पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् शाळेत प्रवेशोत्सव आणि विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ संपन्न
पिंपरी: 
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अनुदानित आदिवासी आश्रमशाळा, चिंचवडगाव येथे  विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ संपन्न झाला.

आदिवासी विकास विभाग वसतिगृह अधीक्षक उदय महाजन, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष गिरीश प्रभुणे, उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, शाहीर आसराम कसबे, समिती सदस्य राहुल बनगोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उदय महाजन म्हणाले की, “भारतीय संस्कृतीचा मूळ प्रवाह गुरुकुल शिक्षणपद्धतीत होता. त्याचे पुनरुज्जीवन येथे होत आहे, ही अतिशय स्तुत्य बाब आहे!” प्रा. दिगंबर ढोकले यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले; तर शाहीर आसराम कसबे यांनी आपल्या पहाडी आवाजातून काव्यात्मक शुभेच्छा दिल्या.

गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, “भारतातील पाचशेहून अधिक जनजातीच्या परंपरागत ज्ञान आणि कौशल्यावर आधारित पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देण्याची व्यवस्था भावी काळात विशाल गुरुकुलमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे!” अशी माहिती दिली.

दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि सरस्वतीस्तवन सादर करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम सत्रात विद्यार्थिनींनी स्वागत पद्य सादर केले. त्यानंतर नृत्यमय गणेशवंदना सादर केली. पोवाड्याच्या माध्यमातून गुरुकुलमची माहिती दिली. गायत्री अवघडे या विद्यार्थिनीने हार्मोनियमवर भजन सादर केले; तसेच राजश्री तांबे या विद्यार्थिनीने तबल्यावर तीन ताल वाजवला.

सूरज बनसोडे आणि त्याच्या सहकारी विद्यार्थ्यांनी गायलेले “कचरा फेकू नका उघड्यावर…” हे स्वच्छतेचा संदेश देणारे गीत उपस्थितांना भावले. “करू या प्रणाम…” या समूहगीताने सांस्कृतिक सत्राचा समारोप करण्यात आला.

शाला प्रवेशोत्सव २०२३ या सत्रात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षिकांनी प्रत्येकाच्या कपाळावर कुंकूम तिलक, औक्षण करुन विधिवत विद्याव्रत संस्कारांचे संस्करण केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

सतीश अवचार यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. गुरुकुलम् मधील शिक्षिका आणि कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. स्वप्ना झिरंगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रधानाचार्या पूनम गुजर यांनी आभार मानले. कबीराचे दोहे आणि शांतिमंत्राच्या सामुदायिक सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!