जगणे सुंदर करण्यापेक्षा सुरेल करता आले पाहिजे!” – प्रा. प्रवीण दवणे
पिंपरी:
“जगणे सुंदर करण्यापेक्षा सुरेल करता आले पाहिजे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनी श्री वर्धमान जैन स्थानक भवन, आकुर्डी येथे  व्यक्त केले.

लेखिका शुभांगी कात्रेला लिखित आणि संवेदना प्रकाशन निर्मित ‘आयुष्याच्या हिंदोळ्यावर’ या ललित लेखसंग्रहाचे आणि ‘आयुष्य जगताना’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन प्रा. प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला अध्यक्ष प्रा. सुरेखा कटारिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या; तसेच ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी, जैन महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य प्रकाश कटारिया, कांतीलाल कात्रेला, डाळिंबीबाई कात्रेला, वर्धमान जैन स्थानक भवनचे अध्यक्ष सुभाष ललवाणी, नैनसुख मांडोत, ज्योती खिंवसरा, श्रीकांत चौगुले उपस्थित होते.

प्रा. प्रवीण दवणे पुढे म्हणाले की, “‘आयुष्याच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकातून हिंदोल आणि हिंदोळणे यांनाही एक सीमारेषा आहे, हा भगवान महावीर यांचा संदेश लेखिका शुभांगी कात्रेला यांनी अधोरेखित केला आहे.‌ हिंदोळा घेताना जमीन हे वर्तमान आहे; तर आकाश हे भविष्य आहे. वर्तमान ते भविष्य यांना जोडणारी एक कर्तृत्वाची अवकाशरेषा आहे.

आता देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना भावी पिढीला नागरिकशास्त्र शिकविण्याची नितांत गरज आहे; तसेच ‘आयुष्य जगताना’ यासारखे चिरंतन मूल्यांचा संस्कार घडविणारे लेखन समाजापुढे प्रकर्षाने आले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या संपन्नता आली तरी करुणेचा पाझर फुटणारे माणूसपण साहित्यातून जागृत झाले पाहिजे!”

श्रुती वटक यांनी ‘दोन शब्द आईसाठी…’ असे सूतोवाच करीत हृद्य प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या; तसेच मान्यवरांनी मनोगतांमधून शुभेच्छा दिल्यात. शशांक वटक, नितीन हिरवे, महावीर कोठारी आणि कात्रेला परिवार यांनी संयोजनात परिश्रम घेतले. डॉ. श्वेता राठोड यांनी सूत्रसंचालन केले. मनोज कात्रेला यांनी आभार मानले.

error: Content is protected !!