वारू ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच शाहिदास निंबळे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर
पवनानगर :
पवनमावळातील वारु ब्राम्हणोली सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु ठरलेल्या कालावधीत राजीनामा न दिल्याने
ग्रुप ग्रामपंचायत वारु-ब्राम्हणोली गावचे सरपंच शाहिदास मारुती निंबळे यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
दिनांक १३ जून २०२३ रोजी झालेल्या विशेष बैठकीत ग्रामपंचायतीचे सदस्यांनी बहुमताने मंजूर केल्याने, सरपंच शाहिदास निंबळे यांची पदावरुन गच्छंती करण्यात आली आहे,या आशयाचे पत्र मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिनांक 14 जून रोजी दिला.
ग्रुप ग्रामपंचायत वारु – ब्राह्मणोली मध्ये एकूण सदस्य संख्या ही 9 आहे. शाहिदास मारुती निंबळे यांची सरपंच पदी निवड होऊन दोन वर्ष उलटून गेली, मात्र त्यांनी ठरवल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला नव्हता, असे काही सदस्यांनी सांगितले. तसेच, त्यांचा कारभार मनमानी पद्धतीने होत असल्याची तक्रार सुनिता निंबळेंसह सात सदस्यांनी तहसीलदार मावळ यांच्याकडे केली होती. त्यानुसार तहसीलदार यांनी ग्रामपंचायत कार्यालय इथे विशेष सभा बोलावली होती. त्यानुसार दिनांक 13 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय इथे विशेष सभा आयोजित केली.
दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे नियमानुसार ग्रामपंचायतीच्या उर्वरित सदस्यांनी विद्यमान सरपंच शाहिदास मारुती निंबळे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणला. हा प्रस्ताव बैठकीत सदस्याने 8-1 अशा बहुमताने मंजूर केला. तहसीलदार विक्रम देशमुख यांनी या विशेष सभेचा अहवाल तपासून दिनांक 14 जून 2023 रोजी याबाबत अधिकृत जाहीर केल्याने, वारू-ब्राह्मणोली सरपंच पदावरुन अखेर शाहिदास मारूती निंबळे यांची गच्छंती झाली आहे.
यावेळी उपसरपंच उज्वला शिंदे, सुनिता निंबळे,बाळु काळे,हरिभाऊ निंबळे,वसंत काळे, वृषाली निंबळे,निलम साठे,धनश्री काळे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते
लवकरच ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावून नव्या सदस्याची सरपंच पदी नियुक्ती केली जाणार आहे आणि गावच्या विकासाचा गाडा पुन्हा सुरु केला जाईल, असे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.