विश्व हिंदू परिषदेच्या वतीने पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवाकार्याचा शुभारंभ
पिंपरी:
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पंढरपूरपर्यंत मोफत आरोग्यसेवा आणि औषधोपचाराचा उपक्रम गेल्या सदतीस वर्षांप्रमाणे याही वर्षी राबविण्यात आला आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री प्रा. संजय मुद्राळे आणि सहमंत्री ॲड. सतीश गोरडे यांनी दिली. सदरहू आरोग्यसेवेचा प्रारंभ पुण्यातून करण्यात आला असून या पथकामध्ये एकूण १० रुग्णवाहिका, २८ डॉक्टर्स, २४ परिचारिका आणि ८० कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

संत निवृत्तीनाथ पालखी मार्गावर आठ दिवसांपूर्वीच तीन रुग्णवाहिका देऊन आरोग्यसेवा सुरू करण्यात आली आहे. आज पुण्यातून संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी मार्गावर तीन, संत तुकाराममहाराज पालखी मार्गावर तीन आणि डॉक्टरांची ने-आण करण्यासाठी एक असे रुग्णवाहिकांचे शुभारंभ करण्यात आले आहे.‌ पुणे महानगरपालिका अन्न आणि औषध प्रशासन अतिरिक्त आयुक्त श्याम प्रतापवार यांच्या हस्ते या सेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आरोग्यपथकात सहभागी झालेल्या डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी आणि कार्यकर्ते यांना शुभेच्छा देताना श्याम प्रतापवार यांनी, “हा सेवा प्रकल्प वारकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून सहभागी डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी; तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन रुग्णांवर‌ औषधोपचार करताना शासन आणि आरोग्य संघटनेने ठरविलेल्या नियमांचे पालन करावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली.

आरोग्य सेवेसाठी ग्लोबल बायोटेक कंपनीचे प्रमुख गिरीश जैवाल यांनी, ‘दरवर्षीप्रमाणे याही वर्षी औषधाअभावी कोणताही वारकरी गंभीर आजारी पडणार नाही याची दक्षता घेतली जाईल!’ अशी ग्वाही दिली; तर औषध व्यावसायिक आणि उद्योजक प्रसन्न पाटील यांनी आरोग्यपथकाला शुभेच्छा देताना सेवेसाठी आवश्यक असलेले आरोग्य कर्मचारी पुरविण्यात येतील, असे सांगून ‘सर्व वारकऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पांडुरंगाला प्रार्थना करू या!’ अशी भावना व्यक्त केली.

विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री प्रा. संजय मुरदाळे यांनी सेवापथकाची आवश्यकता, सेवाकार्याचे स्वरूप याविषयी परिषदेची भूमिका स्पष्ट केली. प्रास्ताविकातून ॲड. सतीश गोरडे यांनी, “अध्यात्मात भगवंताची प्राप्ती, पांडुरंगाचे दर्शन हे साध्य आहे, हे पूर्ण करण्यासाठी साधन लागते. शरीर एक साधन असून साध्य गाठण्यासाठी साधनाची काळजी घेणे आवश्यक आहे. अध्यात्मात शरीर महत्त्वाचे साधन आहे, जसे घर चांगले असते; तसा आत्मा चागंला असण्यासाठी शरीर चांगले असावे लागते, विश्व हिंदू परिषद हे कार्य गेली ३७ वर्षांपासून करीत आहे. हे ईश्वरीय कार्य करण्यासाठी डाॅकर्स, परिचारिका आणि कार्यकर्ते काम करीत आहेत. वारकरी यांची सेवा करण्याचे पुण्यप्रद काम या माध्यमातून होत आहे. ‘आरोग्यम् धनसंपदा’ या प्रमाणे आपण कार्य करणार आहोत!” असे सांगितले.

यावेळी  प्रांत अध्यक्ष  पांडुरंग राऊत, किशोर चव्हाण, मनोहर ओक, धनंजय गायकवाड, विजय कांबळे, राजेश कोंढरे यांच्या उपस्थितीत आरोग्यपथकाचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!