“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २४ वा”

शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी।
वैकुंठ भुवनी घर केले।।

शुद्ध भावाने युक्त अशा भजनाचा-नामस्मरणाचा सतत अभ्यास केल्याने म्हणजे, “ध्यानी मनी रामकृष्ण” अशी अवस्था झाल्याने साधकाला जी अद्भुत प्राप्ती होते त्याचे वर्णन या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. ते म्हणजे “वैकुंठ भुवनी घर केले” म्हणजे वैकुंठाने, भगवंताने, भुवनी म्हणजे भूलोकी घर केले, वस्ती केली.

याचा भावार्थ पाहू.
वैकुंठ हे लोकाचे नांव आहे त्याचप्रमाणे ते देवाचेही नांव आहे. भगवंताची जी अनेक नामें आहेत. त्यापैकी वैकुंठ हे एक त्याचे नाम आहे. त्याचप्रमाणे विष्णू ज्या लोकात रहातो त्याला वैकुंठ असे म्हणतात. या चरणातील वैकुंठ हा शब्द दोनही अर्थाने वापरला आहे.

आता भुवनी म्हणजे काय पाहूं.
भुवनी म्हणजे भूलोकी. भूलोक, स्वर्गलोक, कैलास व वैकुंठ असे चार लोक आहेत. “ब्रह्मांडी ते पिंडी व पिंडी ते ब्रह्मांडी” या सिद्धांताप्रमाणे हे चारही लोक आपल्यातच आहेत. स्थूल देह हा भूलोक, सूक्ष्म देह हा स्वर्गलोक, कारण देह हा कैलास व तीनही देहांच्या पलीकडे जे स्वस्वरूप ते वैकुंठ होय.

अखंड आनंद परमानंद म्हणजे गोविंद किंवा वैकुंठ. हा वैकुंठ लोकात म्हणजे स्वरूपी-हृदयाच्या क्षीरसागरात नित्य वास करतो. पण या ठिकाणी तो जीवाला अव्यक्त असतो व आनंद हृदयात जवळ असून सुद्धा त्याचा त्याला भोग मिळत नाही. परंतु दिव्य नामाच्या उच्चाराने हृदयाच्या क्षीरसागरात ज्या दिव्य लहरी निर्माण होतात, त्यांच्या प्रभावाने तेथे ”अमृत मंथन” होते
त्या मंथनाच्या प्रक्रियेने क्षीरसागरात ”घोरत” असलेला परमात्मा म्हणजे परमानंद-गोविंद-वैकुंठ जागृत होतो. परेच्या पलीकडल्या प्रांतातून साधकाच्या अंत:करणात उतरतो, इंद्रियांत पसरतो व देहाला व्यापून रहातो. याचाच अर्थ असा की, श्रीहरी परमात्मा नामाच्या प्रेमाने वैकुंठ लोकातून भूलोकी येऊन राहिला. *वैकुंठ भुवनी घर केले।*

संतांनी हा अनुभव खालीलप्रमाणे व्यक्त केला आहे.
वैकुंठीचा देव आणूं या कीर्तनीं।
विठ्ठल गाऊनी नाचूं रंगी।।
कीर्तन चांग कीर्तन चांग। होय अंग हरिरूप।।

गोविंद गोविंद। मना लागलीयां छंद।।
मग गोविंद ते काया। भेद नाही देवा तया।।

बह्मीभूत काया होतसे कीर्तनी।
भाग्य तरी ऋणी देवा ऐसा।।

ध्यानीं ध्याता पंढरीरा। मनासहीत पालटे काया।।

एक बोल सुस्पष्ट बोलावा।
वाचे हरि हरि म्हणावा।।
संत समागमु धरावा।
तेणे ब्रह्मानंदु होय आघवा।।

आला शीतळ शांतीचा वारा।
तेणें सुख झाले या शरीरा।।

हाच अनुभव ज्ञानेश्वर महाराज स्वत:च्या शब्दात सांगतात —
वैकुंठ भुवनी घर केले।
ज्या नामाच्या प्रभावाने श्रीहरि वैकुंठातून भूलोकी अवतीर्ण होतो, ते नाम कंठात धारण करून सर्वांनी आपला उद्धार करून घ्यावा, या तळमळीने ज्ञानेश्वर महाराज सकळीकांना उपदेशितात-
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1080*

error: Content is protected !!