“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २७ वा”

संसारात जे सुख आपण भोगतो ते कसे असते?

ज्या इंद्रियावाटे आपण सुख म्हणजे विषयसुख भोगतो ते इंद्रिय तेवढ्या वेळेपुरते सुखी झाल्याचे भासते, परंतु इतर इंद्रियें सुखाच्या नांवाने रिकामीच रहातात. उदाहरणार्थ, गोड गाणे ऐकले तर “कान” तृप्त होतात. परंतु इतर इंद्रिये उपाशीच रहातात. बासुंदी खाण्याचे सुख मिळाले तर “रसना” तृप्त होते, पण इतर इंद्रिये उपाशीच रहातात. अशा रीतीने विषयसुख हे एकाच वेळेला एकाच किंवा फार झाले तर दोन इंद्रियांना सुख देऊ शकते व ते सुद्धां अल्पकाळ. परंतु सर्व इंद्रियांना सर्वकाळ ते तृप्त करू शकत नाही.

संत ज्याला सर्वसुख म्हणतात ते असे नाही. हे सुख ”आंतून” स्फुरते-भरारते-संचरते व सर्व इंद्रियांची रिकामी भांडी ते एकाच वेळेला भरून टाकते, सर्व इंद्रिये एकाच वेळी तृप्त होतात.

पावसाच्या पाण्याने साठलेले किंवा अन्य कारणाने साठलेले विहिरीतील पाणी सूर्याच्या उष्णतेने संपुष्टात येण्यास वेळ लागत नाही. परंतु विहिरीतच पाण्याचा जिवंत झरा लागला तर ती काठोकाठ पाण्याने आंतून भरते, हे एक व दुसरे विहिरीतील पाणी आटत नाही.

त्याचप्रमाणे विषयांच्या द्वारे देहात-जीवनात साठवलेले सुखाचे पाणी संसारतापाने आटण्यास वेळ लागत नाही. परंतु नामस्मरणाच्या द्वारे भगवत्कृपा होऊन आनंदाचा झरा देहाच्या विहिरीत एकदा का प्रगट झाला की, देहाची विहीर त्या आनंदाने ”आंतून” भरते, सर्व इंद्रिये त्या आनंदाने तुडुंब भरून जातात व हा आनंद अखंड असतो. हा आनंद सर्व इंद्रियांस सर्वकाळ तृप्त करतो-सुख देतो म्हणून त्याला सर्वसुख असे म्हणतात.

तुकाराम महाराज सांगतात-
नाम घेतां कंठ शीतळ शरीर।
इंद्रियां व्यापार नाठवीती।।
गोड गोमटे हे अमृतासी वाड।
केला कईवाड माझ्या चित्ते।।
किंवा
आनंदाचे डोही आनंद तरंग।
आनंदाचे अंग आनंदचि।।
विषयी विसर पडिला नि:शेष ।
अंगी ब्रह्मरस ठसावला।।

हे सर्वसुख अंत:करणात स्थिर झाले व शरीरात मुरले की तेच प्रेमसुख होय. *एका जनार्दनी प्रेम अति गोड।* *अनुभवी सुरवाड जाणताती।।* किंवा *लांचावले मन लागलीसे गोडी।* *ते जीवे न सोडी ऐसे झाले।।*

या सर्वसुखाची गोडी एकदा जीवाला लागली की, तो विषयसुखाकडे ढुंकून सुद्धां पहात नाही. बरोबरच आहे! जो पक्वान्न खातो तो कदान्न कशाला सेवन करील? जो नित्य अमृत प्राशन करतो तो तांदुळाच्या पेजेला कशाला स्पर्श करील?

जन्माला येऊन हे सर्वसुख भोगणे, या प्रेमसुखाची गोडी चाखणे यातच नरदेहाची सार्थकता आहे. हे सर्वसुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण. साही शास्त्रांचा अंतिम सिद्धांत हाच आहे.
किंबहुना, जिवाच्या जन्म-मरणाच्या येरझारा हरिपाठी म्हणजेच या सर्वसुखाच्या प्राप्तीसाठीच असतात.

तो संसाराचा व्याप मांडतो याच सुखासाठी आणि निरनिराळे व्यवहार, खटपटी, धडपडी, सर्व काही याच सुखाच्या प्राप्तीसाठी कळत किंवा नकळत करीत असतो.
ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, जन्माला येऊन जर तुला हरिप्राप्ती झाली नाही-सर्वसुखाची गोडी चाखावयास मिळाली नाही, तर तुझे व्यवहार लटिके आहेत, तुझा सर्व संसार असार आहे व आतांपर्यंत जन्म-मरणाच्या ज्या येरझारा घातल्या, त्या वाया-व्यर्थ होय. *लटिका व्यवहार सर्व हा संसार।* *वायां येरझार हरिविण।।*

(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1090

error: Content is protected !!