.तर नामाचा अधिकार चारही वर्णाना व स्त्रियांना आहे.माणसे सुष्ट असोत किंवा दुष्ट असोत,उत्तम असोत किंवा अधम असोत,सज्जन असोत किंवा दुर्जन असोत,नामाचा अधिकार या सर्वांनाच आहे.असे हे नाम संतांनी एकांतात बसून,सर्व सिद्धांतांचा अभ्यास करून,खोल ज्ञानदृष्टीने शोधून काढले व सर्व जनांना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता उपलब्ध करून दिले

.नामस्मरणाचा अधिकार संतांनी सर्वांना जसा उपलब्ध करून दिलेला आहे,त्याप्रमाणे नामाचा महिमा संतांनी स्पष्ट शब्दांत सांगितलेला आहे. हरिपाठात व अन्यत्र ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचा महिमा अभंगातून विशद केलेला आहे,तो असा-
 नामस्मरणाने शारीरिक व मानसिक रोग दूर होतात.
नामस्मरणाने संकटे व विघ्ने नाहीशी होतात.
 नामस्मरणाने सुखसमाधान प्राप्त होते.
 नामस्मरणाने अगणित पुण्याची प्राप्ती होते.
 प्रत्यक्ष परमेश्वर नामस्मरण करणाऱ्यांना अनुकूल होतो.
  वेदशास्त्रांचे प्रणेते ऋषीमुनी नामस्मरण करणाऱ्यांना हात उभारून आशीर्वाद देतात.
  नामस्मरणाने चारही मुक्ती प्राप्त होतात.

असे हे हरिनाम स्थूल दृष्टीने एक ध्वनी आहे,सूक्ष्म दृष्टीने पाहता तो एक दिव्य विचार आहे व अती सूक्ष्म दृष्टीने न्याहाळता ते एक तत्व आहे. या तीनही दृष्टिकोनांतून नामाचा महिमा संतांनी सांगितलेला आहे व ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातून गायलेला आहे.

नामाचा उच्चार करण्यात किंवा घोष करण्यात किंवा संकीर्तन करण्यात ध्वनी निर्माण होतो व त्या ध्वनीमुळे वातावरणात लहरी ( Vibrations) निर्माण होतात.नामघोष करण्यात नामधारकाचा हरिनामासंबंधी जो शुद्ध भाव असतो त्या शुद्ध भावाच्या प्रभावामुळे वातावरणात शुद्ध लहरी निर्माण होतात व त्या शुद्ध लहरी वातावरणनिर्मिती करण्यास कारणीभूत ठरतात. हे लक्षात घेऊन ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात-

असे माझेनी नामघोषे | नाहीशी करीती विश्वाची दुःखे ।।
अवघे जगची महासुखे । दुमदुमीत भरले ।।
त्याचप्रमाणे ते हरिपाठात सांगतात-
हरिमुखे म्हणा,हरिमुखे म्हणा ।
पुण्याची गणना कोण करी ।।   ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।
भरला घनदाट हरी दिसे ।।

थोडक्यात,
हरिनामाच्या उच्चाराने वातावरणात शुद्ध लहरी निर्माण होऊन अखिल विश्वात पसरतात, वातावरण शुद्धी करतात व विश्वाला उपकारक ठरतात.सूक्ष्म दृष्टीने पाहता ‘नाम’ हा एक दिव्य विचार आहे.देवाला दिलेले नाव म्हणजे नाम,प्रत्येक शब्दाला किंवा नांवाला अर्थ असतो.देव या शब्दाचा अर्थ दिव्य म्हणून देवाचे नांव म्हणजे दिव्य नाम देवाला जी नावे दिलेली आहेत,त्या प्रत्येक नांवाला अर्थ आहे.उदाहरणार्थ,राम या नामाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सुरेख सांगितलेला आहे. ते सांगतात-

तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम।।
की भांतासी काम विषयावरी ।।

येथे ‘राम’ म्हणजे ‘सर्व सुखाचा आराम’ असा राम या नामाचा अर्थ स्पष्ट शब्दात सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे सर्व दःखाने जो हरण करतो तो हरि असा हरि या नामाचा अर्थ आहे.गोविंद म्हणजे सर्व इंद्रियातून जो स्वानंद प्रगट होतो त्या स्वानंदाला गोविंद असे म्हणतात.

जो विश्वात भरलेला आहे व ज्याच्यात विश्व वास करते त्याला विठ्ठल असे म्हणतात.देवाच्या नामाचे हे अर्थ लक्षात घेता दिव्य नाम म्हणजे दिव्य विचार आहे हे लक्षात येईल.माणसाचे जीवन विचारांनी सदैव भरलेले असते. सर्वसाधारणपणे हे विचार प्रत्यक्षात बहुतेक कुविचार असतात.भयगंड, आसक्ती,लोभ,मत्सर,द्वेष,चिंता वगैरे सर्व गोष्टींनी युक्त असे नकारात्मक,घातक व बाधक असे कुविचार माणसाच्या मनात सतत वावरत असतात.हे कुविचार माणसाच्या बहिर्मनातून अंतर्मनात घुसतात,तेथे मुरतात व कालांतराने जीवनात स्फुरतात.

“जसे विचार त्याप्रमाणे जीवनाला आकार प्राप्त होत असतो”, हा जीवनविद्येचा सिद्धांत लक्षात घेता,माणसाच्या मनात जे कुविचार नांदतात ते कुविचार त्याच्या जीवनात त्याच प्रकाराचे विकृत रूप धारण करून प्रगट होतात.याचाच परिणाम असा झाला,की अखिल विश्वात मानवी जीवन भ्रष्ट व भ्रमिष्ट झालेले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे कुविचारांचे भयानक प्रदूषण माणसाच्या वैचारिक विश्वात सतत होऊन राहिलेले आहे.

म्हणून एका बाजूने या कुविचारांचे प्रदूषण नष्ट झाले पाहिजे व दुसऱ्या बाजूने सुंदर व सुरेख विचारांनी मानवी जीवन भरून व भारून टाकले पाहिजे. ते घडवून आणण्यासाठी दिव्य नामाच्या दिव्य विचारलहरी वातावरणात सातत्याने प्रक्षेपित करीत राहणे आवश्यक आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात-

नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी। कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ । लक्ष्मीवल्लभ तया जवळी ।।
हरि उच्चारणी अनंत पापराशी। जातील लयासी क्षणमात्रे ||
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे।
परंपरा त्याचे कुळ शुद्ध ।। नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।
पापे अनंत कोडी गेली त्यांची ।।

आता आपण अति सूक्ष्म दृष्टीने नाम हे एक तत्त्व आहे याचा विचार करू.सर्वसाधारण माणसे ज्याला ‘नाम’ असे समजतात आणि संत ज्याला ‘नाम’ असे संबोधितात,या दोहोंमध्ये जमीन-अस्मानाइतके अंतर असते संत नामीलाच नाम असे संबोधितात.ज्या वस्तूला नाम दिलेले असते त्या वस्तूला नामी असे म्हणतात.

उदाहरणार्थ, गरुड नाम ज्या गरुड पक्ष्याला दिलेले आहे तो गरुड पक्षी हा आहे येथे नामी व त्या पक्ष्याला दिलेले गरुड हे नांव ते आहे नाम.त्याचप्रमाणे परमेश्वर व त्याला दिलेले नांव यात फरक आहे तो वर सांगितल्याप्रमाणे.सर्वसाधारण लोकांना नाम आणि नामी यातला फरक कळत नाही.त्याचप्रमाणे नामीलाच संत नाम असे संबोधितात हे सुद्धा लोकांना समजत नाहीत्यामुळे सामान्य माणसे नामातच गुंतून राहतात.

परिणामी नामीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ती माणसे हरवून बसतात. नाम-नामा अभेद आहे असे संत सांगतात,हे जरी खरे असले तरी नाम नामी अभेद हा नामीकडून आहे, लोक समजतात तसे नामाकडून नाही.संतांनी हा मुद्दा त्यांच्या खालील वचनांतून स्पष्ट केलेला आहे.संत कबीर सांगतात-

रामनाम सब कोई कहे। ठग ठाकूर और चोर ।।
जीस नामसे प्रल्हाद और ध्रुव तरे। ओ नाम कुछ और।।

एकनाथ महाराज सांगतात-
संतासी शरण गेलिया वाचोनि ।*
ऐका जनार्दनी न कळे नाम।।*
संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात- नाम परब्रह्म वेदार्थे

आणि हरिपाठात सांगतात-
एक तत्त्वनाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ।।

थोडक्यात,हरिपाठ हा ग्रंथ आकाराने जरी छोटा असला तरी परमार्थाच्या दृष्टीने तो फार मोठा आहे.सूत्रबद्ध पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात हरिनामाचा महिमा मुक्त कंठाने गायलेला आहे. म्हणून असे म्हणता येईल की,जे उपनिषदात आहे ते गीतेत आहे,जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहे आणि जे ज्ञानेश्वरीत आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आहे.अशा या सुंदर व सुबक हरिपाठाकडे लोकांनी पाठ न करता तो पोटाशी धरून स्वतःचे कल्याण साधावे,अशी परमेश्वराजवळ नम्र प्रार्थना.

सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!