“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २६ वा”
चौदा भुवनें जया पोटीं। तो राहे भक्ताचिये कंठी।।
नामधारकाच्या जीवनात भगवंत नामाच्या सूक्ष्मरूपाने प्रवेश करतो व जरूरीच्या प्रसंगी तो आपले स्वरूप विविध रूपाने प्रकट करून आपल्या भक्ताचा योगक्षेम वाहतो.
निळा म्हणे भक्तांसाठी।
धरी रूपें अनंत कोटी।।
म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
एक तत्त्व नाम दृढ धरी मना।
हरिसी करुणा येईल तुझी।।
व पुढे सांगतात-
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद।
वाचेसी सद्गद जपे आधीं।।
नाम वाचेने घ्यावयास सोपे आहे, त्याचप्रमाणे ते कसेही घेतले तरी फळते, हे जरी खरे असले तरी सद्’गदित अंत:करणाने नामाचा जप केल्यास ते त्वरीत फळते. सद्’गदित अंत:करणाने जप करणे म्हणजे प्रेमाने-गोडीने-आवडीने नामाचा जप करणे.
सर्वसाधारण मनुष्याला नामाची गोडी किंवा प्रेम असणे कठीणच! नामाचे स्वरूप व त्याचा महिमा समजल्याशिवाय नामात प्रेम येत नाही. संत किंवा सद्गुरूंच्या मुखातून नामाचे वर्म समजते व म्हणूनच सद्गुरूकडून नाम घ्यावे असे सांगण्यात येते. *सद्गुरूवाचोनि नाम न ये हाता।* *साधनें साधितां कोटि जाणा।।*' *संतांसी शरण गेलियावांचोनि।* *एका जनार्दनी न कळे नाम।।*
✅ सद्गुरूंच्या कृपेशिवाय, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला नाम म्हणजे काय हे कळणार नाही. नाम म्हणजे त्याचं रूप काय, त्याचं स्वरूप काय, आपल्याला वाटतं तितकं ते नाम सोपं नाही. म्हणून असं हे नाम हे संतांकडूनच शिकायला पाहिजे, सदगुरूंकडून शिकायला पाहिजे
आणि म्हणून कबीराने सांगितलं की रामनाम सगळेच घेतात, “सब कोई कहे। ठग, ठाकूर और चोर, जिस नाम से प्रल्हाद और ध्रुव तरे। वो नाम कुछ और” तुम्ही समजता तसं ते नाम नाही, ते और नाम आहे. प्रल्हाद, धृव असे मोठमोठे संत तरले ते नाम “और” आहे. म्हणजे संंतांची वचन जर पाहिली तर …
आपण जे नामस्मरण करतो आणि संतांना जे नामस्मरण अभिप्रेत आहे त्याच्यामध्ये दोन टोकाचं अंतर आहे .
नामस्मरण म्हणजे, नाम म्हणजे “स्वरूप” आणि स्मरण म्हणजे “अनुसंधान”. स्वरूपाचं अनुसंधान करणं ह्याला नामस्मरण असं म्हणतात. म्हणून आपल्याला जर स्वरूपाचीच ओळख नसेल तर आपण स्वरूपाचं अनुसंधान करणार कसं ?
परंतु हे वर्म न समजल्यामुळे केवळ गुरूकडून मंत्र घेणे व गुरू करणे एवढीच रूढी आज शिल्लक राहिलेली आहे. याचा परिणाम म्हणजे परमार्थातील बजबजपुरी होय. असो! नाम हे देवाचे सूक्ष्म रूप आहे. या सूक्ष्म रूपाने तो आपल्याजवळ आहे. नामाचा उच्चार म्हणजे प्रभुचा संचार व म्हणून नामाच्या उच्चाराने आपल्याला प्रभुचा संग होत आहे, नामाने भगवत्कृपा होऊन तो आपला सर्व प्रकारे योगक्षेम वाहतो. हे नामाचे वर्म लक्षात ठेवून नामाचा उच्चार करणे म्हणजेच सद्गदित अंत:करणाने जप करणे होय.
तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा।
वायां आणिक पंथा जाशी झणी।।
नामापेक्षा श्रेष्ठ तत्त्व दुसरे नाही व म्हणून विनाकारण हे सोडून अन्य मार्गांनी किंवा पंथांनी तू जाऊ नकोस, असे ज्ञानेश्वर महाराज मनाला किंवा साधकाला कळकळीने सांगतात.
शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी।
धरोनि श्रीहरी जपे सदा।।
हा चरण अत्यंत महत्त्वाचा आहे. हा चरण जर नीट समजला नाही, तर नामाची मौज कळणार नाही. खरे सांगावयाचे म्हणजे तर्काने किंवा बुद्धीने समजण्यासारखा हा विषय नाही. त्याला नामाचा प्रत्यक्ष अनुभवच पाहिजे. या चरणात ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते पाहूं.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1086