“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २५ वा”

अभंगाचा भावार्थ :
*➡️ हरि उच्चारणी-हरिनामाचे संकीर्तन करीत असतां, साधक ते जाणीवपूर्वक करतो की नेणीवपूर्वक करतो याची चिकित्सा भगवंताचे ठिकाणी नाही. केवळ नामाचा सतत उच्चार केल्याने भगवत्कृपा होऊन साधकाला मोक्ष प्राप्त होतो.
*➡️ नामाचा उच्चार करणाऱ्या साधकाच्या जीवनात कलि-काळ शिरकाव करू शकत नाही.
*➡️ अशा या अलौकिक नामाचा महिमा काय आहे, त्याचे प्रमाण काय आहे, हे प्रत्यक्ष वेद सुद्धा संपूर्णपणे जाणू शकत नाही मग इतर सामान्य स्थूल बुध्दीच्या लोकांना नाममहिमा कसा कळेल?
*➡️ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नारायण नामाचा नित्यपाठ केल्याने माझी दृष्टी उजळली व त्या दृष्टीला सर्व जग हे वैकुंठस्वरूप आहे असे दिसू लागले.

🌻थोडक्यात स्पष्टीकरण : *जाणीव नेणीव भगवंती नाही।* *हरिउच्चारणी पाहीं मोक्ष सदा।।*

भगवन्नामाचा एक विशेष असा आहे की, ते कसेही जरी घेतले तरी फळते.
नामाचिया बळें कैवल्य साधन।
उगेंचि निधान हातां चढे।।
हे वैशिष्ट्य इतर साधनांत नाही. इतर साधने काळजीपूर्वकच करावी लागतात व त्यांत चूक झाली तर साधकांचे अनहित होते किंवा त्याला फळ मिळत नाही.
राग ज्ञान घात चुकतां होय वेळ।
नाम सर्वकाळ शुभदायक।।
हे संतवचन या संदर्भात लक्षात ठेवण्यासारखे आहे.

नामाचे तसे नाही. साधक नाम जाणीवपूर्वक घेतो की नेणीवपूर्वक घेतो, ज्ञानपूर्वक घेतो की अज्ञानपूर्वक घेतो, आवडीने घेतो की नावडीने घेतो, हा प्रश्न नामाच्या ठिकाणी नाही व भगवंती सुद्धा नाही. नाम घेतले की ”राम” फळ हे मिळायचेच. याचे कारण नामात असणारे त्याचे वस्तुसामर्थ्य हेच होय.

लक्ष असो किंवा नसो, आवडीने किंवा नावडीने, जाणीवपूर्वक किंवा नेणीवपूर्वक हात पाण्यात घातला तर तो भिजायचाच, विस्तवावर पाय ठेवला तर तो भाजायचाच, त्याप्रमाणे नाम कसेही जरी घेतले तरी मोक्षाचे फळ ते देणारच.

विदर्भातले श्रेष्ठ साधू श्री. गुलाबराव महाराज म्हणतात —
अमृत अवचट मुखी पडले।
तरि काय म्हणावे मरण न चुकले।।
तैसे अवचट हरिनाम वदनीं आले।
तरि होय दहन महादोषा।। *वस्तु शक्तीच्या ठायीं।* *श्रद्धेची अपेक्षा नाहीं।।* *नाम 'वस्तुतंत्र' लवलाही। वचन सिद्ध।।*

याचे दुसरे कारण असे की,
नाम घेणारा जरी अज्ञ असला तरी नाम ऐकणारा “राम” सूज्ञ आहे, नाम घेणारा जरी अल्पज्ञ असला तरी नाम ऐकणारा “राम” सर्वज्ञ आहे, नाम घेणारा जरी एकदेशी असला तरी नाम ऐकणारा “सर्वव्यापी” आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, हा भगवंत नामात सूक्ष्म रूपाने वास करून असतो.

म्हणून नामस्मरण करताना आपण एकटे आहोत असे जरासुद्धा वाटत नाही. परीक्षित राजाला दंश करणारा भला मोठा तक्षक सर्प सूक्ष्म रूप धारण करून लहानशा बोरात बसून होता, त्याप्रमाणे सर्वव्यापक परमात्मा अत्यंत सूक्ष्म स्वरूपात नामात वास करून राहतो.
चौदा भुवनें जया पोटीं।
तो राहे भक्ताचिये कंठी।।
चौदा भुवने ज्या हरीच्या पोटात असतात तोच हरी भक्ताच्या कंठात हरिनामाच्या रूपाने वास करतो,

“भगवंत हा सर्व शक्तिमान, सर्वज्ञ व सर्वव्यापी” असल्यामुळेच भगवन्नामाचे दिव्य पण सूक्ष्म रूप त्याला धारण करता येते.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1081

error: Content is protected !!