“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २७ वा” *लटिका व्यवहार सर्व हा संसार।* *वायां येरझार हरिविण।।*
वास्तविक, मनुष्य जन्माला येतो, संसार मांडतो व निरनिराळे व्यवहार करतो ते सर्व अखंड सुखाची, सर्वसुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. परंतु प्रयत्नांची दिशा मुळातच चुकल्यामुळे व संतसंगतीच्या अभावामुळे, विषयसुखाच्या पलीकडे त्याला पहाताच येत नाही व अंती त्याला जे पाहिजे ते सर्वसुख मिळत नाही.
अंगठी हरवली देवघरात व शोधतो मात्र दिवाणखान्यात. आता ही अंगठी किती प्रयत्न केले म्हणजे मिळेल? आपल्या प्रयत्नांना कल्पांतापर्यंत सुद्धा यश मिळायचे नाही! त्याचप्रमाणे आमचे सर्वसुख आहे “हृदयमंदिरात” व आम्ही मात्र ते शोधीत आहोत जगाच्या पाठीवर. किती जन्म घेतले म्हणजे या प्रयत्नाने आम्हाला हे सुख मिळेल?
म्हणूनच संत सांगतात, हा मार्ग सद्गुरूंकडून नीट समजावून घे व ते सांगतात त्या मार्गाने जा, म्हणजे तुला जे पाहिजे ते आपोआप मिळेल.
तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
नाममंत्र जप कोटी जाईल पाप।
रामकृष्णी संकल्प धरूनी राहे।।
साधक आणि सर्वसुख यांच्यामध्ये पापांचे पर्वत उभे आहेत.
काम क्रोध आड पडिले पर्वत।
राहिला अनंत पलीकडे।।
हे पर्वतच आपल्या सर्वसुखाच्या आड येतात, ही वासना व तिची प्रजा यांना जिंकून पलीकडे जाणे महाकठीण कर्म आहे. मोठमोठे ऋषी, मुनी ज्या ठिकाणी हतबल झाले तेथे सामान्यजनाचे काय चालनार? परंतु अशा कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी व याचा नाश त्वरित व सुलभपणे करण्यासाठी संतांनी मार्ग शोधून काडाला तो म्हणजे “नाममंत्र जप” हा होय.
नामाच्या उच्चाराने असंख्य पापे, कोटी पापे, पापांचे पर्वत लयाला जातात व आपल्या सर्वसुखाचा मार्ग मोकळा होतो.
म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
रामकृष्णी संकल्प धरूनी राहे।
म्हणजे नामजप करण्याच्या संकल्पाला तू धरून रहा. कसल्याही परिस्थितीत तू नाम सोडू नकोस.
पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
निजवृत्ति हे काढी सर्व माया तोडी।
इंद्रियां सवडी लपूं नको।।
नामस्मरणाचा अभ्यास चालू असतां साधकाने जे पथ्य पाळायचे असते त्याचा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी उल्लेख करतात. ”दुधाची तहान ताकावर” हा मनुष्य स्वभाव आहे, त्याचप्रमाणे सर्वसुखाची गोडी चाखायला मिळेपर्यंत साधकाची नजर विषयसुखाकडे आपोआप जाते, परंतु विषय सुखाच्या मोहात मन अडकले तर साधकाचे हातून नामस्मरण घडायचे कसे?
एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे मनाच्या म्यानात “काम व नाम” या तलवारी राहू शकत नाहीत. म्हणूनच विषयसुखाच्या मोहात अडकलेल्या तुझ्या वृत्तीला तिची कसलीही माया न ठेवता म्हणजे अत्यंत कठोरपणे दृढ निश्चयाने बाहेर काढ.
हे करीत असता विषयसुखाला चटावलेली इंद्रियें बिथरतील व तुला आपल्या पाशात पुनः अडकविण्याचा प्रयत्न करतील, तर तू त्यांच्या आहारी जाऊ नकोस.
ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगतात,
तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा।
शांति दया पाहुणा हरि करी।।
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1091