दृष्टिकोन बदला आयुष्य बदलेल!
होय मित्रांनो,
जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला- आपला स्वभाव बदलेल! एकदा स्वभाव बदलला की आपल व्यक्तिमत्व बदलेल आणि एकदा का व्यक्तिमत्व बदललं की सारं आयुष्य बदलेल.

मित्रांनो,
पूर्वी आम्ही रोजनिशी लिहायचो! अश्याच एका भगिनीची एक चांगली सवय होती! एके दिवशी झोपण्या अगोदर आपला दिवसभराचा आनंद एका वहीत तिने लिहून काढला की– मी फार सुखी-समाधानी आहे- कारण माझा नवरा रात्रभर फार मोठ्याने घोरतो ही ईश्वराची खरोखरच आमच्यावर कृपा आहे! कारण त्याला गाढ झोप लागते.

कारण तो व्याधी ग्रस्त नाही! चिंतामुक्त आहे! पुढे   ती असं लिहिते की– मी फार सुखी आहे कारण दर महिन्याला मला लाईटबिल- फोनबिल –पेट्रोल बिल- पाणी बिल- गॅस बिल अशी अनेक बिल भरतांना खरंतर माझी दमछाक होते– पण या सर्व सुविधा जर माझ्यासाठी नसत्या तर माझं जगणं किती अवघड झालं असतं? म्हणून मी ही ईश्वराचीच कृपा समजते म्हणून मी समाधानी आहे!

मित्रांनो पुढे ती लिहिते की– मी फार समाधानी आहे– कारण रोज मला घरातील दार खिडक्या सहित सर्वच घर स्वच्छ कराव लागतं! दिवसभर स्वयंपाक करून सर्व धुण  भांडी स्वच्छ धुऊन  योग्य ठिकाणी लावावी लागतात! या सर्व वस्तू माझ्याकडे मुबलक आहेत एवढेच नव्हे तर विशेषकरून माझं स्वतःचं घर आहे!

कारण ज्यांच स्वतःच घर नाही त्यांचे काय हाल होत असतील हा विचार करूनच मी समाधानी आहे! पुढे ती अस लिहिते की- प्रत्येक सणावाराला इतरांना भेट देताना माझी पर्स रिकामी होते! म्हणजेच माझ्यावर प्रेम करणारे खूप लोक आहेत त्यात माझे नातलग आहेत मित्र आहेत की ज्यांना मी भेट देऊ शकते!

जर हे लोक नसते तर माझ आयुष्य किती वैराण झालं असतं याची कल्पनाच मला करवत नाही! माझा हा परिवार म्हणजे माझ्यावर ईश्वराचीच कृपा आहे- म्हणून मी समाधानी आहे! मी रोज सकाळी पाचला न चुकता जागी होते कारण- पाणी भरणे- सर्वांना चहा करून देणे -सर्वांचा डबा तयार करणे यात मला खूप आनंद वाटतो.

कारण मला नव्या पहाटेची अल्हाददायक अशी वाऱ्याची झुळूक अनुभवायला मिळते  ही माझ्यावर ईश्वराचीच कृपा आहे असे मी समजते म्हणून मी सुखी आहे! मित्रांनो खरं सांगू का– सुख शोधून सापडत नसत त्याला बघण्याची दृष्टी असावी लागते ती त्या भगिनीला गवसली– मी खात्रीपूर्वक सांगतो की आपल्यालाही ती दृष्टी गवसेल म्हणून मी इथेच थांबतो.
( शब्दांकन- डॉ.ला. शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!