गुंतवणूक….सत्यम शिवम सुंदरमच्या निर्मितीची….
होय मित्रांनो,
गुंतवणूक यासंदर्भात आपण बऱ्याच वेळा भाष्य ऐकलेल आहे आणि केलेलही आहे ! पण आज मला वेगळ्या अर्थाने गुंतवणूक ही इथे अभिप्रेत आहे! आणि अपेक्षितही आहे

नेहमीप्रमाणे संपत्ती- स्थावर मालमत्ता-बँक बॅलन्स- शेअर्स इत्यादी विभागात आपल्या  भविष्याची तरतूद करण्यासाठी आर्थिक संचयाची  विभागणी करणे हा मनात पहिला विचार असतो आणि तो आपला अधिकारही असतो.

पण माझ्या आजच्या– गुंतवणूक या शब्दात आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील सद्गुणांची- सत विचारांची संस्काराची गुंतवणूक करणे हाच हेतू आहे! कारण परमेश्वराने दिलेल अनमोल आयुष्य आपण सत्कारणी लावावं याच अर्थाने मी हा विषय आपल्या समोर मांडलेला  आहे.

अर्थात ही गुंतवणूक करण्यासाठी  आपल्याला हे बीज भांडवल अनेक ग्रंथातून- संतांच्या सहवासातून- संस्कारित मित्रांच्या- परिवाराच्या- गुरुजनांच्या माध्यमातून मिळू शकत! फक्त ते मिळवणे आणि  सांभाळून वृद्धिंगत करण्याबरोबरच  आत्मसात करणे व प्रत्यक्ष कृतीत आणणे हे मात्र आपल्याच हाती असत.

यात सत्यम शिवम सुंदरमची निर्मिती करणे हा सुप्त हेतू आहे!  यात सत्याची कास  धरायची आहे! शिवाची आराधना करायची आहे! आणि सौंदर्याची निर्मिती सुद्धा करायची आहे तरच अर्थपूर्ण जीवन जगण्याच समाधान आपल्याला लाभणार आहे! आणि खऱ्या अर्थाने आपलीही गुंतवणूक शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी कारणीभुत ठरणार  आहे.

म्हणूनच ही गुंतवणूक आपल्या व्यक्तीमत्वात करावी हा 2023  चा संकल्प आपण  परमेश्वराच्या साक्षीने सोडणार आहोत! यासाठी फक्त आत्मपरीक्षण करून आपली वाटचाल आपणच ठरवायची आहे! वरील चिंतनातून आपण आपल्यात  प्रत्यक्ष किती गुण आहेत? ते  मी वृद्धिंगत कसे करू शकतो?-

माझ्यात परिवर्तन करू शकतो का? हा चिंतनाचा विषय  अत्यंत गंभीरपणे आपण घेतला तर आजच्या चिंतनाचा विषय आपल्या हृदयापर्यंत निश्चितपणे पोहोचलेला असेल म्हणून मी इथेच थांबतो!
( शब्दांकन -ला. डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!