अनंतरूपे एकच ईश्वर- तिन्ही जगाचा तो जगदीश्वर!!
होय मित्रांनो,
  इदम न ममः! या संदर्भात दानशूर राजा हरिश्चंद्रयांच्या आयुष्यातील घडलेला एक प्रसंग सांगितला जातो– राजा हरिश्चंद्र एक मोठे दानशूर राजे होते.
 
त्यांची एक गोष्ट विशेष होती की- जेव्हा ते दान देण्यासाठी हात पुढे करत असत तेव्हा आपली नजर नेहमी खाली नम्रतेने झुकलेली ठेवत असत! अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट सर्वांना विचित्र  वाटायची कारण की हा–  दानशूर राजा असून सुद्धा तो आपली नजर जमिनीकडे नम्रतेने का झुकवतो आहे.

वास्तविक राजाला स्वतःचा सार्थ असा अभिमान वाटला पाहिजे! कारण तो दात्याच्या भूमिकेत आहे! पण आश्चर्याची गोष्ट म्हणज हरिश्चंद्र राजाची झुकलेल्या नजरेची ही गोष्ट जेव्हा संत तुळशीदास यांच्या पर्यंत जेव्हा पोहोचली तेव्हा त्यांनी चार ओळी लिहून पाठवल्या त्या ओळींचा अर्थ असा होता की हे राजन– कोणतेही दान देताना तुझी नजर खाली झुकलेली का असते?

राजा हरिश्चंद्रने  तुळशीदास यांच्या प्रश्नाला जे उत्तर लिहून पाठवलं ते फार फार वेगळं असूनही संयुक्तिक मात्र होतं!त्यांनी दिलेल्या आपल्या उत्तरात असं लिहिलेलं होतं की- मला माहित आहे की हा रोज रोज देणारा वेगळाच आहे! मी फक्त निमित्तमात्र आहे!  तो फक्त आणि फक्त दुसरा तिसरा कोणीही नसून साक्षात परमपिता परमात्माच आहे.

आणि याची जाणीव मला सतत होत असते! परंतु ज्यावेळी लोक असं समजतात की त्या सर्वांना ते दान मीच देतो आहे किंबहुना माझ्यातला राजा हरिश्चंद्र त्यांना देत आलो आहे! हा विचार जेव्हा माझ्या मनाला स्पर्श करतो त्यावेळी खरोखरच  माझी नजर शरमेने  आपोआप खाली  झुकते! कारण – मी केवळ निमित्तमात्र आहे याची पूर्ण जाणीव मला सतत  असते.

कदाचित माझ्या याच मनोवृत्तीचं प्रतिबिंब माझ्या झुकलेल्या नजरेच्या व्यक्त होत असेल! हा विचार नम्रपणे राजा हरिश्चंद्रने संत तुळशीदासांना लिहून पाठवला! मित्रांनो -या ठिकाणी एक मात्र निश्चित आहे की -हे जे काही मी करतो आहे ते माझ्याकडून करवून घेणारा कर्ता-करविता तो साक्षात परमेश्वर आहे!- मी एक निमित्तमात्र आहे! ही भावना ज्यावेळी आपल्या मनात येते- त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर  विलक्षण समाधान आपण अनुभवायला लागतो.

एक कर्तव्यपूर्तीची भावना आपल्या नजरेत -आपल्या चेहऱ्यावर प्रगटते!  एवढेचनव्हे तर समोरच्या व्यक्तीच्या नजरेतही ती प्रत्यक्ष आपल्याला अनुभवता येते! म्हणूनच मित्रांनो असं म्हटलं जातं की  जिथे– कर्तव्याची जागृती असते! भगवंताची स्मृति असते–तिथेच समाधानाची प्राप्ती होते.

मित्रांनो – असा विचार करा की आपण  मागणाराच्या रांगेत उभे आहोत आणि दाता दुसराच कोणीतरी आहे  त्यावेळी आपली मानसिक स्थिती  कशी असेल?– म्हणूनच मित्रांनो आपण परमेश्वराचे आभार मानू या की- त्याने आपल्याला शारीरिक- मानसिक आर्थिक दृष्ट्या सक्षम केलेलं  आहे! म्हणूनच आपण दात्याच्या भूमिकेत उभे आहोत.

हा जर विचार मनात आला तर निश्चितपणे आपलं वागणं- बोलणं हे राजा हरिश्चंचन्‍द्रा  सारखच असेल!  मला वाटतं आजचा चिंतनाचा विषय आपल्या हृदयापर्यंत  पोहोचला असेलच! म्हणून इथेच थांबतो 
( शब्दांकन- ला.डॉ.शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!